विळखा भाग २
मागील भागाचा सारांश: चेतन नोकरीसाठी वणवण फिरत असताना त्याची व सुरजची भेट एका हॉटेलमध्ये झाली. सुरजने त्याला खायला घातले. नोकरी देण्यासाठी सुरजने चेतनला आपल्या घरी बोलावले होते. सुरजचं नाव ऐकून रिक्षावाल्याने चेतनकडून पैसे घेतले नाही.
आता बघूया पुढे…..
एवढ्या मोठया बंगल्यात आपण प्रवेश कसा करावा? हे चेतनला कळत नव्हते, म्हणून तो सुरजच्या घराबाहेर घुटमळत होता. जवळपास दहा मिनिटे चेतन गेटजवळ जाण्याच्या विचारात एकाच जागेवर उभा होता.
सुरजच्या बंगल्याबाहेर हातात बंदूक घेऊन दोन गार्ड उभे होते. चेतनला असं घुटमळताना बघून एक गार्ड त्याच्या जवळ येऊन म्हणाला,
"ए पोरा, तू केव्हापासून इथे काय करतोय? बंगल्याकडे का बघतोय?"
गार्ड दरडावून त्याला विचारत होता.
आपल्या हातातील कार्ड दाखवून चेतन म्हणाला,
"माझे नाव चेतन आहे. मला सुरज साहेबांनी भेटायला बोलावलं आहे. इतक्या मोठया बंगल्याकडे बघून आता प्रवेश कसा करु? हे कळत नव्हते."
चेतनच्या हातातील कार्ड बघून गार्ड म्हणाला,
"सुरज साहेब नाही, त्यांना सुरज भय्या म्हणायचं. चल मी तुला आत घेऊन जातो."
चेतन गार्डच्या पाठोपाठ चालू लागला होता. मोठ्या गेटच्या शेजारी एक छोटे गेट होते. गार्ड चेतनला त्या गेटमधून आत घेऊन गेला. गेटमधून आता प्रवेश केल्यावर चार ते पाच गार्ड ठराविक अंतरावर तैनात होते. आतील चित्र बघून चेतन जरा बिचकलाच. बंगल्याच्या बाहेर एका बाजूला तीन सफेद रंगाच्या चारचाकी गाड्या उभ्या होत्या. एका बाजूला चार मोटरसायकल होत्या.
चेतनने गार्डच्या पाठोपाठ भव्यदिव्य बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील दरवाजात एक गार्ड उभा होता.
"ह्या मुलाचं नाव चेतन आहे, ह्याला सुरज भय्याला भेटायचं आहे." आपल्या हातातील कार्ड व चेतनला गेटवरील गार्डने दरवाजातील गार्डच्या हातात सोपवलं.
दरवाजातील गार्डने आपल्या मागोमाग येण्याचा इशारा चेतनला केला. चेतन त्या गार्डच्या पाठोपाठ चालत होता. बंगल्यात दोन हॉल होते. एक मोठा हॉल होता आणि दुसरा छोटा हॉल होता. तो गार्ड चेतनला छोट्या हॉलमध्ये घेऊन गेला.
"तू इथे बस. मी सुरज भय्याला सांगून येतो."
आपण एका वेगळ्या जगात आलो आहोत, याची जाणीव चेतनला झाली होती. थोड्या वेळाने त्या गार्डसोबत एक व्यक्ती तिथे येऊन चेतनकडे बघून म्हणाली,
"तुझं माझ्याकडे काय काम होतं? तुला इथे कोणी पाठवलं?"
"मला सुरज साहेबांना भेटायचं आहे. त्यांनीच मला इथे बोलावलं आहे." चेतन घाबरत म्हणाला.
गार्ड चिडून म्हणाला,
"अरे, सुरज भय्या म्हणायचं. हेच सुरज भय्या आहेत. तुला यांनाच भेटायचं होतं ना? मग तुला सुरज भय्या कोण आहेत? हे कसं ठाऊक नाही. "
यावर गार्ड सोबत आलेली व्यक्ती म्हणाली,
"राजू, लगेच असं चिडण्याची गरज नाहीये. एकतर हा मुलगा किती घाबरलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरुन कळत नाहीये का? चेतन तू बोल."
चेतन आश्चर्याने म्हणाला,
"तुम्ही सुरज भय्या कसे असू शकतात? मी ज्यांना भेटलो होतो ते वेगळेच कोणीतरी होते. आज दुपारी आमची भेट झाली होती, तेव्हा त्यांनी मला हे कार्ड दिलं होतं."
"तुझ्याकडे जे कार्ड आहे ते माझंच आहे. मी सकाळपासून घरीच आहे आणि मी तुला पहिल्यांदा भेटतो आहे. माझंच नाव सुरज आहे आणि हे घरही माझंच आहे." समोरची व्यक्ती सुरज आहे आणि आपल्याला भेटला सुरज नेमका कोण होता? याची लिंक चेतनला लागत नव्हती.
चेतन आता चांगलाच घाबरला होता. गार्डच्या हातातील बंदूक बघून चेतनला जास्त भीती वाटत होती. चेतनला पुढे काय बोलावं? हेच कळत नव्हते. सुरजला चेतनच्या मनातील भीती समजली होती.
"चेतन तू घाबरु नकोस. तुला ज्या माणसाने सकाळी हे कार्ड दिलं, तो माणूस तुला कुठे व कसा भेटला? म्हणजे तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं होतं?" सुरजने विचारले.
"माझी व त्यांची भेट हॉटेल कल्पतरु मध्ये झाली. मला नोकरी मिळत नसल्याने मी चिंतेत होतो. माझ्या खिशात जेवण करण्यासाठी पैसे नव्हते. जे मला भेटले होते, त्यांनी मला खायला घातले. पाचशे रुपये व हे कार्ड देऊन सामान घेऊन इथे रहायला व काम करायला येण्यास सांगितले होते." चेतनने भेदरलेल्या आवाजात सांगितले.
सुरज गार्डकडे बघून म्हणाला,
"राजू, चेतनला चहापाणी द्या. हॉटेल कल्पतरुचे सीसीटीव्ही फुटेज मागवून घ्या. चेतन नक्की कोणाला भेटला होता, ते आपल्याला कळलं पाहिजे. सगळं काही क्लिअर होईपर्यंत ह्या मुलाला इथेच बसून ठेवा. ह्या मुलावर कडक नजर ठेवा."
सूचना देऊन सुरज तेथून निघून गेला. चेतनला तिथे येऊन पश्चाताप झाला होता.
चेतन ज्या व्यक्तीला दुपारी भेटला होता, त्या व्यक्तीने त्याचं नाव सुरज असं का सांगितलं होतं? तसेच त्याने सुरजच्या घराचा पत्ता का दिला होता? बघूया पुढील भागात…..
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा