विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध (Vidnyan Shaap Ki Vardan Marathi Essay)

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

विज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीचा पुराव्यांसहीत केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास होय. आजचे २१ वे शतक म्हणजे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फार मोठा अभ्यास आणि विस्तार केला आहे. विज्ञानाच्या मदतीने आज प्रगती सोबतच जीवन देखील सुखकर झाले आहे पण म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात; तसेच विज्ञानाचे जेवढे फायदे आहे तेवढेच तोटे देखील आहेत. आज विज्ञानाच्या मदतीने अनेक यंत्र, सुविधा आणि जीवनावश्यक औषधे यांचा शोध लागला आहे. माणूस परग्रहावर देखील पोहोचला आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार मानवी मेंदूत यांत्रिक चीप बसवून मानवी रोबोट देखील होऊ शकतात हेही समोर आले आहे. अनेक कामे यंत्रवत झाली आहेत.

बऱ्याच आजारांवर औषधे आणि लस यांच्या शोधामुळे मानवाचे आयुर्मान वाढले आहे. पूर्वी शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि गुणवत्ता यात बरीच सुधारणा झाल्याने शस्त्रक्रियेत निर्माण होणारा धोका बऱ्याच अंशी कमी झाला आहे. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण, अंतराळ संशोधन मोहीम यामुळे त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक यांचे आधीच संकेत मिळाल्याने बऱ्याच प्रमाणात आर्थिक तसेच जीवित हानी टाळता येऊ लागली आहे. ए.आय. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बरीच किचकट कामे सोपी होऊ लागली आहेत. चॅट जी.पी.टी., गूगल यांसारखे अनेक महत्त्वाचे आणि भरपूर कामी येणारे शोध हे विज्ञानाची देणगी आहेत.

सर्वात महत्त्वाचा आणि माणसाच्या जीवनात कायापालट घडवून आणणारा शोध म्हणजे विजेचा शोध! विजेच्या शोधामुळे माणसाचे जीवन खूपच आरामदायक आणि सुखी झाले. याच विज्ञानामुळे शेतीत अनेक प्रकारचे शोध घेऊन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. दळणवळणाची साधने, पक्के बांधकाम, धान्य साठवणीच्या पद्धती आणि असे अनेक शोध माणसासाठी वरदान ठरले आहेत.

हे सर्व तर विज्ञान मानवी जीवनाला मिळालेले एक वरदान आहे असेच दाखवून देतात परंतु जेवढे विज्ञानाचे फायदे आणि चांगले उपयोग आहेत तितकेच किंबहुना त्यापेक्षा देखील अधिक दुरुपयोग आहेत. विज्ञानाने मानवी जीवन कितीही सुखकर केले असले तरीही माणूस एकमेकांपासून भावनिक दृष्ट्या दुरावत चालला आहे. सतत प्रगतीच्या मागे धावताना मात्र माणूस यंत्र होत चालला आहे. खाणी उत्खनन करण्यासाठी शोध लावलेल्या बॉम्बचा वापर चुकीच्या पद्धतीने करून जीवित हानी करण्यासाठी होत आहे. अजून मोठे दुर्दैव म्हणजे आजच्या युगात ज्या देशाकडे जास्त अण्वस्त्रे तो देश जागतिक महासत्ता म्हणून ओळखला जातो. तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून देशांची सुरक्षाविषयक आणि गुप्त माहिती चुकीच्या पद्धतीने मिळवून त्याचा अयोग्य वापर आजकाल वाढत आहे.

चार पायाच्या प्राण्यात आणि मानवात फरक एकच आहे तो म्हणजे माणूस सारासार विचार करू शकतो पण आता मात्र त्यात शुष्कपणा येत चालला आहे. संशोधनाच्या नावाखाली होणारी निसर्गाची हानी कधीही भरून न येण्यासारखी आहे. सतत होणारे बांधकाम, उत्खनन, भू राजकीय चकमक, युद्ध यामुळे संपूर्ण जगाचेच नुकसान होत आहे. विज्ञानाची प्रगती होणे ही चांगलीच बाब आहे पण जेव्हा माणूस त्याचा वापर एका मर्यादेपलीकडे जाऊन करतो तेव्हा मात्र तीच त्याची अधोगती ठरत आहे.

कोरोना काळात देखील याच तंत्राचा वापर करून सर्वजण आपापल्या आयुष्यात पुढे जात राहिले. मुलांच्या शाळा ऑनलाईन झाल्या, पालक घरातून कामे करू लागले आणि याच विज्ञानामुळे अश्या जीवघेण्या आजारापासून मुक्ती मिळवण्याचे औषध देखील विकसित करता आले परंतु हेही विसरून चालणार नाही की, याच तंत्राचा दुरुपयोग केल्याने असा जीवघेणा विषाणू तयार होऊ शकला आणि यात कित्येक निष्पाप जीव स्वतःचा जीव गमावून बसले.

पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हते आणि टेलिफोन असायचे तेव्हा लोकं टेलिफोन नंबर तोंडपाठ ठेवत असत, महत्त्वाची कामे लक्षात ठेवून केली जायची परंतु आता मोबाईलच्या शोधाने सर्व काही डिजिटली सेव्ह करून ठेवल्याने मेंदूला कोणीही ताण देत नाही. औषधांच्या शोधामुळे माणूस त्याच्यावरच विसंबून राहायला लागला आहे. ‘आजारी पडल्यावर औषध आहे’ अश्या विचारसरणीमुळे सुदृढ जीवनशैली बदलली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे आणि बदलत्या काळाबरोबर लहान लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल सारखी अत्याधुनिक तंत्रे दिसतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे.

पूर्वी कमीतकमी संध्याकाळचा वेळ कुटुंबासाठी राखीव असायचा पण आता मात्र एका छताखाली राहूनही सगळ्यांची डोकी आपापल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्येच असतात. सर्व काही एका क्लिकवर मिळत असल्याने माणसाचा आळशीपणा वाढत चालला आहे. अगदीच आणीबाणीच्या वेळी आपली यातून सोय होत असली तरीही काही चुकीच्या सवयी मात्र आपल्याच अंगलट येऊ लागल्या आहेत. हवं तेव्हा हवं ते मिळत असल्याने माणसातील धैर्य आणि संयम संपुष्टात येत चालला आहे. सर्व काही “इन्स्टंट” हवे असल्याने आणि त्याचीच सवय झाल्याने माणसातील धैर्य, चिकाटी असे चांगले गुण लोप पावत चालले आहेत.

पूर्वीसारखे मनमोकळेपणे हसणे, रडणे, बागडणे सोडून माणूस आता फक्त “ट्रेण्ड”च्या मागे धावत आहे. एखाद्या आवडत्या गाण्यावर मनापासून पाय थिरकण्याच्या ऐवजी फक्त लाइक्स आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही ट्रेंडी गाण्यावर रिल्स बनत आहेत. सर्व काही सोशलाईज करायची जणू माणसाला सवयच झाली आहे. यातूनच प्रसिद्धीची हाव एक वेगळीच स्पर्धा निर्माण करत आहे आणि यातूनच डिप्रेशन सारखे मानसिक आजार बळावत आहेत. जशी इथे प्रसिध्दी मिळते तशीच कुप्रसिध्दी होण्यास देखील वेळ लागत नाही त्यामुळेच तणाव, नैराश्य आणि न्यूनगंड वाढण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

आजच्या विज्ञानाच्या युगात अनेक संधी निर्माण झाल्याने तरुणांमध्ये “धर - सोड वृत्ती” बळावत आहे. काही वेळा एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत होत आहे. तर याच्या विरुद्ध अनेक कामे यंत्रवत झाल्याने कित्येक लोकांना आपले काम गमवावे लागत आहे आणि यामुळे बेरोजगारी वाढत आहे.

एकीकडे पुरातन अवशेष विज्ञानाच्या सहाय्याने पुन्हा मिळवून जुन्या परंपरा आणि युगाचा अभ्यास करता येत असला तरीही सायबर गुन्ह्यांसारख्या किडीमुळे माणसाची आजची गोपनीय आणि वैयक्तिक माहिती मात्र नक्कीच सुरक्षित नाही. अश्यातच जर मानवी मेंदूत चीप बसवून सर्व काही फक्त आणि फक्त विचार करण्याच्या क्षमतेवर करता आले तर चुकीच्या लोकांच्या डोक्यातील चुकीच्या कल्पना सत्यात उतरून लगेचच विध्वंस घडणे फार दूर नाही.

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही माणूस आणि यंत्र यात फरक हा ठेवलाच पाहिजे. अन्यथा ती वेळ दूर नसेल जेव्हा सर्व यंत्रमानव मिळून त्यांनाच निर्माण केलेल्या हाडामांसाच्या मानवाला वाटेतून दूर सारून स्वतःचं राज्य प्रस्थापित करतील.

शेवटी कोणत्याही गोष्टीचे चांगले आणि वाईट परिमाण हे असतातच म्हणूनच कुठे थांबायचं हे समजून आपण त्या गोष्टीचा चांगला वापर करू शकतो. विज्ञान हे आपल्या प्रगतीसाठी खरंच एक वरदान आहेच फक्त त्याचं रूपांतर शापात होऊ न देणं हे अजूनही आपल्या हातात आहे.