Login

व्यभिचाराची किंमत १० अंतिम भाग

लोभ आणि व्यभिचाराचे फळ
अंतिम भाग

पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्याची संपूर्ण गावाला उत्सुकता लागली होती.

तीन दिवसांनी सब-इन्स्पेक्टर साजिदच्या टेबलावर तो रिपोर्ट येऊन ठेवला गेला.

पहिल्याच ओळीत संपूर्ण प्रकरण उलटवणारे शब्द होते. निखिल मृत्यू प्रमाणपत्रानुसार हृदय विकाराने गेलेला नव्हता.

"मृतदेहाची बाह्य व आंतरिक तपासणी केली असता, नाक व तोंडाभोवती सौम्य लालसरपणा व सूक्ष्म घर्षणाच्या खुणा आढळून आल्या. ओठ सुजलेले होते व डोळ्यांच्या पापण्यांच्या आत लहान लाल ठिपके (पिटेकियल रक्तस्राव) दिसून आले. फुफ्फुसांत रक्तसंचय व सूज आढळली असून श्वसनमार्गात फेसाळलेला द्रव उपस्थित होता. गळ्यावर काळा डाग आढळला, या सर्व वैद्यकीय निष्कर्षांवरून आधी गळा दाबून प्रयत्न झाला असेल, त्यानंतर नाक व तोंड अडवल्यामुळे झालेल्या यांत्रिक गुदमरवणुकीमुळे मृत्यू झाल्याचे मत नोंदविण्यात येत आहे. मृत्यूचा प्रकार संशयास्पद व खुनाचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

साजिदने डोळे मिटले. आता शंका राहिली नव्हती. निखिलचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तो थंडपणे करण्यात आलेला खून होता. त्या दिवशी मनिषाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. सुरुवातीला दोघेही शांत होते.

मनिषा हुंदके देत म्हणाली,

“साहेब, मी दुर्दैवी बाई आहे… माझा नवरा…मला या जगात एकटे सोडून गेला आता मला कोणाचाच आधार नाही.”

पण साजिदने रिपोर्ट तिच्यासमोर ठेवला.

“ताई, गळ्यावरची खुण अपघाती नाही. तो गळा दाबून आणि नंतर नाक तोंड दाबून मेलेला आहे.”

त्या क्षणी मनिषाच्या चेहऱ्यावरून सगळा रंग उडाला. तिने नजर खाली घातली. हात थरथरू लागले.

साजिदने प्रश्नांचा मारा सुरू केला.

“त्या रात्री तुमच्या शिवाय अजून घरात कोण होते?”

“दार आतून बंद होते का?”

“दिनेश तिथे आला होता का?”

मनिषा प्रत्येक प्रश्नाला अडखळत उत्तरे देत होती. तासाभराच्या चौकशीनंतर ती खुर्चीत कोसळली.

“थांबा… थांबा…” ती अचानक ओरडली.

“मी सांगते… सगळे सांगते…”

खोलीत एकदम शांतता पसरली. तिने अश्रूंमध्ये कबुली द्यायला सुरुवात केली.

“निखिलचा दोन कोटींचा विमा होता साहेब…अपघाती मृत्यू दाखवला तर सगळे पैसे मला मिळणार होते.”

मनिषा पुढे बोलू लागली.

“काही दिवसांपूर्वी मी आणि दिनेश… आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो होतो आणि हे त्याला कळण्याच्या मार्गावर होते. आम्हाला नवीन संसार थाटायचा होता आणि त्या पैश्याशिवाय ते शक्य नव्हते.”

तिचा आवाज थरथरत होता.

“त्या रात्री, मी आधी झोपेचे औषध त्याच्या पाण्यात टाकले, तो गाढ झोपला मग दिनेशला फोन करून बोलावले तो आला आणि…”

ती थांबली, आणि ओक्साबोक्शी रडू लागली, यावेळी तिचे रडणे खरे होते. डोळ्यांतून अश्रूंचे लोंढे वाहू लागले.

“…आणि मी आणि दिनेशने मिळून उशीने त्याचा गळा दाबला.”

खोलीत बसलेले सगळे हादरले.

“फक्त पैशांसाठी?” साजिदने कठोर आवाजात विचारले.

“दिनेशच्या प्रेमासाठी,” ती वेड्यासारखी म्हणाली.

“नवीन आयुष्य, श्रीमंत संसार त्या स्वप्नांसाठी मी माझ्याच नवऱ्याचा बळी दिला.”

पोलिसांनी दिनेशला अटक केली.

“साहेब, तिनेच सगळे केले!” तो घाबरून म्हणाला.

मनिषाने त्याच्याकडे पाहिले, अशा परिस्थितीत तो स्वतःला वाचवू पाहत होता.

तिने दिनेशने आधीच तीन गुंडांना सुपारी दिली होती, झोपेचे औषध देखील त्यानेच आणून दिले होते, हे सांगून टाकले. सगळे कॉल रेकॉर्ड्स, व्यवहार, साक्षी पुरावे तपासताच साजिदने दोघांना मनुष्य वधाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

काही दिवसातच दिनेशने निखिलसाठी पाठवलेले गुंड देखील सापडले आणि त्यांनी सगळ्यांनी एकमताने दिनेशचे नाव घेतले.

दिनेश आणि मनिषाच्या हातात बेड्या पडल्या. न्यायालयीन कारवाई सुरू झाली. काही महिन्यांत निकाल लागला.

मनिषा आणि दिनेश यांना जन्मठेप देण्यात आली. राज्या, मुक्ता आणि सचिन यांना सात वर्षाची कठोर शिक्षा दिली गेली.

पण या सगळ्यात मोठा पराभव झाला होता, तो त्या तीन निष्पाप जीवांचा. निखिलची तीनही मुले आता आई-बापाविना अनाथाश्रमात राहायला लागली. ना आईची माया ना वडिलांचे छत्र, हसत्या खेळत्या घरामध्ये विष मिसळले एका चुकीच्या स्वप्नासाठी एका बायकोने आपल्या तीन मुलांचे आणि नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते.


समाप्त

भालचंद्र नरेंद्र देव

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.