वीरगळ.. अंतिम भाग

कथा असफल प्रेमाची
वीरगळ.. भाग ३

"दादा, तुमच्या या चारूदत्त आणि चारूलतेवर जसा प्रसंग आला होता, तसाच आमच्यावर पण ओढवला आहे. प्लीज आमची मदत करा ना. काही गुंड आमच्यामागे लागले आहेत. त्यांच्याकडे हत्यारे वगैरे आहेत." विराज गयावया करत म्हणाला.

"हो.. आहेत आमच्याकडे हत्यारे. बघू कोण वाचवतंय तुम्हाला आमच्यापासून. तू याला बांध.. आधी ती पोरगी माझी आणि मग तुम्हा सगळ्यांची." आपल्या माणसांची नजर ओळखत त्यांचा म्होरक्या म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मदतीसाठी विराज त्या तरुणाकडे वळला. तर तो तिथे नव्हताच.

"आत्ता तर होता इथे.. कुठे गेला?" विराज पुटपुटला.

"ए.. आम्हाला उल्लू बनवतोस का? कोणीच नाही इथे. पकडा रे तिला." म्होरक्या गरजला. आता आपल्यालाच यांच्याशी दोन हात करायचे आहेत हे उमजून विराज लढायला तयार झाला. ते गुंड त्याच्यापर्यंत येणार तोच त्यांच्या तोंडावर एक लाथ बसली. विराजने पाठी बघितले. मगाचा तरुण तिथे आला होता. त्याला बघून विराजचा हुरूप वाढला. त्याने एकहाती सर्व गुंडांना लोळवले. ते तिथे गलितगात्र होऊन पडले होते. विराज आणि प्रज्ञा त्या तरुणापाशी गेले.

"तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आज माझी इज्जत वाचली आहे. तुमचे आभार कसे मानू हेच समजत नाहीये." हात जोडत प्रज्ञा म्हणाली.

"मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे. बाकी काही नाही. असो. तुमची अडचण दूर झाली आहे. निघा तुम्ही. आणि अश्या आडवेळी दोघेच जाताना जरा विचार करत जा. प्रत्येक वेळेस कोणी मदतीला येईलच असं नाही ना.." तो तरूण जायला वळला.

"जाण्याआधी तुमचे नाव तर सांगा. आणि तुम्हाला भेटायचे असेल तर कुठे भेटायचे?" विराजने विचारले.

"माझे नाव?? कशाला हवे ते?"

"सांगा ना.." प्रज्ञाने हट्ट केला.

"मीच तो दुर्दैवी चारूदत्त.. जो आपल्या प्रिय पत्नीला त्या गिधाडांपासून नाही वाचवू शकला." त्याने उत्तर देताच विराज आणि प्रज्ञा मागे सरकले.

"घाबरलात? म्हणूनच मी सांगत नव्हतो." तो परत खिन्नपणे बोलला.

"घाबरलो नाही.. पण.."

"माझ्या घरच्यांनी आमचे मृतदेह शोधून काढले. त्यांनी इथे माझ्यासाठी वीरगळ उभारली खरी.. पण माझे मन मला खात राहिले. मग मी इथेच राहिलो माझ्यासारखं इतर कोणी आपल्या प्रियजनांना दुरावू नये म्हणून."

"तुम्ही खरंच महान आहात.." त्याच्यासमोर हात जोडत विराज आणि प्रज्ञा म्हणाले. जेव्हा त्यांनी समोर बघितले तेव्हा चारूदत्त तिथून अदृश्य झाला होता. परत एकदा त्या पवित्र समाधीला नमस्कार करून दोघेही निघाले.

सदर कथेचा वापर हा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यास सक्त मनाई आहे. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all