नववा भाग
सलमाच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन दिवसांत गावात पुन्हा एकदा पोलीस चौकशी सुरू झाली.
सब-इन्स्पेक्टर साजिद स्वतः दोन शिपायांसह सर्वात आधी त्या खासगी डॉक्टरकडे पोहोचले, ज्याने निखिलचे मृत्यू प्रमाणपत्र दिले होते.
डॉक्टर सुरुवातीला आत्मविश्वासात होते.
“हृदयविकाराचा झटका आला, झोपेत मृत्यू झाला, हे बहुतेकांबरोबर होते, साधे प्रकरण आहे साहेब,” त्यांनी सहज सांगितले.
साजिदने त्याची छडी टेबलावर ठेवली, आणि थोड्या जबर आवाजात विचारले.
“तुम्ही स्वतः तपासणी केली होती का?”
डॉक्टर थोडे अडखळले.
“म्हणजे… फारशी नाही. कुटुंबीय सांगत होते की तो रात्री झोपेतच गेला. नाडी नाही, श्वास नाही… म्हणून…”
“पोस्टमॉर्टम सुचवले होते का?” साजिदने थेट विचारले.
डॉक्टर खाली पाहू लागले.
“नाही… वेळ वाचवण्यासाठी… आणि त्यांचे कुटुंबीय घाईत होते म्हणून…”
“म्हणजे तुम्ही कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता डेथ सर्टिफिकेट दिलेत?”
डॉक्टर गप्प गार पडले, आता काय बोलावे हे त्यांना कळत नव्हते.
साजिदच्या मनात पाल चुकचुकली, त्याने लगेच निर्णय घेतला.
“हे प्रकरण खरेच संशयास्पद आहे. मृतदेह उकरून पुन्हा तपासणी करावी लागेल.”
दुसऱ्या दिवशीच अधिकृत परवानगी मिळवून पोलीस थेट कब्रस्तानात पोहोचले, त्यांनी मनिषाला देखील बोलावून घेतले
“मृतदेह जमिनीतून पुन्हा बाहेर काढून पोस्टमॉर्टम करावे लागेल,” साजीदने थोड्या करड्या आवाजात सांगितले.
त्यांच्या आवाजाने मनिषाच्या पायाखालची जमीन सरकली.
“काय? नाही! ते शक्य नाही!” ती ओरडली.
काही वेळापूर्वी आलेला दिनेश गप्प उभा होता, पण त्याचा देखील चेहरा आता पांढराफटक पडला होता.
“कायदा आहे ताई,” साजिद म्हणाले,
“संशय निर्माण झाला की पुन्हा तपासणी करावीच लागते.”
मनिषा थरथरत पुढे आली.
“साहेब… एकदा पुरलेले प्रेत कयामत पर्यंत तसेच राहिले पाहिजे, नाहीतर त्याचा न्यायनिवाडा होणार नाही,” ती रडवेल्या आवाजात म्हणाली.
"एकदा का माणसाला पुरले की कयामतपर्यंत त्याला तिथेच राहू द्यायचे असते."
“याने फार मोठा अनर्थ होईल… त्याचा आत्मा सगळीकडे भटकत फिरेल”
हळूहळू गावात बातमी पसरल्यावर काही वेळातच सगळे नातेवाईक जमले. काहींच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती, तर काहीच्या चेहऱ्यावर प्रश्न पडले होते.
“आमच्या धर्मात असे चुकीचे मानतात साहेब,” मनिषा हात जोडून म्हणाली.
“कृपया… माझ्या नवऱ्याची शांती भंग करू नका…”
साजिद क्षणभर थांबले.
“ताई, आम्हालाही धर्म माहीत आहे, पण कायदा त्याहून मोठा असतो.”
“पण जर तो नैसर्गिक मृत्यू असेल तर?” ती आर्तपणे म्हणाली.
“मग पोस्टमॉर्टम तेच सिद्ध करेल,” साजिद म्हणाले.
“पण जर तो अकाली मृत्यू असेल… तर सत्य बाहेर आलेच पाहिजे.”
मनिषाचा श्वास अडखळू लागला. तिने एकदा दिनेशकडे पाहिले. त्याच्या नजरेत पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसत होती.
“मी याचा विरोध करते, मी तुम्हाला त्याचे प्रेत उकरु देणार नाही!” मनिषा मोठ्याने म्हणाली.
“आमच्याकडे परवानगी आहे, शासकीय कामात आडकाठी आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला अटक करावी लागेल,” साजिद म्हणाले.
कब्रस्तानमध्ये पोलीस, डॉक्टर आणि काही अधिकारी जमले. माती हलवायला सुरुवात झाली.
ते दृश्य मनिषाला पाहवत नव्हते. ती दूर उभी राहून डोळे मिटून थरथरत होती, तिचे ओठ हलत होते. कफन बाहेर काढण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी ज्याला सगळ्यांनी मूठ माती दिली होती ते नवऱ्याचे प्रेत आज पुन्हा उघड्या आकाशाखाली आले होते.
पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह ताब्यात घेतला गेला.
साजिदने शेवटचा कटाक्ष मनिषाकडे टाकला. त्या नजरेने ती कोसळणारच होती. तिला एकच गोष्ट सतत सतावत होती.
"जर त्या गळ्यावरच्या खुणा अजून दिसत असतील तर? जर पोस्टमॉर्टम मध्ये सत्य बाहेर आले तर?"
इकडे दिनेश शांत दिसण्याचा प्रयत्न करत होता, पण आतून त्याचे मन देखील घाबरले होते.
कारण आता खेळ हातातून निसटत चालला होता.
त्यांना वाटले होते की जमिनीत सगळे पुरले गेले होते, पण सत्य कधीच पुरून राहत नाही. चौकशीचा हा टप्पा त्यांच्या आयुष्यात वादळाची नांदी ठरणार होता.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा