विश्वास..!
'विश्वास' असेल तर जग जिंकण कठीण नाही. मग तो स्वतःवर असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर. विश्वास हा केवळ शब्द नाही तर तो प्रत्येक नात्यातील महत्त्वाचा भाग आहे. विश्वास कोणावर ठेवावा? हा प्रश्न सतत प्रत्येकाला पडणारा, विचार करायला लावणारा असा हा शब्द आहे. कारण 'विश्वास' शब्दच असा आहे की, जो मनाला मोकळं करतो. मनातील भाव व्यक्त करतो. आपले विचार बोलून व्यक्त केल्यावर चांगले वाटते. पण आपण ज्यांच्याशी बोलत आहोत, त्यांना आपण आपल्या मनातील सुख, दुःख, प्रेमळ भावना तर काही, कोणी दिलेल्या असह्य वेदना या मोकळ्या मनाने सांगत असतो.आपण कसलाही विचार न करता व्यक्त होतो. पण असं असताना भावनेच्या आहारी येऊन सर्व काही न जाणता समोरच्या व्यक्तीला पूर्णतः न ओळखता प्रत्येक गोष्ट सांगणे बऱ्याचदा धोक्याचेही ठरू शकते. आपण एक दोनदा भेटलो, चांगली मैत्री झाली, सोबत येणे जाणे रोजचं असले, बोलता बोलता बऱ्याच गोष्टींना नकळत उजाळा दिला जातो. एक एक करत बऱ्याच गोष्टी आता ना कसला विचार करता समोरच्या व्यक्तीला सहज सांगितल्या जातात. आता हा समोरचा व्यक्ती हा अनोळखी असेल तर धोका उद्भवू शकतो. पण बऱ्याचदा अनोळखी लोकांपेक्षा काही जास्त आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. की हा माझा खूपच चांगला मित्र आहे किंवा मला या व्यक्तीजवळ हक्काने व्यक्त होता येते. येथे ना कसली भीती ना कसला लाजाळूपणा, मस्त मोकळ्या मनाने आपण आपल्याविषयी आपल्या घरच्यांविषयी गप्पा करतो. पण याचे होते असे की समोरचा व्यक्ती हा खरच विश्वास ठेवण्यासारखा असतो का? की केवळ फक्त हे आपल्यालाच वाटते? यातून आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते.मैत्री असो किंवा एखाद प्रेमळ नातं, यात कोणतेही नातं म्हणणं याला हरकत नाही. सर्वच नाते हे विश्वासावर टिकून असतात. जेथे विश्वासाला ठेच लागते, तेथे ते नातं जास्त दिवस टिकत नाही. सतत त्यात वाद सुरूच राहतो. येथे आपला स्वभाव ही खूपच महत्त्वाचा धरला जातो. बऱ्याच लोकांना सवय असते. एकाच ऐकाच आणि दुसऱ्याला सांगायचं. दुसऱ्याची गोष्ट ज्याला त्याला सांगायची. एकंदरीत संपूर्ण गावात किंवा लोकात त्या व्यक्तीला घेऊन, त्याच्या बोलण्याला घेऊन चर्चा मस्करी करतांना दिसतात. अशी व्यक्ती कोणाचा विश्वास जिंकू शकत नाही व कोणाचा विश्वास ठेवण्याच्या लायकीची ही ठरत नाही. पण कोणतेही नाते हे विश्वासावर टिकून असते. उदाहरणार्थ, बरेच मुलं आपल्या आई-वडिलांपासून बऱ्याच गोष्टी लपवतात. आई-वडिलांशी बोलताना त्यांना भीती वाटते. होते असं की असे मुलं हे वाईट मुलांच्या संगतीमध्ये मिसळल्या जातात. आणि मग त्यांना वाईट सवयी लागतात. आई-वडिलांना म्हणावं तस जास्त महत्व देत नाही. ते आपल्या मनातील गोष्टी ते इतरांशी शेअर करतात. आई-वडिलांपेक्षा जास्त महत्व ते आपल्या मित्रांना देतात. स्वतःच्या मुलांच्या बऱ्याच गोष्टी या स्वतः जन्म देणाऱ्या आई वडिलांना ही माहिती नसतात. त्या गोष्टी इतरांकडून माहिती पडतात. हे ऐकून आई-वडिलांनाही वाईट वाटते. पण प्रश्न हा आहे की नेमका हा विश्वास ठेवायचा कोणावर. कारण विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती कोण किंवा ज्याच्याबरोबर आपण बोलतो बऱ्याच गोष्टी शेअर करतो ती व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे काय? म्हणजे विश्वासाच्या लायकीची आहे काय ? महत्वाच सांगायचं झालं तर आपल्या जवळचे आपले आई वडील ही पहिली व्यक्ती अशी असते की आपण त्यांच्याजवळ पूर्ण विश्वास ठेवू शकतो. आपल्याला जन्म देणारे आपले आईवडील हे केवळ आपले आईवडील तर आहेच, पण आपल्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळे ही इतकी सुंदर सृष्टी, देखणं जगं आपल्या नजरेस पडलं. आपण त्यांच्यामुळे सुखाने जीवन जगत आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आपण लहानपणापासून तर अगदी तरुण होईपर्यंत, स्वतः पैसे कमावण्यापर्यंत आपण पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असतो. आपल्याला काय आवडते काय आवडत नाही, प्रत्येक आवडीनिवडी आपल्या आईवडिलांना माहित असतात, म्हणून आपले आईवडील ही विश्वास ठेवण्यासारखी पहिली व्यक्ती आहे. आपला सतत चांगला विचार करणारी, सतत आशीर्वाद, प्रेरणेची थाप देणारी दैवत आहे. नंतर जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त आपण स्वतः आहोत. आपण स्वतःवर विश्वास ठेवावा, होईपर्यंत स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करावा. काय इतरांना सांगावे, काय सांगू नये, हे पडताळून बघावे. कठीण प्रसंगात चर्चा करताना मात्र आपल्या आईवडिलांना प्रथम स्थान द्यावे. आपल्या अडचणी त्यांना सांगाव्यात. आपली आवड त्यांना सांगावीत. त्यातून चांगला योग्य मार्ग निघेल. आणि त्यांचा अनुभव, त्यांच वय, त्यांनी बऱ्याच सुख-सुखांचे प्रसंग अनुभवलेले असल्यामुळे ते योग्य सल्ला देतील. व तो सल्ला फायद्याचाही ठरेलं. शेवटी इतकेच म्हणेल विश्वासा अशा व्यक्तीवर ठेवावा जो आपल्या अंतकरणातील गोष्टींना ओळखत असेल. जसे आपल्या हसण्यामागील दुःख, रागावण्यामागील प्रेम, आणि शांत राहण्यामागचे कारण, जाणत असेल. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही कोणाचा विश्वासघात मात्र आपण करू नये. कोणी आपल्याला काही सांगितलेलं असेल एखादी गुपित गोष्ट सांगितलेली असेल. तर आपण त्यात खरे उतरावे. ती गोष्ट कोणालाही सांगू नये. कारण कदाचित त्यामुळे एखादाच आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आपला जर कोणी विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद द्यावे कारण अशी व्यक्ती जीवनाची रीत समजावून जातात, कोणावर चुकूनही विश्वास ठेवू नये हेही कळते. एखाद्यावर विश्वास ठेवणे खूपच मोठ जिकरीच काम आहे. पण तरीही आजही विश्वासावर हे जगं कायम टिकून आहे. हेही तितकेच खरे आहे.
'विश्वास' हा शब्द केवळ
विश्वासाच्या आधारावर टिकतो
व्यक्तीकडून का तुटला तो
मग त्या व्यक्तीवरून विश्वास
कायमचाचं मिटतो...
विश्वासाच्या आधारावर टिकतो
व्यक्तीकडून का तुटला तो
मग त्या व्यक्तीवरून विश्वास
कायमचाचं मिटतो...
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा