"माझ्या छातीत खूप दुखतंय गं हल्ली! जीव कासावीस होतो.. श्वास घेता येत नाही.. मधूनच मळमळल्यासारखं होतं!" सकाळी उठल्याबरोबर अंजूताई आपल्या सुनेला सांगत होत्या.
"ऍसिडीटी झाली असेल. थांबा! मी तुम्हाला गोळी देते!" असं म्हणत त्यांच्या सुनेने ऍसिडीटी बरी होण्याची गोळी आणि पाणी अंजूताईंच्या हातात दिलं.
अंजूताई बराच वेळ त्या गोळीकडे बघत राहिल्या.. अन् मग त्यांनी ती गोळी जिभेवर ठेवून वरून घोटभर पाणी प्यायलं.
अंजूताईंनी नुकतीच सत्तरी ओलांडलेली.. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं अन् त्या एकाकी झाल्या.
त्यांचा मुलगा अन् सून दोघेही नोकरी करत. त्यामुळे मुलाच्या लग्नानंतरदेखील घरातली सगळी जबाबदारी अंजूताईंनीच सांभाळली होती. त्यांच्या यजमानांना स्वयंपाकीणीच्या हातचा स्वयंपाक आवडत नसे म्हणून सगळा स्वयंपाक अंजूताई स्वतःच करत.
तशीही सुनेला घरकामाची आवड बेताचीच. त्यात तिची नोकरी! त्यामुळे घरातलं उरलं-पुरलं, पाहुणे-रावळे, देणं-घेणं सगळं अंजूताई हौसेनं करत. नात लहान असताना तिला सांभाळत. त्या स्वतः पदवीधर होत्या.. अन् भाषांची आवड होती. त्यामुळे नातीच्या भाषा विषयांचा अभ्यास देखील घेत. त्यांचं अन् नातीचं खूप छान बॉंडीग तयार झालं होतं.
हळूहळू दिवस सरकत गेले.. अन् अचानक त्यांचे यजमान हृदयविकाराचं निमित्त होऊन देवाघरी निघून गेले. नात देखील मोठी झाली होती.. आजोबा गेल्यानंतर दोन महिन्यांनीच ती शिकायला पुण्याला गेली. दिवसभर नातीच्या मागे मागे करणाऱ्या अंजूताईना आता दिवस मोकळा भासू लागला.
त्यांच्या सुनेची देखील पन्नाशी आलेली! मेनोपॉजमुळे हल्ली ती फारच चिडचिडी झाली होती. अंजूताईंचा ह्या वयातही घरकाम करण्याचा उत्साह दांडगा असला तरी त्यांचे हात थरथरत. मग कधी ओट्यावर दूध सांडायचं तर कधी हातातून भांडं पडायचं.
त्या दिवशी दुपारी त्यांनी स्वतःसाठी म्हणून कॉफी केली.. कॉफीचा मग घेऊन डायनिंग टेबलजवळ जाताना हातांच्या थरथरीमुळे त्यांचा लाडका काचेचा मग हातातून पडला. उकळती कॉफी अंगावर सांडली.. पोट अन् मांड्या चांगल्याच भाजल्या. शिवाय काचा गोळा करताना हाताला काच लागून रक्तस्त्राव सुरू झाला.
नेमकी त्याच वेळी त्यांची कामवाली बाई आली म्हणून बरं.. नाहीतर अंजूताई खूप घाबरल्या होत्या. तिनंच काचा गोळा केल्या.. अंजूताईंचा ओला झालेला गाऊन बदलून दिला अन् सूनबाईला फोन लावून झाल्या प्रकाराची माहिती दिली. अर्ध्या तासात मुलगा अन् सून दोघेही घरी हजर झाले.
"आई, तुम्हाला किती वेळा सांगितलं.. आता तुम्ही आराम करा! कशाला नसते उपद्व्याप करता? आज महत्त्वाची मीटिंग सुरू होती. ती सोडून यावं लागलंय मला!" सुनेने अपेक्षेप्रमाणे चिडचिड केलीच.
अंजूताईदेखील चवतळल्या. "उपद्व्याप काय म्हणतेस गं? दुपारी कॉफी घ्यावीशी वाटली म्हणून केली.. सांडली.. त्यात काय एवढं?"
"अगं पण आई! तुला किती भाजलंय बघ ना! आणि रक्त पण खूप गेलंय बघ! काही कमी जास्त झालं असतं तर!" मुलाने सारवासारव केली खरी पण ह्या घटनेने अंजूताईंचा संसार.. त्यांचा अधिकार त्यांच्या हातून अलगद काढून घेतला गेला.
आता दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाला बाई आली. स्वतःच्या हाताने चवदार करून खाणाऱ्या अंजूताईंना त्या स्वयंपाकीणीच्या हातचा एकसुरी स्वयंपाक आवडेना!
एक दोनदा त्यांनी स्वयंपाकीण बाईंना स्वयंपाकाच्या काही सूचना देऊन बघितल्या.. पण सुनेच्या कपाळावरच्या आठ्या बघून त्या गप्प बसल्या.
आता त्यांना घरात काहीच काम नव्हतं. अगदी धुतलेली भांडी जागेवर लावण्यापासून ते कपड्यांच्या घड्या घालण्यापर्यंत सगळी कामं मोलाने करून घेतली जात.. घरात त्यांची काळजी घेतली जात नव्हती असं नाही.. पण ज्या घरात एके काळी त्यांच्या शिवाय पान देखील हलत नसे.. त्याच घरात आता त्यांचं स्थान अगदी नगण्य झालं होतं.
दिवसभर फ्लॅटचा दरवाजा बंद करून एकट्या बसून त्या कंटाळत. त्यांना मुळातच टीव्ही बघण्याची सवय नव्हती अन् आता नवीन घेतलेला एलईडी त्यांना चालवतादेखील येत नसे. नात असताना ती स्मार्ट फोन शिकून घेण्याचा आजीला आग्रह करी.. पण तेव्हा त्यांना तशी गरजच भासली नव्हती. नातीला फोन करून तिच्याशी गप्पा मारणं हा एकच काय तो विरंगुळा होता त्यांना!
पण हल्ली नातीचे दिवसभर कसले कसले ऑनलाईन क्लासेस चालत.. सकाळी कॉलेज.. मग क्लासेस.. संध्याकाळी मित्रमैत्रीणी! नातीचं देखील रूटीन बदललं होतं.. अन् त्यात आजीला जवळजवळ स्थान नव्हतंच.
हल्ली त्यांना सारखं छातीत दुखायचं.. ऍसिडीटीची गोळी घेतली की तात्पुरतं बरं वाटायचं.. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी त्रास सुरू!
आज अंजूताईंची शहरातल्या मोठ्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली होती. त्यामुळे सकाळी भराभर आन्हिकं आटोपून त्या नवी साडी नेसून तयार झाल्या. आज कितीतरी दिवसांनी त्या बंद फ्लॅटच्या बाहेर निघाल्या.. लगबगीने पुढे होऊन मुलाच्या कारमध्ये पुढल्या सीटवर जाऊन बसल्या.
रस्त्याने जाताना त्या लहान मुलांच्या उत्साहाने खिडकीच्या बाहेर बघू लागल्या. "बाप रे! किती मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात इथे!! आणि इथे हा फ्लाय ओव्हर केव्हा झाला?? चार वर्षात शहर किती बदललं आहे नाही?" अंजूताई स्वतः शीच उत्साहाने बडबडत राहिल्या.
डॉक्टरांचा दवाखाना देखील चकचकीत होता.. अगदी हॉटेल सारखाच. तिथे त्यांच्या वयाच्या बऱ्याच बायका तपासायला आल्या होत्या. अंजूताईंना कितीतरी दिवसांनी कुणी तरी बोलायला मिळालं होतं.. अन् म्हणून त्यांचा नंबर येईपर्यंत त्यांच्या गप्पा सुरूच होत्या.
डॉक्टरांच्या तपासण्याच्या टेबलावर चढून बसताना तिथल्या नर्सने अंजूताईंचा हात धरला.. अन् त्यांना जाणवलं.. कित्येक दिवसांत ह्या सुरकुतलेल्या हातांना कुणाचा तरी मुद्दाम स्पर्श झालाय!
"तसं तर सगळं ठीक वाटतंय!" डॉक्टरांनी तपासून मुलाला सांगितलं.
"पण आई सतत तक्रार करत असते.. छातीत दुखतंय म्हणून!" मुलानं डॉक्टरांना सांगितलं.
"ऍन्क्झायटी असू शकेल!" डॉक्टर प्रिस्क्रीप्शन लिहीत बोलले.. "मी काही गोळ्या लिहून देतो.. आयर्न आणि मल्टीव्हिटॅमिन आहेत.. दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घ्यायच्या!" डॉक्टरांनी अंजूताईंकडे बघून सांगितलं.
"पुन्हा दाखवायला कधी यायचं डॉक्टरसाहेब?" अंजूताईंनी अधीरपणे विचारलं.
"पंधरा दिवसांनी दाखवा.. मध्ये काही वाटलं तर येऊन जा!" डॉक्टरांनी उत्तर दिलं..
दवाखान्याच्या पायऱ्या उतरताना अंजूताई पुन्हा इथे येण्याच्या तारखेचा हिशेब करू लागल्या.. कारण डॉक्टरकडे जाणं हाच आता त्यांच्या आयुष्यातला विरंगुळा उरला होता!
© कल्याणी पाठक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा