भाग ६
मनीषा दिनेशवर चिडली होती, त्याच्याकडून एक काम देखील नीट होत नव्हते, तिने त्याला फोन केला.
"अगं ते गुंड पळून गेले, नेताना माझे सगळे पैसे आणि चैन पण घेऊन गेले." दिनेश तिला म्हणत होता.
"तु थांब आता, मीच काहीतरी करते, मला आता या माणसासोबत एक दिवसही राहायची इच्छा नाही. कधी आपण एकत्र येऊ असे झाले आहे. तु फक्त घरात तयार रहा, मी बोलावल्यावर लगेच ये." मनिषाने बोलून फोन बंद केला.
रात्रीचे जेवण उरकल्यावर घरात नेहमीसारखी थोडीशी किरकिर झाली. दिवसभराच्या कामाने थकलेला निखिल शेवटी सगळीकडे दुर्लक्ष करून हातपाय ताणत झोपायला निघाला. त्याच्या कपाळावर आठ्या सहज दिसू शकत होत्या. हे फक्त काही दिवसांसाठी आहे, नंतर सगळे नीट होईल आणि मनीषा पुन्हा आपल्यावर प्रेम करू लागेल असे त्याला वाटत होते.
हे विचार डोक्यात येताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान आले. आयुष्य सुरळीत होईल, असे त्याला वाटत होते. बाजूलाच उभी असलेली मनीषा मात्र वेगळ्याच विचारात गुंतलेली होती. तिच्या चेहऱ्यावरची शांतता वरवरची होती; आत कुठेतरी खोल अस्वस्थता दडलेली होती.
निखिल अंथरुणावर पडताच मनीषा स्वयंपाकघरात गेली. “पाणी घेऊन येते,” असे सहज म्हणत तिने तांब्या भरला. त्या पाण्यात तिने आधीच दहा झोपेच्या गोळ्या विरघळवून ठेवल्या होत्या. तिच्या हाताला क्षणभर कंप आला, पण तिने स्वतःला सावरले. अनेक दिवस मनात साठलेली कटुता, राग आणि निराशा आज कृतीत उतरवायचा दिवस आला होता.
तिने तांब्या भांडे निखिलच्या बाजूला ठेवले. तहान लागल्यामुळे निखिलने पाणी उचलून प्यायला सुरुवात केली. पहिल्याच घोटाला त्याला थोडी गोडसर, विचित्र चव जाणवली. त्याने क्षणभर भुवया उंचावल्या, पण “कदाचित ग्लास नीट न धुतल्याचा परिणाम असेल,” असा विचार करून त्याने दुर्लक्ष केले. दिवसभराचा थकवा इतका होता की शंकेला जागाच उरली नाही.
काही मिनिटांतच त्याच्या पापण्या जड होऊ लागल्या. शरीर सुस्त झाले, डोळे आपोआप मिटू लागले. मनीषा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. निखिल खोल, गाढ झोपेत गेला, आणि खोलीत फक्त घड्याळाच्या टिक-टिकचा आवाज उरला.
मनिषाने निखिलला एक दोनदा हाक मारली, लहानसा चिमटा काढला, पण निखिलला त्याचा काहीच पत्ता नव्हता. निखिल पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री होताच मनीषाने फोन उचलला आणि दिनेशला फोन केला. आवाज दाबून, घाईघाईत तिने त्याला लगेच घरी येण्यास सांगितले. काही मिनिटांतच दिनेश घरात आला. दोघांमध्ये फारसे बोलणे झाले नाही; शब्दांची गरजच उरली नव्हती, सगळे आधीच ठरलेले होते.
दिनेशने आधी हाताने निखिलचा गळा दाबायचा प्रयत्न केला, पण हात दुखायला लागल्याने त्याने तो प्रयत्न तसाच सोडला. मनीषाने उशी उचलून निखिलच्या तोंडावर धरली. दिनेशने त्यावर जोरदार दाब दिला, मनिषाने त्याच्या हालचालींना साथ दिली. खोलीतली शांतता अधिकच गडद झाली. काही क्षणांतच सगळे संपले. निखिल पूर्णपणे शांत झाला, कोणताही प्रतिकार नाही, कोणतीही हालचाल नाही.
मनीषा काही वेळ तिथेच उभी राहिली. काही मिनिटांसाठी आपण चुकीचे वागलो का याबद्दल तिच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली होती, पण दिनेशने तिला सावरले. आयुष्याच्या एका टप्प्याचा शेवट झाला होता, पण पुढे काय आहे, याची तिला कल्पनाही नव्हती. अजूनपर्यंत बाहेर कोणालाही काहीही माहित नव्हते.
दिनेश आला तसा गुपचूप निघून गेला, जणू काही घडलेच नाही असे समजून मनीषा सकाळपर्यंत त्याच्या प्रेताबरोबर झोपून होती. आपण जे केले त्यात काहीही चूक नाही हे तिच्या मनाने ठरवले होते.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा