वीरगळ..

कथा असफल प्रेमाची
वीरगळ..
विषयः प्रेमाचा शत्रू


"विराज, मला खूप भिती वाटते आहे रे." घाबरलेली प्रज्ञा त्याला बिलगत म्हणाली.

"मी आहे ना.. नको घाबरूस." प्रज्ञाच्या पाठीवरून हात फिरवत विराज म्हणाला.

"ते गुंड आपला पाठलाग करत इथे नाही ना येणार?"

"नाही गं.. बहुतेक आपण खूप आत आलो आहोत. त्या गुंडांना या जंगलात आपण दिसणार पण नाही." विराज तिची समजूत काढत म्हणाला. पण त्याचा स्वतःच्याच शब्दांवर विश्वास नव्हता.

"काय बुद्धी झाली रे आपल्याला इथे यायची? आणि आपली गाडी?" प्रज्ञा पॅनिक झाली होती.

"आपल्याला काय माहित आता.. हे ठिकाण एवढं निर्जन असेल? याबद्दल चांगले रिव्ह्यू वाचले होते म्हणूनच तर आलो ना इथे. आणि गाडी सोड. आपला जीव महत्त्वाचा." विराज पण थोडा घाबरला होता. तेवढ्यात जोरात वीज कडाडली. प्रज्ञा अजूनच विराजला बिलगली. विजेच्या उजेडात त्यांना बाजूला असलेले एक दगडी शिल्प दिसले.

"आता हे काय आहे? मला ना या जागेची भिती वाटायला लागली आहे खूप." प्रज्ञा रडू लागली.

"ए बाई.. रडू नकोस. तुझ्या रडण्याच्या आवाजाने त्या गुंडांना आपला माग लागेल. आणि मला नाही माहित याला काय म्हणतात ते." विराज वैतागला होता.

"वीरगळ.. वीरगळ म्हणतात याला." पाठीमागून अचानक आलेला आवाज ऐकून दोघेही दचकले. समोर एक पंचविशीचा तरूण उभा होता. पण त्याचे कपडे मात्र थोडे जुन्या काळातले होते. त्याची ती नजर बघून प्रज्ञा विराजच्या मागे जाऊन लपली.

"अश्या घाबरू नका अक्का मला. इथे तुम्हाला कसलाच धोका नाही." तो तरुण म्हणाला. अजून कसली मदत मिळेपर्यंत वेळ काढता आला तर काढू या विचाराने विराजने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.

"वीरगळ म्हणजे??"

"जेव्हा एखादा पुरुष रणांगणात लढता लढता मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याची समाधी बांधली जाते. रणांगणात आलेल्या मृत्यूचे प्रतिक म्हणून त्याच्या समाधीवर त्याचे चित्र कोरले जाते." तो तरुण खिन्नपणे बोलत होता.

"ओह्ह.. म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की ही समाधी आहे?"

"ह्म्म.. एका दुर्दैवी तरुणाची.."

"तुम्हाला माहित आहे?"

"हो.."

"मग आम्हाला सांगा ना.." विराज म्हणाला. तो तरुण त्या वीरगळीशेजारी जाऊन बसला.

"तुमची इच्छाच असेल तर ऐका.." तो तरुण बोलू लागला. "ही गोष्ट आहे चंद्रहास आणि चारूलताची.. काळ आहे साधारण चारशे वर्षांपूर्वीचा."

🎭 Series Post

View all