वचन.... भाग 9
मागील भागात आपण पाहिले....
सायली मालतीसुदेशला समजावू लागली. " आई बाबा काय फरक पडतो मोठ्या बहिणीच्या आधी लहान भावाचं लग्न झालं तर असं कुठे लिहून ठेवलंय का की आधी मोठ्याच आणि मगच लहाण्याचं लग्न व्हावं. सूरज आणि चारू एकमेकांना पसंत करतात बिचारी चारू आपल्या सुरजला नोकरी लागेपर्यंत तिच्या आई वडिलांना कशी बशी थोपवत आली आहे. आपण तिचा विचार नको करायला का? आणि माझ्या लग्नाचं उगाच टेंशन घेऊ नका ते जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईलच. "
आता पुढे....
"सायू अगं लोक काय म्हणतील " मालती म्हणाली.
"आई मला एक सांग तुझ्या साठी काय महत्वाचं आहे.लोकं की तुझ्या मुलाचा आनंद. आता तूच ठरवं कशाला जास्त प्राधान्य द्यायचं "सायली म्हणाली.
होय नाही करता करता मालती सुदेश सायलीमुळे सुरज चारू च्या लग्नाला तयार झाले.
-----------------------------------------------------------------
माणिकशेठ या नावाजलेल्या बिल्डर ची चारू एकुलती एक लेक. दारात दिमतीला चार चार गाड्या सदैव उभ्या. दुमजली बंगला आणि हाताशी प्रत्येक कामाला नोकर चाकर. माणिकशेठने आपलं हे वैभव शून्यातून उभं केलेलं. त्यामुळे गरिबीची किंमत माणिकशेठला चांगलीच ठाऊक होती. मेहनतीने कष्टाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीचं माणिकशेठला नेहमीच कौतुक असे.
पण लेकीचं लग्न एका गरीब कुटुंबात करण्यास माणिकशेठ होकार देईल का नाही ही शंकाच होती.
चारूने आपल्या मॉमला सूरज बद्दल आधीच सांगितलं होतं. मॉमचा होकार मिळाला तरी डॅड कसे रिऍक्ट होतील याची चारूला भीती होती.
सकाळी ब्रेकफास्ट टेबलवरच डॅडशी बोलायचं चारूने मनाशी ठरवलं. सकाळी माणिकशेठ, त्यांची पत्नी आणि चारू ब्रेकफास्ट टेबल वर एकत्र आले. मनाचा हिय्या करून चारूने बोलायला सुरुवात केली.
"डॅड मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे " चारू म्हणाली.
"तुला आमच्याशी बोलण्यासाठी परमिशनची केव्हा पासून गरज लागली. काय बोलायचंय बिनधास्त बोल चारू बेटा" माणिकशेठ म्हणाले.
"डॅड मला माझ्या एका मित्रा बद्दल तुमच्याशी बोलायचं आहे ..... "
चारूच वाक्य पूर्ण होण्याआधीच माणिकशेठ म्हणाले..."फक्त मित्र की आणखीन काही "
माणिकशेठच्या ह्या प्रश्नाने चारू गडबडली. पुढे काय बोलू हा विचार करीत असतानाच माणिकशेठ पुन्हा बोलू लागले. " तू ज्या मित्राबद्दल बोलत आहॆस त्याचं नाव सूरज बरोबर ना. नुकताच C. A क्लिअर करून एका खाजगी कंपनीत जॉब करतोय. घरी अपंग वडील, आई लहान भाऊ आणि एक मोठी बहीण आहे ठाण्याला एका चाळीत दोन खोल्यांचं घरात ही सगळी मंडळी राहतात आणि सगळ्यात महत्वाचं तू त्याच्या प्रेमात आहॆस. तुम्हां दोघांना लग्न करायचंय. बरोबर ना सायली " आपलं बोलणं झाल्यावर माणिकशेठ सायलीकडे रोखून पाहू लागले.
आपण जे सांगणार होतो ते डॅडला आधीच ठाऊक आहे आता ह्यावर काय बोलू त्याक्षणी चारूला काही सुचेना.मान खाली घालून शांत बसण्याशिवाय आता पर्याय नाही. असा विचार करून चारू शांत बसली.
"चारू तुला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मला कसं माहीत. डॅड आहे मी तुझा. माझ्या मुलीच्या आयुष्यात काय सुरू आहे त्याची खडानखडा माहिती आहे मला.मुळात मला थोडा संशय होताच पण तू तुझ्या मॉमला सांगितल्यावर तिने मला सांगितलं तुला तर माहीतच आहे तुझी मॉम माझ्या पासून काहीच लपवत नाही. मग एवढी मोठी गोष्ट मला सांगितल्याशिवाय राहणार आहे का ती." आपल्या पत्नीकडे पहात माणिकशेठ म्हणाले.
"डॅड मला त्या बद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं पण मी योग्य संधीची वाट पहात होते बस इतकंच. सूरजला जॉब लागल्याशिवाय तो मला मागणी घालणं शक्य नव्हतं. म्हणून मला थांबावं लागलं " चारू म्हणाली.
"सुरजची आर्थिक परिस्थिती,त्याची फॅमिली, त्याचं चाळीतलं घर, काही हजारांची नोकरी आणि आपला हा बंगला, गाडी, नोकर चाकर, तीन माणसांच्या आपल्या या कुटुंबात आजवर तुझाच हुकूम चालत आलेला आहे. तू म्हणशील तेव्हा हवी ती गोष्ट तुझ्या हातात मिळाली आहे. तुझी स्वतंत्र खोली, महिन्याचा पॉकेटमनी, शॉपिंग या सगळ्या गोष्टींची तुलना कधीच होऊ शकणार नाही. इथे जे आयुष्य तू जगते आहॆस त्याच्या अगदी विरुद्ध आयुष्य निवडायला निघाली आहॆस तू चारू. लग्नापूर्वी प्रेमात माणूस सगळं काही सहन करण्याची तयारी दाखवतो पण उद्या लग्न झाल्यावर चार दिवसांनी तुला पुन्हा या ऐशआरामाची आठवण येईल त्यावेळी काय करायचं. तुला आताच निर्णय घ्यावा लागेल इथलं ऐशआरामाच आयुष्य की सूरज सोबत तडजोडीच आयुष्य."
"डॅड माझा निर्णय झाला आहे. मी सुरजशीच लग्न करेन.आणि तुम्ही या ऐशआरामाची कितीही लालच दाखवली तरी माझा निर्णय नाही बदलणार. आमच्या लग्नासाठी मला तुमच्या होकाराची गरज आहे. तो मिळाला की मी असं समजेन मला माझं सगळं ऐशआरामाच जीवन मिळालं. कारण आता माझं सगळं सुख हे सूरज सोबतच आहे."
"चारू बेटा हे सगळं फिल्म मध्ये पहायला ऐकायला बरं वाटतं. पण प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी आहे. तू अजून एकदा विचार कर "
"आता मला कसलाच विचार करायचा नाही डॅड. तुमचा या लग्नाला होकार आहे की नाही मला फक्त इतकंच उत्तर हवंय.कारण सूरजशी लग्न करण्याचा माझा निर्णय कधीच झालेला आहे."
"ठीक आहे तुझा निर्णय झालेलाच आहे तर मी का नकार देईन या लग्नाला माझा होकार आहे "
"खरंच डॅड " आपले डॅड इतक्या सहजासहजी लग्नाला तयार होतील असं चारूला वाटलंच नव्हतं. पण त्यांची परवानगी मिळताच ती धावतच जाऊन आपल्या डॅड ला बिलगली.
"Thanku डॅड लव्ह यू "
"लव्ह यू बेटा. तू खुश आहॆस ना मग आम्ही पण खुश आहोत. मी श्रीमंत गरीब फरक कधीच करत नाही. फक्त तू तिथे अड्जस्ट करू शकशील की नाही याची भीती होती. पण तू जर तुझ्या निर्णयावर ठाम असशील तर मी कोण नकार देणारा? आणि सुरजची त्याच्या फॅमिलीची सगळी माहिती काढली आहे मी. घरातील सगळी माणसं चांगली आहेत आणि महत्वाचं म्हणजे सूरज अगदी निर्व्यसनी आहे. मग अजून काय हवंय मला " माणिकशेठ म्हणाले.
"म्हणूनच डॅड तुम्ही माझे आयडॉल आहात.मला माहीत होतं सूरज बद्दल समजल्यावर तुम्ही नकार देनारचं नाही."
"तुम्हां बाप लेकीचं झालं असेल तर कोणीतरी माझ्या कडे ही पहा या होकाराचं क्रेडिट माझं ही आहे मीच तुझ्या बाबांना सगळं सांगितलं म्हणून त्यांनी सूरजची सगळी माहिती काढली." चारुची मॉम लटक्या रागात म्हणाली.
"Yes मॉम तू तर ग्रेट आहॆस" चारू आपल्या मॉमला मिठी मारत म्हणाली.
"बरं मग या रविवारीच बोलवूयात का सूरजच्या फॅमिलीला आपल्या घरी " चारुची मॉम म्हणाली.
"नाही आपण मुलीकडचे आहोत ना मग आपणच जाऊयात त्यांच्या घरी आपल्या चारूचं स्थळ घेऊन. इथे बोलावून त्यांना आपण उगाच आपल्या श्रीमंतीचा देखावा करतोय असं नको वाटायला. तसही सूरजचे बाबा अपंग आहेत मग त्यांना इकडे यायला त्रासचं होणार म्हणून आपणच जाऊयात त्यांच्याकडे ." माणिकशेठ म्हणाले.
रविवारचा प्लॅन फिक्स झाला. चारूला तर ही आनंदाची बातमी कधी एकदा सुरजला देतेय असं झालेलं. ती धावतच रूम मध्ये गेली आणि सुरजला फोन केला. मॉम डॅड ने लग्नाला होकार दिला आणि या रविवारी आम्ही सगळेच तुमच्या घरी येतोय. ही आनंदाची बातमी सुरजला दिली.
एवढी मोठी माणसं घरी येतायत म्हटल्यावर मालती आणि सायलीला घर किती आवरू आणि किती नको असं झालेलं. दोन खोल्यांचं घर पण चार चार वेळा प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवली आहे ना हे पाहण्याचं कामं दोघी करत होत्या
सायलीने चारूला विचारून तिच्या डॅडच्या आवडीचा बेत केला होता. भरलं वांग, जिरा राईस, फुलके आणि बासुंदी.
मालतीला आश्चर्य वाटलं "एवढे श्रीमंत पण यांची जेवणाची आवड मात्र आपल्या सामान्य माणसासारखीच आहे की गं सायू "
"आई अगं श्रीमंत असले म्हणून काय झालं ती ही माणसचं आहेत " सायली हसत म्हणाली.
दुपारी साडेबारा वाजता. माणिकशेठ, आपली पत्नी आणि चारू सोबत सायलीच्या घरी पोहचले. सायलीने सगळ्यांना पाणी दिलं. सूरजने सगळ्यांची ओळख करून दिली. थोड्या फार गप्पा झाल्यावर सायलीने ताटं केली. आपल्या आवडीचा मेन्यू पाहून माणिकशेठ खूपच खुश झाले. येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडीनिवडीचा इतका विचार करणारी एकमेकांशी इतकं प्रेमानं बोलणारी ही माणसं. पाहून माणिकशेठ ला खात्री झाली आपल्या लेकीचा निर्णय अगदी योग्य आहे.
जेवण आटोपल्यावर सूरज चारूच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
माणिकशेठ म्हणाले " हे पहा चारू आमची एकुलती एक मुलगी आहे. तिने मुलगा पसंत केला. तिची पसंत आम्हांला पण पसंत आहे. तुमची मुलाकडची बाजू तुम्हाला एकच विनंती करतो. चारूचं लग्न खूप धुमधडाक्यात करण्याची इच्छा आहे माझी. तिच्या लग्नानंतर पुन्हा आमच्या घरात मंगलकार्य होणे नाही म्हणून एक बाप तुम्हाला विनंती करतोय की चारूच्या लग्नाचा सगळा खर्च मी करेन."
माणिकशेठचा साधेपणा पाहता मालतीसुदेशनेही फार आढेवेढे न घेता होकार दिला फक्त एकच अट घातली की मुला कडचा जो काही खर्च होईल तो आम्ही करू.
दोन्ही मंडळींच्या सहमताने लग्नाची तारीखही ठरली.
बोलता बोलता माणिकशेठ मध्येचं विषय बदलत
म्हणाले" माफ करा पण एक शंका मनात आली सायली घरात भावंडामध्ये सगळ्यात मोठी आहे मग तिचं अजून लग्न का नाही झालं "
म्हणाले" माफ करा पण एक शंका मनात आली सायली घरात भावंडामध्ये सगळ्यात मोठी आहे मग तिचं अजून लग्न का नाही झालं "
त्यावर मालतीने माणिकशेठ व त्यांच्या फॅमिलीला सगळी हकीकत सांगितली की सायूचं आजवर लग्न का नाही झालं.
चारूला उद्देशून माणिकशेठ म्हणाले " चारू बाळ एका खूप चांगल्या घरात तुझं लग्न होतोय. तुझी निवड नक्कीच योग्य आहे. ज्या घरात सायली सारखी मुलगी आहे जी आपल्या कुटुंबासाठी स्वतः च्या सुखाचा जराही विचार करीत नाही. त्या कुटुंबात तू नक्कीच सुखी राहशील बेटा "
सायलीच्या कुटुंबाचा निरोप घेऊन चारू आणि तिचे मॉम, डॅड घरी परतले.
दोन्ही घरात लग्नाची धामधूम सुरू झाली. कपड्यांची खरेदी, पाहुण्यांना निमंत्रण, येणाऱ्या पाहुण्यांच्या मानापानाची तयारी, रुखवत, मेहंदी, हळद नुसती लगबग सुरू होती.
सूरज च्या लग्नात कसलीही कमी राहता कामा नये म्हणून सायली सगळी तयारी स्वतःच्या देखरेखीखाली पार पाडत होती.
चारू आणि सुरजचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. बंगल्यामध्ये स्वतंत्र खोलीत राहणाऱ्या चारुचा सूरजच्या दोन खोल्यांच्या घरात गृहप्रवेश झाला.
सायलीने आपली आणखी एक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. सूरज आणि चारूला नवरा नवरीच्या वेशात पाहून आज सायलीला समरची तिव्रतेने आठवण झाली. उगाच मनात शंका आली समरने केलं असेल का लग्न?की आजही माझी वाट पहात असेल? काय हे आपण कसला विचार करत बसलोय. मनात आलेले समरचे विचार झटकत सायली स्वतःशीच म्हणाली " समरचं लग्नही झालं असेल आणि आपल्या बायको सोबत तो नक्कीच सुखी आयुष्य जगत असेल.
सायलीच्या घरात किचनला जोडूनच हॉल होता. आत एक छोटी बेडरूम काढली होती. सुदेश सतत झोपून असल्याने त्याची रवानगी त्या खोलीत करण्यात आली होती. पण आता लग्न झालेलं नवं जोडपं घरात आलं म्हटल्यावर सुदेशला हॉल मध्ये हलविण्यात आलं आणि नवदाम्पत्याची रवानगी बेडरूम मध्ये करण्यात आली.
नव्या जोडप्याचा नवा संसार सुरू झाला. पण सतत घरात माणसांची लगबग असल्याने चारू आणि सूरजला हवा तसा एकांत मिळत नव्हता. पण तरीही दोघे खुश होते. कारण दोघेही सोबत होते. चारूच्या माहेरच्या वातावरणात आणि इथे सासरी सगळ्याच गोष्टीत जमीन आसमानचा फरक होता. पण चारू अड्जस्ट करण्याचा प्रयत्न करत होती. त्यात तिला साथ होती सायलीची. सायली चारूला सांभाळून घेत होती. चुकलं माकलं की समाजावून सांगत होती त्यामुळे दोघींची छान गट्टी जमली.
समरचं लग्न झालं असेल का? सायली समर पुन्हा एकत्र येऊ शकतील का? जाणून घेऊयात पण पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा ?
©® शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा