विरजण 1

काल आलेली मुलगी..
"मिठाचा डबा बदलून टाकूया आपण, आणि हे तांदूळ या डब्यात का आहेत? मी पिशवीत भरून ठेवते"

हे ऐकताच तिच्या सासूबाई आणि जाउबाईंचे लक्ष विचलित झाले. त्यांना हा बदल पटत नव्हता पण दुसरीकडे तिला का दुखवायचं म्हणून त्या मौन होत्या. गेले कित्येक वर्षे सासूबाई आणि जाउबाईंनी घर सांभाळलं होतं.

केतकीला लग्न होऊन जेमतेम 2 महिने झाले होते. एकत्र कुटुंब होतं. घरात मोठ्या जाउबाई, जेठ, सासू सासरे आणि कुवारी नणंद. घर सांभाळायची तिला भारी आवड. किचन आपल्या पद्धतीने मांडायची तिला हौस. त्यामुळे घरातल्या एकेक गोष्टी ती बदलू लागली.

केतकी नोकरी करत होती. त्यामुळे घरातलं सगळं आवरून जायला तिला उशीर होई. तेव्हा सासूबाई आणि जाउबाईंच्या हे लक्षात येताच त्यांनी सांगितलं की सकाळचं आम्ही बघत जाऊ तू संध्याकाळी किचन सांभाळत जा.ठरल्याप्रमाणे रुटीन सुरू झालं.

संध्याकाळी केतकी आली की किचनमध्ये बराच वेळ असायची. सर्व वस्तूंच्या जागा तिने बदलून टाकल्या. तिला हवी तशी मांडणी केली. तिला स्वयंपाकाचा फार अनुभव नव्हता पण अति आत्मविश्वास होता. Youtube वर बघून आपल्यालाही तसंच जमेल या विचारात ती कुणाचीही मदत घेईना. "मी एकटी करेन" असं म्हणत ती काहीतरी बनवायची, कधी जमायचं तर कधी फसायचं. घरातली सर्व मंडळी मात्र तिचं मन राखण्यासाठी आनंदाने खाऊन घेत.

सकाळी जेव्हा जाऊबाई आणि सासूबाई किचनमध्ये येत तेव्हा त्यांचा प्रचंड गोंधळ उडायचा. कुठलीही वस्तू जागेवर नसायची. केतकीने तिच्या सोयीप्रमाणे किचनची रचना केली होती पण दुसऱ्याचा विचार केला नाही. सासू आणि जाऊला ते खटकू लागलेलं.
*****

🎭 Series Post

View all