Login

वीण.. घट्ट नात्याची! भाग -४(अंतिम )

आई आणि मुलीच्या नात्याची कथा

विषय - सांग कधी कळणार तुला.

जलद कथालेखन स्पर्धा.


वीण.. घट्ट नात्याची!

भाग -चार.(अंतिम भाग. )


"असा नको ना बघू. ते टीव्ही, पेपर, सोशल मीडियावर सारखं आफताब आणि श्रद्धाची न्यूज फिरतेय म्हणून डोक्यात नाही नाही ते येतंय." तिने नजर खाली करत म्हटले.


"वेडाबाई, म्हणून या दोन दिवसापासून इतकी अस्वस्थ आहेस होय? अगं राणी, तुझ्या सॉरी माझ्या लेकीवर आपल्या दोघांचेही संस्कार आहेत ना? मग ती का अशी कोणाच्याही प्रेमात पडेल बरं? आणि पडली तरी आपण आहोत ना तिला सावरायला. धडपडायचे वयच आहे गं तिचं. पण म्हणून एकदम अविश्वास दाखवणे योग्य नाही ना?" तिला आश्वस्त करत तो म्हणाला.


"हो. आणि पिहू तुझी एकट्याची नाही, माझी पण लेक आहे." ती.


"अरे, लवकरच ध्यानात आले तर तुझ्या. बरं झालं. तर या अडनिड्या वयात असलेल्या आपल्या लेकीशी आपण पेरेंट्स पेक्षा फ्रेंड्स म्हणून वागलो तर ती आणखी आपल्या क्लोज येईल आणि आपल्या तिघांचं नातं जास्त घट्ट होईल. काय कळतंय ना तुला?" भुवई उंचावत तो तिला म्हणाला.


"हो रे. इतके दिवस मैत्रिणीसारखीच वागत होते. अचानक त्या न्यूजमुळे माझ्यातील आई जागी झाली." ती हसून म्हणाली.


"मग आता काय प्लॅन?"


"काही नाही. तिला सकाळी न आवडणारी भाजी दिली ना? आता आवडणारे पॅटिस बनवून ठेवते." ती उठत म्हणाली.

"आणि सुजित थँक्स बरं का. खूप छान समजावून संगितलेस मला."


"ओए, केवळ थँक्सवर बोळवण करू नकोस. काहीतरी गोड असं गिफ्ट दे." तिच्याजवळ येत तो म्हणाला.


"हम्म ते तरतू ऑफिसहून आल्यावर देणारच. खास तुझ्या आवडीचे गुलाबजाम बनवणार आहे मी." त्याला धक्का देत ती म्हणाली.


"टिफिन फिनिश केला ना?" पिहू शाळेतून घरी परतली तशी टिपिकल आईप्रमाणे गंभीर चेहरा करून मेघाने तिला विचारले. सुजित त्याच्या कामावर गेला होता. त्यामुळे घरी दोघीच होत्या.


"हम्म." तीही अटीट्युड दाखवत उत्तरली आणि फ्रेश व्हायला गेली. आपले आवरून परतल्यावर डायनिंग टेबलवर तिच्या आवडीचे पॅटिस तिला दिसले.


"वॉव मम्मा, पॅटिस? आय लव्ह धिस." तिचा थोड्या वेळापूर्वीचा अटीट्युड कुठल्याकुठे पळाला होता.


"अँड मम्मा आय लव्ह यू टू. आज कसली सॉलिड भाजी केली होतीस गं. मला वाटलं आपली साधी भेंडीची भाजी असेल. तू तर चक्क भरवा भेंडी केलेली. किती आवडली म्हणून सांगू. मलाच नाही तर तर नीती आणि रक्षितला पण आवडली. मीच त्यांना बोलले की भुक्कड लोकांनो जरा तुम्हीही कधी भाजीपोळीचा डबा आणत जा." ती मनापासून बोलत होती. सकाळी सुजितने तिला जे सांगितले ते तिला पटले होते.


"पिहू, मला तुला काही म्हणायचे आहे." तिची बडबड थांबवत मेघा म्हणाली.


"ॲक्च्युअली मम्मा, मलाही तुला काही सांगायचे आहे." तिच्याकडे बघून पिहू.


"सॉरी!" दोघींनी कान पकडून एकाचवेळी सॉरी म्हटले आणि दोघीही हसायला लागल्या.


"मी जरा जास्तच ओरडले ना गं तुला? खरंच सॉरी." मेघा.


"मी पण सकाळी थोडे हार्श बोलले ना? सॉरी." पिहू.


"काळजी वाटते रे पिल्ल्या तुझी." मेघा.


"कळतंय गं मला. पण मम्मा इतकी पझेसिव्ह नको होऊस. मी कधीच चुकीचे वागणार नाही. आय प्रॉमिस." तिला प्रेमाने एक घास भरवत ती म्हणाली.


"आय नो. मलाही कळलं ते." तिला घास भरवत मेघा म्हणाली.


"मम्मा तुला माहितीये? आज ना मॅथ्सच्या टेस्ट मध्ये मला टेन आऊट ऑफ टेन मिळाले. आणि तो रक्षित? त्याला सेवन. मी तर त्याला म्हणाले की फोनवर चॅटिंग करत बसण्यापेक्षा जरा अभ्यासाकडेही लक्ष देत जा. आणि नीती? तिला तर एट मार्क्स. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला…" पिहू अखंड बडबडत आणखी बरंच काही सांगत होती.

मेघा आणि पिहूच्या नात्याची वीण परत घट्ट होत होती.


*समाप्त *

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.


0

🎭 Series Post

View all