Login

वचन तुझे नि माझे भाग 1

वचन तुझे नि माझे

“अग राणी कुठेस तू !!! किती वेळाची वाट बघतेय मी?? येतेयस ना?”

“अग हो हो जरा धीर तर धर. जरा मुळी आवरू देत नाही हि प्राजु मला !!ए आई जाते ग मी,ती प्राजु गडबड करतेय संध्याकाळी येईन हो लवकर , काळजी घे गोळ्या घे हो नीट आणि हो आप्पाना आठवणीने डबा दे तो आज मी अगदी तुझ्या उशाजवळ च ठेवला आहे बघ …”
असे म्हणताम्हणता राणीने दरवाजा उघडून बाहेर पहिले तर बाहेर पाऊस “ हत्तीच्या मारी याला पण आताच यायचे होते ”
“ बघ म्हणून मी गडबड करत होते राणी, आला ना पाऊस आता काय करायचं?”
“ काय काय? जावं तर लागेलच कालच लेट शेरा पडला आहे ऑफिस मध्ये , आजपण पडला तर रमेश सर काही या महिन्यात पूर्ण पगार द्यायचे नाहीत ” असे म्हणत राणीने डोक्याला हात मारून घेतला .
“अग पण मी छत्री नाही आणली ना आणि तुझ्याकडे पण एकच छत्री आहे कि” प्राजु ने काळजी दाखवली तशी राणी बोलली “ असुदे ग आता असच जावं लागेल .”
बोलता बोलता राणी पायऱ्या उतरलीसुद्धा आणि बिचारी प्राजु तिच्या मागे लपत छपत कधी तिच्या छत्रीत तर कधी छत्री बाहेर जात चालू लागली. बस स्टॉप वर जाईपर्यंत प्राजु अर्धी आणि राणी पूर्ण भिजून गेली होती, प्राजुला वाचवण्याच्या नादात राणी छत्रीबाहेरच जात होती आणि त्या दोघांची ती धावपळ वरुणराजा मात्र मस्त बघत होता. नशिबाने आज १० ची बस मिळाली म्हणजे अगदी आज तरी लेट शेरा नाही मिळणार म्हणून दोघी नि आनंदाने एकमेकांकडे बघितले आणि जोरात टाळी दिली तशी मागे उभारलेल्या काकू अचानक घाबरून मागे सरकल्या . ,
“अग ये पोरींनो जरा सावकाश कि मी पडले असते ना आत्ता ?”
“ माफ करा हा काकू आम्ही पाहिलं नाही ” म्हणत प्राजु ने राणीला डोळे वटारले. बस जवळ आली तशी प्राजु आणि राणी बसमध्ये चढल्या . गर्दी नेहमीचीच होती पण आज प्राजु मात्र छान मूड मध्ये होती . कालच तिला पाहुणे बघुन गेले होते आणि आता आज संध्याकाळी त्यांचा निर्णय येणार होता. मुलगा चांगला शिकलेला होता आणि नोकरी पण ठीकठाक होती . राणी मात्र आपल्याच तालात होती . नेहमीसारखी ती खिडकीबाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या कडे बघत विचार करत होती . बसमध्ये गर्दी असल्याने त्या दोघीना काही बोलता नाही आले. त्यामुळे ऑफिसमध्ये पोहोचताच दोघी आधी वॉशरूम मध्ये गेल्या आणि राणी ने विषय काढला
“ काय ग प्राजु काय काय झालं काल? मुलगा कसा होता? आणि फॅमिली? होकार आला का?”
“अग कुठलं काय आज संध्याकाळी निरोप कळवतो बोलले . मुलगा मस्त आहे , चांगला बी.कॉम आहे आणि फॅमिली पण छोटी च आहे ”
“मजा आहे बाबा मग एका मुलीची, लवकरच मला एकटीलाच ऑफिस यावं लागणार असं दिसतंय?” राणी ने प्राजु ला कोपर मारली आणि पर्स उचलून जाऊ लागली तशी प्राजु बोलली “ काय ग राणी हल्ली आई ची तब्ब्येत जास्तच खालावली आहे आणि अप्पा पण काही जास्त बोलत नाहीत घरात, अशात तू राजेश बद्दल काय ठरवलं आहेस?” राणी एकदमच गंभीर झाली आणि म्हणाली " मी बोलले राजेश शी या विषयावर. तसा आधी तो हि घाई च करत होता पण सगळं सांगितल्यानंतर त्याने मला काही महिन्यांचा अवधी दिला आहे. पाहू आता पुढे काय होत ते ?”
प्राजु ने एक सुस्कारा सोडला आणि काही वेळातच दोघी आपआपल्या टेबलं वर कामात मग्न झाल्या.
राणी आणि राजेश ,खुप वर्षापासून एकमेकांना ओळखत होते ,ओळखत कसे प्रेमातच होते म्हणा .
राजेश ,एक मध्यमवर्गीय मुलगा त्यांच्याच ऑफिस मध्ये मॅनेजर होता. राणी आणि राजेश खूप दिवसापासून एकमेकांवर प्रेम करत होते . खरंतर त्यांची ओळख मुळी ऑफिस मधली नव्हतीच ते दोघे तर कॉलेज च्या फर्स्ट डे लाच एकमेकांना पसंद करून बसले होते . पण राजेश अगदी लाजाळू . तो कोणत्याच मुलीला मान वर करून बोलणं तर दूर बघतही नसे आणि राणी मात्र त्याच्या एका कटाक्षासाठी रोज रोज नवीन बहाणे करून त्याच्या समोरून जाई. दिवस जात होते आणि राणी राजेश ला जिंकण्यासाठी रोज प्रयत्न करत होती.
अचानक एके दिवशी लायब्ररी मध्ये राजेश तिच्याकडे आला आणि राणी ची तर तत फफ झाली. एका पुस्तकासाठी राजेश राणीला विचारत होता जे राणी ३ दिवस आधीच घेऊन गेली होती पण आता ते पुस्तक राजेश ला हवे होते.
राणी ने पुस्तक दिले आणि राजेश शी बोलणे वाढवण्यासाठी विषय शोधू लागली. पण तो अचानक समोर आल्याने तिलाही काही सुचेना शेवटी राजेश च म्हणाला ,” तुम्ही खूप हुशार आहेत असं कळालं मला हिस्टरी मध्ये , मला काही मदत करू शकाल का? ” “हो नक्कीच” म्हणत राणी ने त्याच्या साऱ्या शंका निरसन करून दिल्या आणि बघता बघता राजेश हि आता मोकळेपणाने तिच्याशी बोलू लागला.
दोघांचा संपर्क आता वाढू लागला, अभ्यास च्या पलीकडे त्यांच्यात छान मैत्री चे नाते जुळले. राजेश खूपच शांत स्वभावाचा मुलगा होता, सहसा तो आपले मनातले कुणाला सांगत नसे. आईशिवाय मोठ्या झालेल्या राजेश ला लहान वयातच समजूतदारपणा आला होता,असे असले तरीही तो कधीच कुणाला दुखावत नसे, सर्वांना एकत्र घेऊन चालणे, सगळ्याना मदत करणे या गुणांमुळेच राणी राजेश च्या जवळ अजून ओढली जाऊ लागली होती. राजेश अभ्यासात सुद्धा हुशार होता. खूपच थोड्या कालावधीत त्याने कॉलेज मदे सर्वांची माने जिंकली होती. समोरच्या व्यक्तीला अगदी थोड्याच वेळात तो आपल्या देहबोलीने , विचारांनी आणि लाघवी वागण्यानं जिंकून घेई. त्याच्या उलट राणी ला मात्र अभ्यासात जराही रस नसायचा. अप्पा आणि समीर, तिचा भाऊ यांच्या मुळे फक्त ती परीक्षा पास करायची. त्यामुळेच अप्पा सुद्धा तिच्या शिक्षणाकडे कमी आणि तिच्या लग्नाचं बघण्यामध्ये जास्त रस दाखवायचे. पण समीर , त्याच्या मते राणी हुशार होती आणि तिलाही तिच्या पायावर उभी करणे गरजेचे होते. समीर स्वतः पण इंजिनीर होता आणि घरामध्ये सगळ्यांचा लाडका सुद्धा होता. त्याच्या शब्दाबाहेर कोणीच जात नसे. आत तर राजेश राणीच्या आयुष्यात आला , आणि राणी मध्ये आमूलाग्र बदल झाला. सकाळी लवकर उठणे, आईला मदत करणे . नियमित अभ्यास करणे. या सर्व सवयी राजेश मुळे तिला लागत होत्या. घरात समीर आणि अप्पा सुद्धा आश्चर्यचकित होते राणीमधला बदल पाहून. अप्पानी तर आता तिला सांगून टाकले कि तुझ्या लग्नाची आता मला घाई करायची गरज नाही , तू जेंव्हा तयार होशील तेंव्हाच करू. हे सर्व ऐकून तर राणी जास्तच खुश होती आणि म्हणूनच ती आता हळू हळू राजेश ला दाखवून देत होती कि तो तिला आवडत होता, त्याच्या आवडीनिवडी जपत होती . त्याला घरी जातायेता सोबत करणे, कधी कधी त्याला स्वतः काही बनवून आणून देणे हे सर्व ती नित्यनियमाने करत होती पण ढिम्म राजेश ला हे सगळं कळेल तर ना? तो या सर्वाला मैत्री च तर नाही ना समजत? म्हणून रानी घाबरत होती. आता या सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग राणी पुढे होता व्हॅलेंटाईन डे. राणी ने ठरवले कि आता काहीही होऊ ती राजेश ला आपल्या मनातील सगळं सांगून टाकेल मग पुढे काहीही होवो.