विसराळू नवरा

विसराळू नवरा
विसराळू नवरा.

तो सोफ्यावर बसुन सॉक्स घालत होता. त्याने त्याची तयारी केली होती. तो ऑफीसला जाण्यासाठी निघाला होता. त्याची बायको त्याला बाय करायला त्याच्या समोर ऊभी होती. त्याने सॉक्स घातले. शूज घालून झाले.तो दरवाज्यात उभा राहिला. ती त्याच्या समोर उभी राहिली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिचा लाड केला. मग त्याला काहीतरी आठवल.

" काय रे काय झालं? काय शोधत आहेस? "

एका खांद्याला लटकवलेल्या सॅक मधे त्याला काहीतरी शोधताना बघुन तिने त्याला विचारले.

" अग माझा लॅपटॉप चार्जर कुठं आहे ? "

" हा घे." तिने हातात आणून दिला.

" माझ वॉलेट. ?  " खिसे चाचपडत तो म्हणाला.

" हे घे." तिने वॉलेट हातात दिलं.

" झालं का आवरून, घेतल्या का सगळया वस्तू ? " तिने विचारलं.

" हो मोबाइल, टिफीन,लॅपटॉप, वॉलेट, आय कार्ड, रूमाल. सगळं तर घेतलं आहे." तो सगळ्या वस्तु चाचपडत म्हणाला.

" आज चालत जाणार आहे का ऑफिस मध्ये ? " तिने विचारल.

" का.. ? काय झालं , अस का विचारते? " तो गोंधळून विचारतो.

" ही कारची किल्ली विसरली आहे."

तिने त्याच्या समोर कार ची किल्ली नाचवली. त्याने पटकन हातात घेतली.

" अरे देवा , हा असा कसा, विसराळू नवरा तु मला दिलास ? " तिने दोन्ही हात हवेत पसरत छताकडे बघत देवाला विचारलं.

" काय म्हणाली, मी विसराळू नवरा आहे ? " त्याने एक भुवई उंचावत विचारलं.

" नाही रे, तु विसराळू नाही, काही गोष्टी तूझ्या लक्षात रहात नाहीत इतकचं." ती मिश्किल हसत म्हणाली.

" हे बघ मला विसराळू म्हणू नको. तु बघच आता आज. उदया पासून मी काहीही विसरणार नाही." तो म्हणाला.

" हो हो.  बघूच. किती आणि काय काय लक्षात ठेवतो." ती त्याला चॅलेंज देत म्हणाली.

" बघच तु." त्याने चॅलेंज स्वीकारलं.

संध्याकाळी आल्यावर तो कागद पेन घेउन काहीतरी लिहीत होता. तिने त्याला विचारल,

" हे काय लिहीत आहेस ? "

" यादी तयार करत आहे. ज्या गोष्टी मला नेहमी लागतात त्याची. मग बघ उदया पासुन काहीच नाही विसरणार मी " तो आत्मविश्वासाने म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो काहीतरी शोधत होता. त्याने सगळं काही उचकुन बघितलं. कपाट, ड्रॉव्हर, उशीखाली, खिडकीत, पडद्याच्या पाठीमागे, बाल्कनीत बेडरूम मध्ये तो काही तरी शोधत होता. तिला समजेना हा ,

"असा का वागतो आहे. काय शोधत आहे."

ती त्याला विचारते,

" काय रे काय हवं आहे ? काही शोधत आहेस का ? "

" हो ग , काल मी मला लागणाऱ्या गोष्टींची यादी तयार केली होती, ती यादी शोधत आहे, मला आठवत नाही कुठ ठेवली आहे! "

आपल्या विसराळू नवऱ्याकडे ती बघतच राहीली. तिला समजेना हसावं की काय रिअक्ट करावं. तिने त्याच्या ऑफिस बॅग मधून त्याने काल बनवलेली यादी त्याच्या समोर ठेवली.

" बॅग मध्येच ठेवली होती. विसराळू "

ती त्याचे केस विसकटत म्हणाली. नंतर दोघंही एकमेकांच्या कडे बघुन खळखळून हसायला लागले.


🎭 Series Post

View all