देविकाने आज सासरचा उंबरठा कायमचा ओलांडला. गेल्या पाच वर्षांत तिच्या सासूबाईंनी तिला खूप त्रास दिला होता. केवळ यशच्या म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या प्रेमापोटी ती सासरी राहत होती. पण आज सगळे सहन करण्यापलीकडे गेले होते. अखेर आपल्या दोन वर्षांच्या वेद ला घेऊन ती घराबाहेर पडली. यश ने खूप विनवण्या केल्या.. मी आईला समजावतो... तू घर सोडून जाऊ नकोस म्हणून.. पण देविका ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तो ही तिच्या मागोमाग घरातून बाहेर पडेल अशी आईला भीती वाटत होती म्हणून त्यांनी यशला तू घरातून पाऊल बाहेर ठेवशील तर मी माझ्या जिवाचं बरं वाईट करून घेईन अशी धमकी दिली.. आणि घर सोडून जाणाऱ्या सुनेला पाहून त्या काही-बाही बोलत राहिल्या.
यश आपल्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होता...पण देविका केव्हाच निघून गेली होती.
देविका माहेरी पोहोचली. तिला अचानक, अवेळी आलेली पाहून आई- वडील काळजी करू लागले. ती काहीच बोलत नाही हे पाहून बाबांनी यश ला फोन केला. त्याने देविका घरी सुखरूप पोहोचली याची खात्री करून बाबांना सर्व काही सांगितले. देविकाच्या आई- वडिलांना तिच्या सासूच्या स्वभावाचा थोडा फार अंदाज होताच.. पण गोष्टी या टोकाला जातील याचा त्यांनी कधी विचार ही केला नव्हता.
अगदी लहान सहान कारणांवरून सासूबाई देविकाचा अपमान करत, सतत यश समोर तिची तक्रार करत. तिच्याकडून झालेल्या चूका माघारी आपल्या नातेवाईकांना सांगत. देविकाने सुरुवातीला या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि यश ने ही कधी हे सारे मनावर घेतले नाही. त्याला आपल्या आईचा स्वभाव चांगलाच माहित होता.
अशातच वेद चा जन्म झाला. आता सर्व काही सुरळीत होईल असे दोघांना ही वाटत होते. पण तसे न होता देविकाला बाळाला सांभाळता येत नाही, त्याचे नीट काही करता येत नाही, आम्हाला ही दोन मुलं झाली की.. पण अशी नाटकं आम्ही केली नाहीत.. अशा वाक्यांची भर पडली..
वेद लहान होता त्यामुळे देविका ला अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. यश ही जमेल तसे वेदसाठी सगळं करायचा. हे पाहून सासूबाई अजूनच चिडायच्या. स्वतः काहीही न करता सारे काही पाहत राहायच्या. वेद ला त्यांनी कधी जवळ घेतले नाही की त्याचे लाड ही केले नाहीत.
देविका आणि वेद जसे घरातून गेले, तसे यश ला घर रिकामं वाटू लागलं. वारंवार आठवण येऊ लागली दोघांची...
देविकाच्या माहेरी तो अनेक वेळा जात असे. अडून अडून तिला घरी परत येण्यास सुचवत होता. पण देविका पहिल्यासारखी वागत नव्हती त्याच्याशी. मनातून ती खचून गेली होती.. त्या घरात पुन्हा पाऊल ठेवण्याची देखील मनस्थिती नव्हती तिची.. तिच्या आई -वडिलांना ही वाटत होते की देविकाची मनस्थिती ठीक होईपर्यंत यश ने तिच्या सोबत वेगळे राहावे. मग पुढचे पुढे पाहता येईल.. हळू हळू सगळे नीट होईल.
यश ला ही हा विचार पटत होता.
आईने कधी देविकाशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला नाही हे यश ला चांगलेच माहित होते. तसे आईने आपल्या आजी सोबत तरी कुठे पटवून घेतले होते? कळत्या वयापासून पाहत होता तो..
आणि हा थोडया दिवसांचा तर प्रश्न आहे.. कदाचित आईला तिची चूक कळेल ही.. पुढे सर्व काही नीट होणार असेल तर थोड कठोर व्हावे लागेलच...यश ने आपल्या मनाची समजूत घातली.
दुसऱ्याच दिवशी यश ने आईला आपला निर्णय सांगितला. अपेक्षेप्रमाणे आईने त्याला विरोध केला. खूप आरडा-ओरड केली. मात्र त्याने लक्ष दिले नाही. मनातून यश नाराज होता. कारण आई एकटी पडणार होती... पण नाईलाज होता..
थोडयाच दिवसांत देविका आणि यश आईंच्या घराजवळ रेंटवर घर घेऊन शिफ्ट झाले. देविकाचे आई- वडील मदतीला होते. शिवाय देविका ही आता खूप सावरली होती. नव्या घरी खूप मोकळं वातावरण अनुभवत होती.
यश आईच्या संपर्कात होताच.. देविकाला त्याने तिचा वेळ दिला होता.. आज ना उद्या तिचा ही राग मावळेल आणि आईला ही तिची चूक कळेल याची खात्री होती त्याला.
वेद आता शाळेत जाऊ लागला. देविका आपल्या संसारात सुखी,समाधानी होती. पण का कुणास ठाऊक! आपल्या सासूसाठी तिच्या मनात कुठेतरी एक हळवा कोपरा तयार होत होता. किती ही झाले तरी शेवटी यश ची आई होत्या त्या. यश आईला आपल्या माघारी फोन करतो, किमान दोन दिवसांनी एकदा त्या घरी चक्कर मारतो. हे ही माहित होते तिला. आई एकट्या कशा राहत असतील? काय करत असतील? त्यांना आमची आठवण येत असेल का? असे खूप सारे प्रश्न तिच्या मनात होते.
एक दिवस न राहवून यश ला तिने विचारले.. झाले गेले विसरून आई पुन्हा आपल्या सोबत राहतील का? तसा यश हसून बोलला...आईला जाणीव झाली आहे कधीच..ती चुकीचं वागली आहे...आणि ती मला हा प्रश्न मला रोजच विचारते.. सूनबाई झाले गेले विसरून माझ्यासोबत राहील का?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा