Login

विनोद आणि कुटुंब भाग-३(अंतिम)

अंतरंगी निनावे कुटुंबाची कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

विनोद आणि कुटुंब भाग-३(अंतिम)

"विनोद... विनोद..." माया त्याला आवाज देत होती.

त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.

"काय झाले बाळा?" त्याचे आई-बाबा आता पुन्हा काय झाले म्हणून काळजीत पडले.

"मला... सर्व  हसतात." तो रडत प्रथमच्या कुशीत रडत म्हणाला.

"कोण हसते तुला आणि का?" मायाला पण आता कारण जाणून घ्यायचे होते.

"मला सर्व जोक म्हणून हसतात." रडत तो सांगत होता.

त्या दोघांना आपला मुलगा का रडत आहे हे समजतच नव्हते.

"बाळा, शाळेत काही झाले का? तू नीट सांगशील का?" प्रथम त्याचे डोळे पुसत म्हणाला.

"माझ्या नावाचा अर्थ जोक आहे असे म्हणून सर्व हसतात." असे म्हणून तो पुन्हा रडायला लागला.

हे ऐकल्यावर प्रथम आणि माया एकमेकांकडे पाहत होते.

"बघा, म्हणून मी त्याचे नाव ठेवताना म्हणत होती की दुसरे नाव ठेवूया पण तुम्हीच त्याचे नाव विनोद म्हणून ठेवले." आता मायाला मागचे आठवले.

"काय बाबांनी माझे नाव विनोद ठेवले?" आता तर विनोदला रागच आला आणि लगेच बाबांच्या कुशीतून बाजूला होत आईला बिलगला.

पक्षांतर काय असते ह्याचा लगेच प्रथमला आपल्या सुपुत्राकडे पाहून साक्षात्कार झाला.

"बाबा, आय हेट यू. तुम्ही माझे नाव जोक ठेवले. आई मला माझे नाव बदलायचे आहे. मला काहीतरी छान नाव ठेव."
विनोद म्हणाला.

"आई पण बारसे लहानपणी होते ना? आता ह्याचे नाव पुन्हा ठेवायचे म्हणजे किती मोठा पाळणा लागेल ना?" नीलाला पडलेला मोठा गहन प्रश्न.

"काय बारसे?" विनोदने विचारले.

तसेच त्याला आता आपल्याला सर्व झोका देतील आणि उगाच दोन्ही गालाला जास्त पावडर लावून काजळ डोळ्यांत भरतील आणि त्याचे मित्र त्याला हसत आहेत असे दृश्य समोर दिसले.

"नाही..." करत तो जोरात ओरडला.

"अरे वेड्यांनो, विनोदचा अर्थ फक्त जोक किंवा मस्करी  नाहीये तर आनंद हा सुद्धा आहे. मला प्रमोशन मिळाले होते आणि त्याच दिवशी ह्याचा जन्म झाला म्हणून त्यावेळी खूप आनंद झाला होता त्यामुळे मी विनोद असे नाव ठेवले. माया मी तुला सांगितले होते. तू विसरलीस का?" प्रथमने नीट सर्व सांगून आपल्या बायकोला शेवटी विचारले.

"ह... हो. बरोबर. तुम्ही अर्थ सांगितला होता. तुमचे बाबा बरोबर बोलत आहेत. विनोदचा अर्थ आनंद हाही आहे." माया हसत म्हणाली.

"बाळा, हा अर्थ तू उद्या तुझ्या मित्रांना सांग आणि म्हण की खूप विचार करून माझ्या बाबांनी माझे नाव विनोद ठेवले. मघ तुला कोणी काही बोलणार नाही." प्रथमने त्याला समजावून सांगितले.

"अजूनही तुला वाटते की तुझे नाव बदलायला हवे का?" मायाने विचारले.

"नाही. माझे नाव हेच ठीक आहे." विनोद म्हणाला.

"म्हणजे ह्याचे बारसे होणार नाही? मला नवीन ड्रेस घ्यायचा होता." नीलाला खूप दुःख झाले.

तरीही मनाची पुन्हा खात्री करण्यासाठी विनोदने गुगल वर विनोद ह्या नावाचा अर्थ शोधला आनंद आणि करमणूक असे दोन्ही अर्थ तिथे दाखवले. त्यातला आनंद शब्द पाहून त्याला परमानंद झाला.

आपले बारसे करण्याचे रद्द झाले म्हणूनही तो खूश होता आणि आपल्या नावाचा अर्थ चांगला आहे हे ऐकून विनोदची कळी खुलली.

त्याने दुसऱ्या दिवशी त्याच्या वर्गात त्याच्या जन्माची कहाणी आणि कसे त्याच्या बाबांनी त्याचे नाव ठेवले हेही खूप रंगवून सांगितले. त्यानंतर त्याला कोणी चिडवले नाही.

नावाचा अर्थ माहीत असणे किती महत्त्वाचे आहे हे आता मायाला समजले होते. म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधण्याची तिला सवय लागली.

जिथे जाईल तिथे ती नवीन शब्द दिसला किंवा कोणाचे नाव वेगळे असेल तर त्या व्यक्तींना अर्थ विचारून घेतल्याशिवाय ती सोडत नव्हती.

तसेच एकदा निनावे शब्दाचा अर्थ तिला माहीत झाला आणि आपल्या आडनावाचा असा काही अर्थच नाही लागत असे समजून ती हिरमुसली. तेव्हा प्रथमने सर्वांपेक्षा आपले आडनाव हटके आहे असे सांगून तिची समजूत काढली.

कोणी तरी म्हंटले आहे की नावात काय आहे? पण नावाचा  अर्थ काय आहे हाच प्रश्न निनावे कुटुंब व्यसन लागल्या सारखे ज्याला त्याला विचारून हैराण करत. त्यामुळे काही लोकांनी तर ते समोर दिसल्यावर आणखी काही प्रश्न विचारतील म्हणून दुरूनच रस्ता बदलण्याचे काम केले.

ह्याचा अर्थ निनावे दाम्पत्याने आपण इतरांपेक्षा जास्तच ज्ञानी आहोत असा गैरसमज करून घेतला होता.

मायाने तर मोठी वहीच बनवली होती प्रत्येक नाव आणि त्याच्यापुढे त्याचे विविध अर्थ ह्याची यादी बनवली आणि दिवसेंदिवस ती मोठीच होत होती. प्रथमसोबच नीला आणि विनोदलाही मायाचा ह्याबाबतीत अभिमान वाटत होता.

आपण गिनिज बुक रेकॉर्डमध्ये ह्यासाठी आपले नाव द्यायला हवे का असा विचार सबंध निनावे कुटूंब करत होते पण त्याचे काही नियम आणि अटी पाहून ते शक्य नाही असे कोणा जाणकाराने त्यांना सांगितले. तेव्हा कुठे त्यांनी हा निर्णय रद्द केला.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५