Login

विनाकारण खर्च

Vinakaran Kharch
जेमतेम बारावी शिकलेल्या भारतीच लग्न शहरांत राहणाऱ्या विशालसोबत झालं.

विशाल शिकलेला आणि नामांकित कंपनीत चांगल्या पदावर होता. त्याचे वडीलही एक रिटायर्ड पेन्शनर होते त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. म्हणून त्यांना फक्त शिकलेली आणि घर सांभाळणारी मुलगी हवी होती.

लग्नाच्या २ महिन्यांनी सासू सासरे वेगळे राहू लागले आणि खऱ्या अर्थाने दोघांचा संसार सुरू झाला. भारती शहरी वातावरण पटकन रुळली. इथल्या राहणीमानाप्रमाणे तिनं स्वतःमध्ये बदल करून घेतले.

पण हल्ली तिला एक वाईट सवय लागली. विशाल सकाळीच कामाला निघून गेला की ती दिवसभर ऑनलाईन शॉपिंग साइट पाहत राहायची यातून नको त्या वस्तू खरेदी करण्याची तिला सवय लागली. हातात बऱ्यापैकी पैसे असल्यामुळे
दिसणारी प्रत्येक वस्तू तिला आता गरजेची दिसू लागली.
त्यामुळे घरात नाहकच साड्या , शोपिसेस , पडदे, कार्पेट, भांडी वैगेरे अशा वस्तू जमा होऊ लागल्या. यात भरीस भर म्हणून मॉल ला जाणे , बाहेरून जेवण ऑर्डर करणे , बिल्डिंगमधल्या मैत्रिणींसोबत पार्ट्या करणे, विनाकारण खर्च करणे ,अशा गोष्टीपण होऊ लागल्या.

विशालने २-३ वेळा भारतीला समजावले . पण भारती फक्त हो ला हो करत राहिली .

विशालला याचे खूप टेन्शन आले. आपला पैसा जर असाच विनाकारण खर्च होतं राहिला तर सेव्हिंग काही राहणार नाही. त्यापेक्षा भारतीला न दुखवता चांगली अद्दल घडवली पाहिजे.

दुसऱ्या दिवशी विशाल काहीसा
तणतणतच घरी आला.

भारती - काय झालं आज तुमची तब्येत ठीक नाही का ? बसा तुम्ही मी कॉफी आणते तुमच्यासाठी.

मी ठीक आहे पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे भारती.
आज आमच्या ऑफिस मध्ये हेड - ऑफिस मधील काही लोकं आली होती त्यांचं असं म्हणणं आहे की मी आणि माझ्या टीमने एक डील पूर्ण करताना समोरच्या पार्टीच्या अटी- नियम व्यवस्थित पाहिल्या नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून कंपनी ला लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे म्हणून कंपनीने माझ्यासकट माझ्या टीम ला टर्मिनेट केलं आहे त्यामुळे निदान ६ महिने तरी मला पगार मिळणार नाही .
तूच सांग मी आता काय करू?

विशाल हतबल होऊन म्हणाला.

भारती - हे बघा यातून काहीतरी मार्ग निघेल . तुम्ही हुशार आहात तुम्हाला दुसरीकडे सहज नोकरी मिळेल.

नाही भारती मला टर्मिनेट केलं आहे निदान सहा महिने तरी दुसरा जॉब बघता नाही येणार . पण तोपर्यंत काय हेच तर मेन टेंशन आहे - विशाल.

असं जर असेल तर मी करू का तोपर्यंत दुसरीकडे नोकरी? तुम्हाला चालेल का ?

विशाल - मला काही प्रॉब्लेम नाही पण तुला जमेल का ? हे खेडेगाव नाही. तुला लोकल चा किंवा बस चा प्रवास झेपेल का?

का नाही झेपणार? तुम्ही एवढं करत आलात तर आता मी पण आपल्या घरासाठी करूच शकते की....

सुरुवातीचे १० दिवस वेगवेगळ्या ठिकाणी भारतीचे इंटरव्ह्यू देण्यातच गेले.
कुठे पगार कमी तर कुठे अनुभव नाही तर कुठे नोकरीचं लांब ठिकाण यामुळे तिला मनासारखं कामं मिळत नव्हतं.
शेवटी एके दिवशी तिला समोरून एका ट्रॅव्हल कंपनीमधून सेल्स executive च्या जागेसाठी कॉल आला.
पगार आणि नोकरीचं ठिकाण पण तिच्या अपेक्षेनुसारच होतं.

पहिल्या १० दिवसात भारतीला चांगलाच अनुभव आला.
सकाळी वेळेत उठून आवरणे, लोकलच्या गर्दीतला प्रवास त्यानंतर ऑफिस मधे पोचल्यावर
क्लायंट ला टूर्स चे डिटेल्स एक्सप्लेन करणे, कन्वेन्स करणे,
परत धावत पळत लोकलच्या गर्दीतला प्रवास करणे.
या सर्वाला ती एका महिन्यातच कंटाळून गेली.

शेवटी दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला तिच्या हातात पगाराचे बऱ्यापैकी पैसे पडले तेव्हा तिला खुप आनंद झाला.

घरी गेल्यावर विशालला तिने अभिमानाने हे सांगितले. विशालने ही सेलिब्रेशन म्हणून तिला हॉटेलमध्ये जाऊया म्हणून सुचवले.
यावर नकार कसा देणार म्हणून भारती देखील तयार झाली.

एकदा ऑफिस मध्ये असताना विशालने भारतीला फोन केला.

अगं आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. मला बऱ्याच वर्षांनी वेळ मिळाला आहे तर मी जाऊ का बाहेर पार्टीसाठी ?

भारती - यात काय विचारायचे? जा तुम्ही . लवकर या पण .

विशाल - मला जरा १० हजार रुपये हवे होते. देशील का?

भारती - पैसे घरीच आहेत तुम्हाला लागतील तसे घ्या. मला विचारू नका.

बरं म्हणून विशाल ने फोन ठेवून दिला.

त्यानंतर दोन दिवसांनी विशालने भारतीला घरातील किराणा सामान संपल्याची आणि दूध ,लाईट बील वैगेरे भरायचे बाकी असल्याची आठवण करून दिली. मी घरीच आहे तर मी करेल ही कामे अस सांगून
तिच्याकडून ह्या सर्व खर्चाचे १५००० रुपये घेतले.
पहिल्यांदाच भारतीला एवढे पैसे देताना जरा दडपण आलं.
तिने विशालला सांगितले , यातून काही उरतील का बघा.
विशाल - अगं ह्या गरजेच्या वस्तू आहेत किराणा सामान, वीज, दूध , रोजच्या भाज्या, यासाठी जो खर्च आहे तो करावा लागणारच ना?
भारतीकडे यावर उत्तर नव्हते.
पगार होऊन १० दिवस झाले होते आणि अर्धा पगार संपला होता. त्यातून दर एक दिवसाआड विशाल चा कॉल यायचा. मला हे घ्यायचं आहे , हे माझ्याकडे नाहीये, आज माझा मित्र आलाय, वैगेरे अशी कारणं सांगून तो काहीना काही खर्च करत असायचा.

आज मात्र हद्दच झाली.
भारती जेव्हा घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिची सोसायटीमधील मैत्रीण घरी आली होती आणि विशालसोबत गप्पा मारत होती.
ती आल्याचं पाहून मैत्रीण म्हणाली,
अगं भारती तू सांगितलं नाहीस नोकरीला जातेस ते ? मला वाटलं घरी असशील .मला जरा मदत हवी होती म्हणूनच आले होते पण तुझ्या मिस्टरांनी मदत केली.
थॅन्क्स विशाल जी. मी पुढच्या महिन्यात तुमचे पैसे परत करेल.
चल निघते मी भारती .

मैत्रीण निघून गेल्यावर भारती पहिल्यांदाच विशाल कडे रागाने बघत म्हणाली ,
काय हो, काय म्हणत होती ही? किती पैशांची मदत केलीत?

विशाल - अगं तिचा नवरा कुठे बिझिनेस टूर वर गेला आहे आणि फोन उचलत नाहीये. तिची सासू ऍडमिट आहे आणि अर्जंट भरायला २० ००० हवे होते म्हणून दिलेत. देईल ती नवरा आल्यावर तिचा.

तुम्हाला काही अक्कल आहे का नाही ? अहो ती चार चाकी गाडीतून फिरणारी , दागदागिने घालून मिरवणारी बाई तिच्याकडे ती साधे २०,००० पण ऍडजस्ट नाही करू शकत का ?
आणि असच देत बसलात तर आपलं काय होईल? अजून अर्धा महिना संपायचा आहे.
पूर्ण महिन्याचा खर्च ऍडजस्ट कुठून करणार ?
शिवाय रोजची तुमची काही ना काही खरेदी नाही तर पार्टी आहेच.

विशाल - सॉरी भारती , ते बऱ्याच वर्षांनी असा मोकळा वेळ मिळाला म्हणून जरा खर्च होतं राहिला पण आता असं नाही होणार .

हो प्लीज विनाकारण खर्च करू नका . एवढंच म्हणायचं होतं. -भारती.

त्यानंतर काही दिवस शांत गेले आणि पुढच्याच आठवड्यात विशालने गरज नसताना आणि घरात आधीच पडून असताना देखील एक स्पोर्ट शूज मागवले.

आता मात्र भारतीचा राग अनावर झाला.
घरी आल्या आल्या तिने विशाल सोबत भांडायला सुरुवात केली.

तुम्हाला काहीच कसं वाटतं नाही हो? एकतर आधीच तुमची नोकरी धोक्यात आहे त्यात मी एकटी कमवतेय आणि तुम्ही असा पैसा विनाकारण उधळत बसलात.

विशाल - अगं विनाकारण नाही . काही वस्तू हव्याशा वाटतं होत्या म्हणून घेतल्या .

पण गरज काय ? आधीच घरात एक वस्तू पडून आहे. शिवाय दर दोन दिवसाआड मित्रांसोबत पार्ट्या करत बसता ते वेगळंच? पैसा कमवायला किती कष्ट करावे लागतात हे काय तुम्हाला नव्याने सांगायची गरज आहे का? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे तरी काय हे वेड्यासारखं वागत आहात.

कस्टमर ला कन्वेन्स करून करून जेव्हा एखादी टूर बुक होते तेव्हा कुठे मला महिन्याला पगार मिळतो..माझ्या कष्टाच्या पैशांची अशी विनाकारण नासाडी नाही बघू शकत मी .
प्लीज हे थांबवा .

विशाल तिला जवळ घेत प्रेमाने म्हणाला. हो ना . आता समजलं तुला की मी काय सांगत होतो ते?
माझा ही मेहनतीने कमावलेला १ -१ रुपया तू जेव्हा खर्च करत सुटली होतीस तेव्हा माझी ही अशीच मनस्थिती होती.
अगं बचत करणे ही देखील एकप्रकारे कमाईची आहे .
आज पोट भरायला पैसे कमवायला लोकं कुठून कुठे आपल्या घरच्याना सोडून जातात. काही जण तर पडेल ते काम करतात.
आणि आपण असा विनाकारण पैसा उडवतो ते बरं आहे का?

माझी चूक मला मान्य आहे. मेहनतीच्या पैशांची किंमत कळली मला. यापुढे गरज असेल तरच पैसे खर्च करेल.

विशाल - बरं झालं तुला तुझी चूक लवकर लक्षात आली . आता जातो मी उद्यापासून कामाला. खूप कंटाळा आला १ महिना सुट्या घेऊन.

अच्छा तर असं आहे हे.

विशाल चा डाव भारतीच्या लक्षात आला आणि ती प्रेमाने त्याच्या मिठीत शिरली.
0