Login

व्यभिचाराची किंमत ५

लोभ आणि व्यभिचारातून घडलेला खून
भाग ५:

त्या संध्याकाळी निखिल आपल्या ऑफिसमधून दुचाकीवरून घरी परतत होता. वातावरण निरभ्र होते, रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. स्टेशन रोडच्या एका वळणावरून पुलाकडे जात असताना, एका गाडीत अंधारात दबा धरून बसलेल्या त्या गुंडांनी बरोबर संधी साधली.

मागून येऊन त्यांनी त्यांच्या गाडीने निखिलच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली.

"धडाम!" असा आवाज झाला आणि निखिल हवेत उडाला, दुचाकीचे मागचे चाक वाकडे झाले

त्याचे शरीर खाली जमिनीवर न पडता सरळ रस्त्यालगतच्या पुलावरून खाली वाहणाऱ्या नदीत फेकले गेले. काही क्षण सगळे शांत झाले असे वाटले.

त्या गुंडांनी दूर उभे राहून पाहिले, रस्त्यावर कोणी बघणारा नसल्याने कुठलाही गोंधळ झाला नाही, रक्त नाही, आणि कोणी साक्षीदार देखील नाही.

सचिन म्हणाला, "आपले काम झाले असे वाटते... कोणाचे लक्ष देखील गेले नाही!"

राज्या थोडा साशंक होता, "तरीसुद्धा थांबून पाहायला हवे."

मुक्ता म्हणाली, "चल लवकर... पोलिस केस झाली तर आपण सगळे अडकू."

ते तिथून लगेच सटकले.

पण दैवाला काही वेगळेच मान्य होते.

नदीत पडलेला निखिल खूप गंभीररीत्या जखमी झाला नव्हता. पाण्यामुळे आघात कमी झाला होता.पाण्यात मोठा आवाज झाल्यामुळे किनाऱ्यावरील काही कोळी लगेच पाण्यात सूर मारून आत शिरले आणि काही क्षणातच त्यांनी निखिलला आधार देऊन नदीच्या किनाऱ्यावर आणले.

नाका तोंडात पाणी गेल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. त्या सगळ्यांनी त्याला तात्काळ दवाखान्यात नेले.

गावभर बातमी पसरली, “निखिलचा अपघात झाला… पण देवाच्या कृपेने तो वाचला!”

लोक म्हणू लागले, "दैवाचे बळ आहे त्याच्यापाशी... इतका मोठा अपघात होता, त्याची दुचाकी पूर्णपणे निकामी झाली आहे तरी देखील त्याचे एकही हाड तुटलेले नाही!"

पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली. काही साक्षीदारांनी अंधुकसे वर्णन दिले,  जवळच एका CCTV मध्ये एक काळसर रंगाची गाडी अंधारात उभी राहून नंतर निखिलच्या दुचाकीच्या मागे निघाली होती.

पोलिसांचे लक्ष ती गाडी शोधण्याकडे वळले."हा अपघात नाही, हेतुपुरस्सर कट आहे" त्यांना सगळीकडे चौकशी सुरु केली.

सचिन, राज्या आणि मुक्ताला जेव्हा हे समजले, तेव्हा ते हादरले.

सचिन म्हणाला, "हा माणूस मेलाच नाही... आणि पोलिस चौकशी सुरू झालीये!"

राज्या थरथरत म्हणाला, "बघा मी सांगत होतो, तो मेला आहे का याची खात्री करूया, पण तुम्ही माझे ऐकले नाही, आता आपण गावात जास्त दिवस थांबू शकत नाही, सगळे फसण्याची शक्यता आहे."

मुक्ता : " इथून पलायन हा एकमेव उपाय आपल्याकडे आहे."

ते तिघेही आप-आपले मोबाईल बंद करून गावाबाहेर पसार झाले, त्यांनी स्वतःबद्दल कोणालाही काहीही कळवले नाही.

दुसरीकडे दिनेशने संदीपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा देखील फोन बंद होता. काही तासांतच त्याला कळाले की ज्यांना त्याने सुपारीसाठी पैसे दिले होते ते तिघे गाव  सोडून पळून गेले होते.

दिनेशचा गोंधळ वाढला, चवताळून त्याने कसेबसे संदीपला गाठले आणि म्हणाला, "हे काय चाललंय? त्यांनी नीट काम केले नाही आणि माझे पैसे देखील घेऊन पळून गेले? आता माझे काम कोण करणार? "

संदीपने देखील त्याच्यासमोर हात जोडले आणि काही दिवस मला भेटू नको असे बजावले.

मनीषाच्या मनात आता पुढे कसे होणार याची भीती घर करून बसली होती.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®
0

🎭 Series Post

View all