Login

व्यभिचाराची किंमत १

लोभ आणि व्यभिचारातून जन्मलेला खून
भाग १ 

“आज परत उशीर होणार का?”

“तुझ्या हातचा चहा मिळतोय ना, मग ऑफिसला उशीर झाला तरी चालेल.” निखिल हसून म्हणाला.

“इश्श, असे बोलू नकोस… आता मुले मोठी होऊ लागली आहेत, ऐकतील ती!!!!!!.” ती थोडी लाजत म्हणाली.

“ते ऐकतील तर कळेल ना की त्यांच्या आईवर बाबा किती प्रेम करतात.” निखिलने हसत तिच्या कपाळावर ओठ ठेवले.

“आपण फारच सुखी आहोत… कोणाची नजर लागू नये आपल्या संसाराला.”

“आपण कोणाचे वाईट केले नाही, मग आपल्याला कोण कशाला नजर लावेल , उगाच घाबरू नकोस?” निखिलने प्रेमळ समजूत घातली.

पावसाने धुऊन निघालेले ते रत्नागिरीतील छोटेसे गाव अतिशय सुंदर दिसायचे. कौलारू घरांच्या रांगेत, पिंपळाच्या झाडाखाली असलेले निखिल शेख याचे घर तर गावकऱ्यांसाठी नेहमीच “आदर्श कुटुंब” म्हणून ओळखले जायचे.

निखिल खासगी फायनान्स कंपनीत कर्जवसुली आणि खात्यांची तपासणी करणारा जबाबदार कर्मचारी होता. त्याच्या चेहऱ्यावर कायम सौम्य हास्य आणि प्रामाणिकपणा असायचा, म्हणूनच कंपनीतही त्याच्यावर सगळे जण विश्वास टाकू शकायचे.

तेरा वर्षांपूर्वी त्याने मनिषाशी प्रेमविवाह केला होता. त्या काळात गावात प्रेमविवाह म्हणजे धाडसाचे पाऊल मानले जायचे, पण निखिल आणि मनिषाच्या प्रेमाने ती सगळी बंधने तोडली होती. मनिषा खासगी शाळेत मराठी आणि इतिहास शिकवायची. विद्यार्थ्यांची लाडकी “मनिषा बाई” म्हणून तिची ओळख होती.

त्या दोघांच्या प्रेमाच्या तीन निशाण्या होत्या, म्हणजेच तीन मुले, पहिला अथर्व, दुसरी स्नेहा आणि सर्वात शेवटी छोटा आरव. तिघेही त्यांच्या आयुष्याचा गाभा होती. दररोज सकाळी शाळेची लगबग असे. निखिल देखील प्रत्येक गोष्टीत मनीषाला मदत करत असे. मनीषा सकाळी स्वयंपाक घरात जेव्हा गढलेली असे, तिथपर्यंत तो मुलांची आंघोळ पांघोळ, केस आणि दप्तर देखील आवरून ठेवायचा.

तोपर्यंत स्वयंपाकघरातुन मनिषाचा गोड स्वर निघायचा, “अथर्व, नाश्ता थंड होतोय!” हे दृश्य रोजचेच होते.

गावात त्यांच्याबद्दल आदर होता. कुणी म्हणायचे, “माणूस असावा तर निखिलसारखा”, तर कुणी म्हणायचे, “मनिषासारखी बायको प्रत्येकाला मिळावी.” गावातील सगळ्या सण-समारंभात दोघेही पुढे असायचे, गरजूंसाठी मदत करायचे.


पण पांढऱ्या कपड्यांना कधीतरी डाग लागतोच, आणि मग तो प्रत्येकाच्या दृष्टीत येतो. येथे देखील असेच काही होते. या गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या कुटूंबाला खरंच कोणाची तरी नजर लागणार होती.

निखिलच्या ऑफिसमध्ये काही गोष्टी अशा होत्या ज्या त्यांच्या वरिष्ठांनी गुपचूपपणे केल्या होत्या. गोपनीय दस्ताऐवज निखिलवर कोणी संशय घेणार नाही म्हणून ते निखिलच्या कपाटामध्ये लपवून ठेवले होते.

त्यात काही कर्जखात्यांचे तपशील आणि त्याचे निर्णय घेतल्याच्या सही शिक्यानिशी असलेले करार होते, याबद्दल निखिलला मात्र काहीही माहित नव्हते. तो बिचारा आपले काम निपक्षपणे आणि चोख करत असायचा, पण हे कधीपर्यंत चालणार यातच खरी गोम दडलेली होती.

कदाचित येणारे वादळ यापेक्षा देखील खूप वेगळे होते आणि ते लवकरच जवळ येऊन ठेपणार होते. हे आदर्श कुटुंब लवकरच अशा गुन्ह्याच्या सावलीत सापडणार होते, ज्याची गावातील कुणालाच कल्पना आलेली नव्हती, आणि सगळ्यात आधी त्याचा परिणाम निखिलच्या आयुष्यावर होणार होता, जे बघून गावातलाच नाही तर पंचक्रोशीतील प्रत्येक जण हादरला असता.


क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®
0

🎭 Series Post

View all