Login

व्यसन भाग १

व्यसन भाग १
व्यसन भाग १

"आई, अजून किती वेळ चकरा मारणार आहात हॉलमध्ये ? डोकं दुखायला लागेल तुमचं. त्यापेक्षा थोडा वेळ टेकून बसा न." मोनिकाने स्वयंपाकघरातून बाहेर येत लताबाईंना सावरण्याचा प्रयत्न केला.

लताबाईंनी भिंतीवरील काळ्या गोल घड्याळाकडे पाहिले, रात्रीचे साडेदहा वाजत आले होते. आज घरात त्या शांत वातावरणात घड्याळाची टिकटिक सुद्धा आता कर्कश वाटू लागली होती.

" अगं मोनिका, सातची वेळ दिली होती त्याने. म्हणाला होता, 'आई, आज लवकर येतो, आपण सगळे मिळून बागेत जाऊया फिरयाला.' साडेदहा झाले, साधा एक फोन नाही की मेसेज नाही. जीव नुसता टांगणीला लागलाय ग ! " लताबाईंचा आवाज चिंतेने थरथरत होता.

मोनिकाने स्वतःच्या मनातील भीती लपवत आईंच्या हातावर हात ठेवला.

" आई, ऑफिसमध्ये एखादी महत्त्वाची डिलिव्हरी अडकली असेल. शेवटी इंजिनिअर आहे तो, काम असल्याशिवाय नाही थांबणार. येईल तोपर्यंत, तुम्ही जेवून घ्या ना, तुमच्या गोळ्यांची वेळ झालीये."

"नको ग बाई ! तो आल्याशिवाय घास घशाखाली उतरत नाही. आणि खरं सांगू ? हल्ली तो आल्यावर 'घर' कसं राहतं, हे तुलाही ठाऊक आहे आणि मलाही. त्याचं ते झिंगणं, ते बरळणं... आठवलं की पोटात गोळा येतो ग ! "

लताबाईंच्या स्वरात एक सुप्त वेदना आणि थकवा होता. निवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या लताबाईंनी आयुष्यभर शेकडो मुलांना वळण लावले, पण स्वतःचा एकुलता एक मुलगा व्यसनाच्या आहारी जाताना पाहून त्या आतून कोलमडत होत्या.
रात्रीचे साडेअकरा झाले. बाहेर पाऊस रिपरिपू लागला होता. अचानक घराच्या दारावरची बेल जोरात आणि सलग वाजू लागली. कोणीतरी बेलचं बटण दाबूनच धरलं होतं.

मोनिका धावत गेली आणि तिने थरथरत्या हाताने दार उघडले. समोर प्रशांत उभा होता. डोळे रक्तासारखे लाल झालेले, अंगावरचा महागडा फॉर्मल शर्ट चुरगळलेला आणि बटणं उघडी. अंगातून मद्याचा इतका उग्र दर्प येत होता की मोनिकाला दोन पावलं मागे जावं लागलं.

" काय... काय ग ? बघतेय काय अशी ? दार उघडायला इतका वेळ... का लागतो ? मी काय... काय बाहेरचा आहे का ? " प्रशांत अडखळत, तोल सावरत हॉलमध्ये आला आणि तसाच सोफ्यावर कोसळला. लताबाई बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक संताप होता.

" प्रशांत, हा काय अवतार आहे तुझा ? तुझी कंपनी, तुझं शिक्षण, तुझे संस्कार... हे सगळं कुठं गहाण ठेवून येतोस रोज ? शेजारीपाजारी लोक काय म्हणत असतील, याचा तरी विचार कर. देशपांडे सर गेले, पण त्यांचं नाव तरी राख."
प्रशांतने एक उपहासात्मक हसू दिले.

" शेजाऱ्यांची काळजी... तुच कर आई! मला... मला नका शिकवू. मी कमावतो, मी... मी माझ्या पैशाने पितो. तुमचं काय जातंय ? " असे म्हणत तो लडखडत डायनिंग टेबलकडे वळला.

मोनिकाने निमूटपणे ताट वाढले. तिने वाफाळलेली वरण-भात आणि भाजी समोर ठेवली. प्रशांतने एक घास घेतला आणि ताडकन ताट बाजूला ढकलले.

" काय हे... थंडगार जेवण ? मी काय गुरासारखा काहीही खाईन असं वाटतं का तुला ? मी हॉटेलमधून आलोय का ? तुला साधं जेवण गरम ठेवता येत नाही ? "

" प्रशांत, मी दोनदा गरम केलं जेवण... पण तू यायलाच साडेपाच तास उशीर केलास..." मोनिकाच्या डोळ्यांतून पाणी ओघळले.

" चूप ! तुझा हा नेहमीचा रडका चेहरा पाहूनच मला चिड येते. आई, हिला सांगा... नीट वागायला, नाहीतर... नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल ! "

प्रशांतचा आवाज चढला. रागाच्या भरात त्याने पाण्याचा काचेचा ग्लास उचलला आणि जोरात जमिनीवर आदळला. काचेचे शेकडो तुकडे ठिकऱ्या होऊन घरभर पसरले.

प्रशांतचा हात आता मोनिकावर उगारला जाणार होता, पण त्या क्षणी लताबाईंनी झेपावून त्याचा हात मनगटात पकडला. त्यांच्या डोळ्यांत आज एक वेगळाच अंगार होता.

" बस प्रशांत ! आज तू तुझी सीमा ओलांडली आहेस. मोनिकावर हात टाकायची तुझी लायकी नाहीये. तू आज फक्त दारू प्यायला नाहीयेस, तर तू तुझं माणुसपण हरवून आला आहेस."

प्रशांतने हात सोडवून घेतला आणि धुंदीत काहीतरी बरळत स्वतःच्या खोलीत जाऊन बेडवर आडवा झाला. क्षणार्धात त्याच्या घोरण्याचा आवाज येऊ लागला. हॉलमध्ये आता फक्त मोनिकाच्या हुंदक्यांचा आणि पावसाचा आवाज होता.

मोनिका काचेचे तुकडे गोळा करू लागली, तिचे बोट कापले गेले पण तिला त्या जखमेपेक्षा मनाच्या जखमेची वेदना जास्त होत होती.
लताबाईंनी शांतपणे मोनिकाच्या हातातील काच काढून घेतली आणि तिला जवळ घेतले.

" रडू नकोस मोनिका. हे आज शेवटचं होतं. आता फक्त समजावून सांगून, आरडाओरडा करून किंवा रडून उपयोग नाही. जो स्वतःचा चेहरा बघायला तयार नाही, त्याला आरसा दाखवावाच लागतो. उद्याची सकाळ या घरात काहीतरी वेगळं घेऊन येईल... असा चमत्कार, की प्रशांतला त्याच्या कृत्याची लाज वाटेल."