आठवा भाग
निखिलला मूठ माती देऊन दोन दिवस झाले होते, पण निखिलच्या वहिनीच्या सलमाच्या मनातली अस्वस्थता काही केल्या शमत नव्हती.
ती थोडी घाबरट होती, चारचौघात बोलताना घाबरायची, पण तिचे निरीक्षण तीक्ष्ण होते. निखिल ज्या दिवशी गेला, तेव्हा सगळे लोक त्याचे शेवटचे दर्शन घ्यायला पुढे सरसावत होते, तेव्हा तिची नजर अचानक निखिलच्या गळ्याकडे गेली होती.
गळ्याच्या चहुबाजूने एक फिकटसा काळसर डाग दिसत होता
सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, कदाचित त्याला आधीच काही त्वचेचा रोग असेल किंवा मृतदेह थंड झाल्यावर स्वतःहून आलेला डाग असू शकतो.
पण तो डाग तिच्या डोळ्यांतून काही केल्या जात नव्हता.
रात्री झोपताना तोच डाग तिच्या डोळ्यासमोर फिरत असायचा.
"हृदयविकाराच्या झटक्यात असे डाग येतात का?" तिला खात्री नव्हती.
दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तो विचार करत होती. तिने मनिषाचे रडणे आठवले, ते रडणे फारच नाटकी वाटत होते. खऱ्या वेदनेपेक्षा त्यात गडबड गोंधळ जास्त होता.
तिने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. आपण उगाच संशय घेतोय, असा विचार नाही करायला पाहिजे, शेवटी तो तिचा नवरा होता.
पण संशय एकदा मनात रुजला की, तो शांत बसू देत नाही.
दोन दिवसांनी तिच्या नवऱ्याचा, सलमानचा दुबईहून फोन आला.
“कसे आहे सगळे आता?” सलमानने विचारले.
सलमा काही क्षण गप्प राहिली, मग हळू आवाजात म्हणाली,
“सलमान… मला काहीतरी चुकीचे वाटते.”
“काय झाले?”
“निखिलच्या मृतदेहावर त्याच्या गळ्यावर… मला एक विचित्र खुण दिसली होती. काळसर, जणू कोणीतरी त्याचा गळा दाबून धरला असावा आणि तिच्या घरात आता तीच्या शाळेतल्या मास्तरांचे येणे जाणे वाढले आहे.
फोनपलीकडे काही क्षण शांतता पसरली.
“तुला नक्की खात्री आहे का?” सलमानने विचारले.
“कोणास ठाऊक… पण मन मानत नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने अशी खुण येते का?”
सलमान थोडा विचारात गेला.
“सलमा, अशा वेळी गप्प बसणे चुकीचे ठरू शकते.”
“म्हणजे?”
“तुला जे दिसले, ते खरे असेल तर? जर तो नैसर्गिक मृत्यू नसेल तर?”
सलमाच्या अंगावर शहारा आला.
“तू पोलिसांकडे जा,” सलमानने तिला सल्ला दिला.
“मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो, पण त्या आधी किमान चौकशी तरी व्हायला हवी. तुझ्या मनातली शंका पोलिसांना सांगून बघ.”
“पण… सगळे म्हणतील मी वेडी आहे, आणि आता तर त्याला कब्रस्तान मधे पुरले देखील आहे.”
“लोक काय म्हणतील यापेक्षा, सत्य महत्त्वाचे आहे,” सलमान म्हणाला.
“जर तू गप्प बसलीस आणि काही चुकीचे असेल, तर तू स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाहीस, या सगळ्यांबद्दल पोलिस बघून घेतील”
फोन ठेवताना सलमाचे हात थरथरत होते. त्या संध्याकाळी तिने मनाशी निर्णय घेतला आणि पुढच्याच दिवशी सकाळी ती थेट पोलीस ठाण्यात गेली.
पोलीस स्टेशनमध्ये सब-इन्स्पेक्टर साजिद बसले होते, त्याच्या नजरेतून देहबोलीतून त्याचा कडक स्वभाव दिसत होता.
“काय काम आहे ताई?” त्यांनी विचारले.
सलमाने थोडा वेळ घेतला. मग हळू आवाजात म्हणाली,
“माझ्या दिराचा… निखिलचा…दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आला असे आम्हाला सांगितले.”
“हो, मला कळले आहे ते,” साजिद म्हणाले.
“पण मला… मला त्याच्या मृत्यूबद्दल शंका आहे.”
साजिद थोडे सावध झाले.
“कशावरून?”
“त्याच्या शेवटच्या दिवशी मी त्याच्या गळ्यावर एक काळसर खुण पाहिली. एखाद्या जखमेसारखी, कोणीतरी जोरात गळा दाबल्यावर येऊ शकेल अशी ”
“तुम्ही अजून कोणाला सांगितले आहे?”
“फक्त माझ्या नवऱ्याला, तो दुबईत आहे. त्यानेच मला इथे यायला सांगितले.”
साजिदने एका हवालदाराला कब्रस्तानात पाठवले, तेथे पुरायच्या अगोदर त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेतले होते.
“मृत्यू प्रमाणपत्र खासगी डॉक्टरचे आहे…” ते पुटपुटले.
ते थोडा वेळ विचारात गेले.
“ताई, तुम्हाला माहिती आहे का? अशा तक्रारीमुळे संपूर्ण कुटुंबाची चौकशी होईल?”
“माहिती आहे,” सलमा म्हणाली,
“पण जर तो अकाली मृत्यू नसेल, तर सत्य बाहेर आलेच पाहिजे.”
साजिदने तिच्याकडून लेखी जबाब नोंदवून घेतला.
“आम्ही प्राथमिक चौकशी सुरू करतो,” ते म्हणाले.
“मृत्यू अकस्मात होता का, की संशयास्पद? हे तपासावे लागेल.”
ती बाहेर पडताना तिचे मन आता समाधानी होते, तिच्या मनात आलेला संशय तिने पोलिसांना सांगितला होता.
दुसरीकडे, मनिषा आणि दिनेश मात्र घरात मजा करत होते, त्यांना याबाबत कसलीही कल्पनाही नव्हती की…निखिलच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा