Login

व्यभिचाराची किंमत २

लोभ आणि व्यभिचारातून घडलेला खून
भाग २ 


शाळेचे नवीन वर्ष सुरू होत होते, पहिल्या दिवशीच मनीषा बाईंनीं सर्व शिक्षकांच्या बैठकीत एक नवा चेहरा पाहिला. नुकताच तो शाळेत रुजू झाला होता, त्याचे नाव होते दिनेश भाटकर. नवा शारीरिक शिक्षणाचा शिक्षक, उंच, जोमदार शरीरयष्टी, आत्मविश्वासाने भरलेली देहबोली प्रत्येकाला आकर्षित करत होती. त्याच्या बोलण्यात एक सहज ओढ होती. त्याचे शाळेत येणे, वावरणे, अगदी त्याचे मोत्यासारख्या दातांनी हसणे देखील शाळेतील अनेक शिक्षकांच्या नजरेत भरू लागले,  या सगळ्या गोष्टींमुळे ज्याच्या त्याच्या बोलण्यात दिनेशचेच नाव होते, आणि मनीषाची मनस्थिती देखील त्याला अपवाद नव्हती.

सुरुवातीला दोघांचे बोलणे फक्त कामापुरते होते. शाळेतील विविध कार्यक्रम, प्रात्यक्षिके, आणि शिक्षक बैठका यात ते एकमेकांसोबत येत होते.

एकदा एका बैठकीनंतर दिनेश म्हणाला,

"मनीषा मॅडम, तुम्ही जेव्हा वर्गात शिकवता, तेव्हा विद्यार्थ्यांचे लक्ष अगदी एकाग्र असते …हे खरंच कौतुकास्पद आहे." 

मनीषा थोडी लाजली. "थॅंक्यू, पण तुमचे देखील खेळांचे नियोजन कमाल आहे. सगळी मुले खूप उत्साहाने भाग घेतात." 

हळूहळू त्या दोघांत एक सुसंवाद तयार होत गेला. एकत्र चहा घेणे, डबा खाणे, शिक्षकांच्या बैठकीत हळूच एकमेकांकडे कटाक्ष टाकणे आणि, एक दुसऱ्याच्या कार्यक्रमांच्या तयारीत मुद्दाम मदत करायला येणे, हे आता रोजचेच झाले होते.

एकदा शाळेच्या वार्षिक क्रीडास्पर्धेनंतर सगळे शिक्षक घरी गेले होते, पण दिनेश आणि मनीषा शाळॆत अजून थांबले होते. थकवा झटकण्यासाठी दोघे शाळेतील मैदानाच्या एका बाजूला बसले होते.

"मॅडम एक खासगी प्रश्न विचारू का ?" दिनेशने हळूच विचारले.

"आज काय नवीन, विचारा ना तुम्हाला मी कधी नाही म्हटले आहे का?" मनीषा लगेच म्हणाली.     

"तुमचे लग्न झाले आहे ना?"   

मनीषा क्षणभर गप्प झाली. "हो… निखिल आहे त्याचे नाव. तो फायनान्स कंपनीत काम करतो… आणि आम्हाला तीन मुले देखील आहेत, दोन मुलगे आणि एक मुलगी." 

"तीन?" दिनेश थोडा स्तब्ध झाला.

"पण तुम्ही इतक्या … म्हणजे… तुम्ही अजूनही फार तरुण दिसता."

ती हसली, "चला काहीतरीच काय बोलता मी काही इतकी तरुण नाही, मुलीचे वय सांगायचे नसते नाहीतर तुम्हाला माझी जन्म तारीख आणि वर्ष देखील सांगितले असते"  

दिनेश तिचे बोलणे ऐकत होता. तो तिच्या डोळ्यांत हरवून गेला होता. त्याला तिच्याशी काहीतरी वेगळे बोलायचे होते, कदाचित तिच्याबद्दल असलेले एक वेगळे आकर्षण त्याला देखील जाणवू लागले होते. 

"तुम्ही नक्की ठिक आहात ना? कधी कधी तुम्ही खूप विचार करताना दिसतात" त्याने उगाच काहीतरी विचारले.  

"मी ठिक आहे… फक्त… कधीतरी कुणाबरोबर मनमोकळे बोलावेसे वाटते… निखिल नेहमी त्याच्या कामाच्या धुंदीत असतो त्यामुळे थोडे मन संकुचित होते," ती म्हणाली.

"मग माझ्या बरोबर बोलत जा ना, नाहीतरी आता आपण एकत्रच असतो शाळेत." दिनेश मनातले बोलून गेला.   

त्या क्षणी त्यांच्यातील मैत्रीचे नाते एका वेगळ्याच दिशेला वळत होते. एकमेकांच्या जवळ येणे, मनातील प्रत्येक गोष्ट सांगणे, आणि त्यामुळेच त्यांच्या मनात नकळत प्रेम उमलू लागले होते.

दुसऱ्याच दिवशी मनीषाने त्याच्यासाठी एक लहान डब्बा वेगळाच आणला.

"काल क्रीडास्पर्धेत तुझी भरपूर दमछाक झाली… म्हणून आज मी तुझ्यासाठी काहीतरी खास केलंय," ती म्हणाली. 

दिनेश आश्चर्याने म्हणाला, "तुम्ही माझ्यासाठी डब्बा आणलात? हे… माझ्यासाठी खूप स्पेशल आहे." 

त्या डब्ब्यातील लाडवातून त्यांच्या नात्याचा गोडवा वाढत होता.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®
0

🎭 Series Post

View all