भाग ७
दुसऱ्या दिवशी पहाटेच मनिषाने घरातले सगळे दिवे लावले. रात्री थोडे जागरण झाल्यामुळे तिचे डोळे आधीच सुजलेले होते, चेहरा पांढराफटक पडला होता, आवाजात तिने थोडी आद्रता आणली आणि एकामागोमाग एक नातेवाईकांना फोन लावायला सुरुवात केली.
“निखिल… झोपेतच गेला,” हे शब्द तिच्या ओठांतून बाहेर पडत होते, सारखा घशातून आवंढा गिळल्याचा ती अभिनय करत होती.
काही वेळातच घर गर्दीने भरले. मावश्या, काका, शेजारी, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा धक्का होता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि हळहळ दिसत होती.
“काल तर अगदी ठीक होता,” “काही त्रास नव्हता म्हणे,” अशा कुजबुजीने घर भरून गेले होते.
मनिषा मात्र अंगणात बसून रडत होती, पण ते रडणे खरे नव्हते; ते रडणे अभिनयाचे होते. डोक्यावर हात, छातीवर सारखी थाप, आणि मधूनमधून उसासे असे सगळे ठरवून केल्याप्रमाणे ती करत होती.
थोड्याच वेळात दिनेश आला. त्याच्या चेहऱ्यावर देखील निखिल गेल्याचे दुःख ठेवले होते, पण डोळ्यांत कुठेही आश्चर्य नव्हते, कारण त्याला ते सगळे आधीच माहित होते.
“डॉक्टरकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवावे लागेल,” तो मनिषाच्या जवळ जाऊन हळूच म्हणाला.
मनिषाने फक्त मान हलवली.
दिनेश लगेच गावातल्या एका खासगी डॉक्टरकडे गेला. डॉक्टर वयस्कर, थकलेले, आणि पैशासाठी नेहमी तयार असायचे. दिनेशने त्यांना सगळे सांगितले “हृदयविकाराचा झटका, झोपेतच मृत्यू आहे तुम्ही प्रमाणपत्र बनवून द्या, तुमची फी लगेच देतो.”
डॉक्टरने फारसा विचार केला नाही. दोन मिनिटांत मृत्यू प्रमाणपत्र तयार झाले.
कारण? "कार्डियाक अरेस्ट".
प्रमाणपत्र हातात घेतल्यावर दिनेशच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली.
तो घरी परतला, मनिषा अजूनही रडत होती. प्रमाणपत्र पाहताच तिने एक दीर्घ उसासा सोडला, जणू कुठले तरी मोठे भीतीचे ओझे उतरले होते.
“आता उशीर नको,” ती म्हणाली, “आजच अंत्यसंस्कार करूया.”
कोणी विरोध केला नाही. गावात पद्धतच तशी होती, मृत्यू झाल्यावर उशीर करायचा नसतो.
निखिलचे पार्थिव अंगणात आणले गेले. त्यांच्या अंगावर पांढरे कापड टाकले, हात छातीवर दुमडून ठेवले. त्याची तीनही मुले बाजूला गोधळून, भयभीत होऊन बसलेली होती. त्यांना काहीच कळत नव्हते. बाबा काल रात्री घरी येऊन त्यांच्याबरोबर खेळत होते, आणि आज ते कायमचे झोपले?
मनिषाने मोठ्या आवाजात हंबरडा फोडला.
“माझा संसार उध्वस्त झाला हो…!”
लोकांच्या डोळ्यात पाणी आले. कुणालाही संशय येणे शक्यच नव्हते.
कबरस्तानमध्ये वातावरण गंभीर होते. फातिहा सुरू झाला. खोल खड्डा खणला गेला. दिनेश स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होता.
त्याने हातात एक घमेले घेतले.
“ प्रत्येकाने एक एक मूठ माती त्यात घातली,”
दिनेशने काही क्षण प्रेताकडे पाहिले. त्याला आता खात्री झाली होती.
माती टाकली गेली, त्यावर पांढऱ्या फुलांची चादर ओढली गेली. काही वेळ प्रत्येकाने निखिलच्या आठवणीत मौन पाळले, जमिनीतल्या त्या मातीत निखिलचे अस्तित्व विरघळू लागले.
घरी मनिषाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आतून मात्र तिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता आपण मोकळे झालो, असे तिला वाटत होते.
अंत्यसंस्कारानंतर लोक हळूहळू निघून गेले. घर पुन्हा शांत झाले.
दिनेश आणि मनिषा समोरासमोर बसले.
“सगळे सुरळीत झाले,” दिनेश म्हणाला.
मनिषा पहिल्यांदाच खरे खुरे हसली.
“हो… अगदी ठरल्याप्रमाणे.”
ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली,
“कोणीच शंका घेतली नाही.”
दिनेशने पाणी प्यायले आणि खुर्चीला टेकत म्हणाला,
“आता पुढचे आयुष्य आपल्या हातात आहे.”
त्या दोघांना वाटत होते, खेळ संपला आहे. सत्य जळून खाक झाले आहे.
पण त्यांना माहीत नव्हते.
पण त्यांना माहीत नव्हते.
काही रहस्य, जमिनीतून पुन्हा बाहेर येऊ शकतात.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा