Login

प्रेमाचे उत्तर काय !

प्रेमाच्या प्रश्नाचे उत्तर काय !
रात्रीचा काळोख सगळीकडे पसरलेला असतो..... सगळे शहर झोपेच्या आहारी गेल्यामुळे सगळीकडे शांततेचे वातावरण पसरलेले असते.... या काळोखात पंधराव्या मजल्यावर बाल्कनी मध्ये उभा राहून एक तरुण आकाशातील चंद्राकडे एकटक पाहू लागतो......

' ही आजची रात्र कधी एकदा सरते असे झाले आहे.... उद्या मला माझ्या प्रेमाच्या प्रश्नाचे उत्तर भेटणार आहे..... तिला प्रश्न विचारल्यानंतर माझा एक एक दिवस कसा गेला ते फक्त माझे मलाच माहीत.... इतके दिवस वाट बघितली पण आता अजून धीर धरवत नाही आहे..... उद्या ती मला भेटून माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे...... तिच्या तोंडातून माझ्या प्रेमाला मिळालेला होकार ऐकण्यासाठी माझे हे कान आसुसलेले आहे....... ' अर्णव आकाशातल्या चंद्राकडे पाहून स्वतःच्या मनामध्येच विचार करत असतो.... आज काय त्याच्या डोळ्यावर झोप येत नसते.. . राहून राहून तिचा विचार मनात येऊ लागतो आणि मग आठवतो तो दिवस ,ज्या दिवशी त्यांच्या बोलण्याची, त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली होती..... अर्णव त्या चंद्राकडे पाहतच त्याच्या भूतकाळात हरवून जातो....

" खेळ कवितांचा " व्हाट्सअप वर या नावाने एक ग्रुप प्रसिद्ध होता... त्या ग्रुपमध्ये खूप सारे मेंबर्स ही होते... या ग्रुपमध्ये रोज इच्छुक व्यक्ती आपल्या आवडीच्या स्वतः बनवलेल्या नवीन नवीन कविता पोस्ट करत होते , तर वाचणारे ते आनंदाने वाचत होते... अशा मध्येच अर्णव नावाचा एक व्यक्ती त्या ग्रुपमध्ये ऍड होता.... त्याला कविता लिहिण्याचा खूप छंद होता... वेगवेगळ्या विषयांवर नवीन कविता लिहून त्या ग्रुपमध्ये रोज नियमितपणे पोस्ट करत होता.... त्या ग्रुप मध्ये असणाऱ्या खूप जणांना त्याची कविता खूपच आवडत होती... त्याने लिहिलेल्या कवितेच्या शब्दांमध्ये जणू त्याच्या मनातल्या भावनाच लपलेल्या असायच्या..... त्या ग्रुप मध्ये असलेले सगळेजण आवर्जून त्याची कविता वाचायचे आणि त्या कवितेवर छान कमेंट्सही करायचे......

नित्या पण आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून महिन्याभरा पूर्वी त्या ग्रुपमध्ये नवीन ऍड झाली होती..... गेल्या एका महिन्यापासून ती रोज न विसरता अर्णवच्या कविता वाचत होती...... तिला त्याच्या कविता खूपच आवडत होत्या..... तिच्या दिवसाची सुरुवात खूप छान होत होती..... तसे तर अर्णव आणि नित्या एकमेकांसाठी अनोळखी होते परंतु त्यांच्यामध्ये असलेला कवितेचा बंध त्यांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम करत होता..... नित्याने अजून एकदाही ग्रुपमध्ये त्याच्या कवितेला कमेंट्स दिलेली नव्हती परंतु मनातून तर खूपच इच्छा होत होती.....

नाते

मुठ्ठी बंद करूनही हातातली
वाळू खाली सरकत राहते,
विणलेली नात्याची विन ही
वेळेनुसार सैल होत जाते....

नात्यांचे हे अनमोल बंधन
कायम असेच सोबत राहावे
आयुष्यातील आपल्या माणसांना
प्रेमाने नेहमीच सांभाळावे....


एक दिवस सकाळीच अर्णव छान सुंदर अशी छोटी कविता बनवून ग्रुपमध्ये पोस्ट करतो...... नित्या लवकर उठलेली असते परंतु आज तिचे मन कशातच लागत नाही म्हणून ती सहजच विचार करत बसलेली असताना अचानक तीच्या फोन ची मेसेज टोन वाजते.... ती मोबाइल बघते तर अर्णवने ग्रुप मध्ये एक छोटी सुंदर अशी कविता पोस्ट केलेली असते.... ती कविता वाचून तिच्या मनाला एक आकस्मिक समाधान मिळते..... मनात चाललेल्या विचारांचे काहूर दूर होऊन जाते......

आज नित्या ची त्याच्या कवितेला मनापासून कमेंट देण्याची इच्छा होऊ लागते.... ती त्याच्या कवितेला ग्रुप मध्ये कमेंट्स न देता त्याच्या नंबर वर " खुप सुंदर" असा पर्सनल मेसेज पाठवते......

अर्णव आपल्या ऑफिसला जाण्यासाठी तयारी करून खाली गाडीच्या जवळ येऊन उभा राहतो..... त्याची नजर मोबाईलवर जाते तर मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून मेसेज आलेला त्याला दिसतो.....

" काय? " अर्णव त्या अनोळखी नंबर वरून आलेला मेसेज पाहून गोंधळून जातो आणि मग असा रिप्लाय पाठवतो....

" तुमची कविता.... तश्या तर तुम्ही ग्रुप मध्ये पाठवलेल्या कविता खूप छान असतात, पण आजची कविता वाचून मनापासून कमेंट्स देण्याची इच्छा झाली.... " नित्या पटकन त्याच्या मेसेज वर रिप्लाय देते आणि तयारी करण्यासाठी बाथरूम मध्ये निघून जाते.....

" धन्यवाद, खूप आवडलं हे वाचून की, तुम्हाला माझ्या कविता आवडतात... " अर्णव पण तिचा तो मेसेज वाचून त्याच्यावर उत्तर देतो..... हळूहळू त्या दोघांचे मेसेजवर कन्वर्सेशन चालू होते.... दोघेही रोज एकमेकांसोबत मेसेजवर बोलत असतात..... हळूहळू त्यांच्या या नॉर्मल बोलण्याचे रूपांतर सुंदर मैत्रीमध्ये होते.... त्यांच्या सकाळची सुरुवात अर्णवच्या सुंदर मैत्रीच्या कवितेने होत असते तर रात्रीचा शेवटही एकमेकांसोबत गप्पा मारून होत असतो.... असेच दिवस पुढे सरकू लागतात......

मधल्या काही दिवसात त्यांना एकमेकांबद्दल बरीचशी माहितीही समजते..... अर्णव एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता..... तर नित्या कॉलेजमध्ये तिचे पीएचडी चे शिक्षण पूर्ण करत होती.... त्यांचं हे सगळं बोलणं फोनवरच झाले होते.... अजून एकदाही ते एकमेकांना समोरासमोर भेटले नव्हते...... ते दोघेही आपल्या या मैत्रीच्या सुंदर नात्यांमध्ये खूप खुश होते परंतु अर्णवच्या मनात या मैत्रीची जागा कधी प्रेमाने घेतली त्याचे त्यालाही समजले नाही......

अर्णव नकळतपणे नित्याच्या प्रेमात पडला होता.... भलेही त्याने नित्याला समोरासमोर पाहिले नव्हते परंतु व्हाट्सअप वर असलेले तिचे फोटो आणि फोनवर ऐकलेला तिचा आवाज यानेच त्याला पूर्णपणे भुरळ घातली होती....... त्याच्या मनातल्या प्रेमाने आता त्याच्या कवितेमध्ये ही डोकावण्यास सुरुवात केली...... तो रोज नित्याला पाठवत असलेल्या कवितेमध्ये त्याच्या मनातलं प्रेम व्यक्त करत होता परंतु नित्या मात्र त्याचा अर्थ मैत्रीमध्येच घेत होती........

तिच्याकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने एक दिवस अर्णव तिला सरळ सरळ मेसेज करून विचारण्याचे ठरवतो आणि तसं करतोही..... एक दिवस रात्री विचार करून अर्णव नित्याला मेसेज मध्येच प्रपोज करतो, पण त्याचे उत्तर मात्र त्याला तिला भेटून समोरासमोर पाहिजे असते.... चार दिवसानंतर तिच्या कॉलेजच्या बाहेर अर्णव तिला भेटायला येणार असल्याचे सांगतो..... नित्या मात्र त्याला काहीच रिप्लाय देत नाही...... चार दिवस अर्णवला ऑफिसमध्ये खूप काम असल्यामुळे त्याला हाल्फ डे मिळणे अशक्य होते म्हणून चार दिवसानंतर भेटण्याचे त्याने ठरवले होते , त्याप्रमाणे तो पुढचे चार दिवस मन लावून आपल्या जवळ असलेले सगळे काम पूर्ण करू लागतो.........

आज चौथ्या दिवशी त्याला ऑफिसमधून घरी यायला ही वेळ होतो... जेवण करून आज तो बेडवर बसलेला असतो की , त्याला उद्याच्या दिवसाची आठवण होते.... उद्या त्याने खास नित्याला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये सुट्टी टाकलेली असते..... खूप रात्र झालेली असते त्यामुळे तो कोणाला फोन किंवा मेसेज ही करू शकत नव्हता म्हणून तो बाल्कनी मध्ये उभा राहून आकाशातील चंद्रामध्ये नित्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होता...... आज दिवसभर खूप थकलेला असूनही त्याच्या चेहऱ्यावर जराही थकावत दिसत नसते , उलट उद्याच्या भेटीची आतुरता त्याच्या मनाला आजपासूनच लागलेली असते......

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अर्णव त्याची तयारी करू लागतो .. आज त्याचे काहीही खाण्यापिण्यामध्ये मन लागत नाही... आपण नित्या सोबतच बाहेर कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन जेवण करावे , असा तो मनोमन विचार करून छान तयारी करून घरातून बाहेर पडतो..... आपली गाडी घेऊन तो त्याच्या कॉलेजच्या बाहेर येऊन तिची वाट बघत उभा असतो......

नित्या ची कॉलेज सुटण्याची वेळ होते आणि एकेक करून गेटमधून सगळे विद्यार्थी बाहेर पडू लागतात.... अर्णव चे डोळे मात्र त्याच्या नित्याला शोधत असतात.... शेवटी ती त्याच्या नजरेला दिसते.... हलक्या निळा रंगाचा सलवार कुर्ती घालून, केस मोकळे सोडून, समोरून चालत येताना ती त्याला दिसते..... तिच्या चेहऱ्यावर असलेली निरागसता पाहून त्याला अजूनच ती सुंदर वाटू लागते..... नित्या पण समोर उभा असलेल्या अर्णव कडे पाहते... त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटतो...... नित्या त्याच्या दिशेने चालत पुढे येऊ लागते.....

" नित्या.... " अर्णव तिच्याकडे बघून पुढे काही बोलणार इतक्यात नित्या त्याला अडवते.....

" अर्णव आधी मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देते, ज्याच्यासाठी तू इकडे आला आहेस..... " नित्या त्याच्याकडे एक नजर पाहून त्याला बोलते....

" एवढी काय घाई आहे.... आपण आधी कुठे शांत ठिकाणी जाऊन बसुया का ? " खरंतर त्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याची घाई अर्णवला जास्त झालेली असते परंतु आजूबाजूला असलेली माणसं पाहून त्याला अस्वस्थ वाटू लागते.....

" नाहीं.... " नित्य त्याच्याकडे बघून एका शब्दात उत्तर देते....

" का माझ्यासोबत कुठे यायला तुला भीती वाटत आहे का ? अगं आपण पब्लिक प्लेस मध्ये जाऊन बसणार आहोत..... " अर्णव तिच्याकडे पाहून मस्करीच्या स्वरात बोलतो....


" नाही... हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे अर्णव ... " नित्या सरळ सरळ त्याच्या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर देऊन मोकळी होते.....

" पण का ? नित्या तुला मी आवडत नाही का ? माझ्यामध्ये काय कमी असेल तर ते सांग..... तुझ्या या नकाराचे कारण काय आहे.... " अर्णव चे मन खुपचं गलबलून जाते... ज्या दिवसाची त्याने गेल्या काही दिवसापासून एवढी आतुरतेने वाट पाहिली होती, त्या दिवशी असे काहीतरी घडेल असा त्यांने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता...

" अर्णव मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत कारण मी एक घटस्फोटीत स्त्री आहे..... " नित्या त्याच्याकडे बघून गंभीर स्वरात बोलून तिकडून निघूनही जाते..... अर्णव मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तसाच उभा असतो..... तिच्या बाबतीत असे काही घडले असेल असं त्याने कधी विचारच केला नव्हता..... ती कॉलेजमध्ये शिकत आहे म्हटल्यावर , शिवाय तिचे वय ही दिसून येत नव्हते त्यामुळे तिचे आधीही लग्न झाले असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते..... तरीही तिच्यासोबत नक्की असे काय घडले आहे , हे त्याला जाणून घ्यायचे होते.....

आज अर्णवला त्याचे प्रेम भेटले नव्हते पण तरीही ते का भेटले नाही याचे उत्तर शोधणे त्याला जास्त महत्त्वाचे वाटत होते..... याचे उत्तर मिळवण्यासाठी अर्णव ज्या व्यक्तीने नित्याला ग्रुप मध्ये ऍड केले होते त्या व्यक्तीला भेटण्याचे ठरवतो.....

नित्याची एक मैत्रीण असते कल्पना ती आधीपासूनच त्या ग्रुपमध्ये होती..... कल्पना सोबत अर्णवचे थोडेफार बोलणंही झाले होते..... अर्णव एक दिवस कल्पनाला भेटून तिच्याकडून नित्याची सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यातच त्याला समजते की, नित्या तिचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असतानाच तिच्या कॉलेजमधल्या एका मुलासोबत तिचे प्रेम झाले.... ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते..... नवीनच तारुण्याच्या वळणावर आलेले ते, त्यांना बाकी कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नव्हते.... त्यांच्या प्रेमाबद्दल घरीही समजले घरच्यांनी दिलेला नकार ते दोघेही सहन करू शकले नाही आणि म्हणूनच कोणाच्याही नकळत त्या दोघांनीही जाऊन लग्न केले.....

लग्न तर झाले परंतु आपला संसार ते दोघेही जास्त दिवस सांभाळू शकले नाही .... जसजसे ते एकमेकांसोबत राहत गेले , तसतसे त्यांच्यामध्ये जास्त खटके उडू लागले..... त्यानंतर त्या मुलाने अचानक एक दिवस तिला सोडण्याचा निर्णय घेतला ... बघता बघता सहा महिन्यातच त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि नित्या परत आपल्या आई वडिलांच्या घरी येऊन राहू लागली..... आपल्या आयुष्यात हे सगळं घडून गेल्यामुळे नित्या डीप्रेशनमध्ये गेली होती........ तिला त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठीच तिच्या वडिलांनी तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले आणि म्हणूनच ती परत कॉलेजला जाऊ लागली..... हळूहळू सगळं व्यवस्थित होऊ लागले आणि नित्या पुन्हा एकदा पूर्वीसारखी सगळ्यांसोबत हसत खेळत आपले जीवन व्यतीत करत होती......

अर्णवला तिच्या घटस्फोटाचे कारण तर समजले पण म्हणून त्याच्या मनात असलेले तीच्याबद्दलचे प्रेम कमी झाले नाही..... त्याने परत एकदा आपला हा प्रेमाचा प्रश्न तिला विचारण्याचा निर्णय घेतला..... एक दिवस तिलाही न सांगता अर्णव तिच्या कॉलेजच्या बाहेर येऊन उभा होता.... नेहमीप्रमाणे नित्या कॉलेजमधून बाहेर गेटच्या जवळ येत असताना तिची नजर अर्णव वर गेली आणि अपसुकच तिचे पाय त्याच्या दिशेने वाळले.......

" नित्या आपण कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसुया का ? मला तुझ्या सोबत थोडा महत्वाचे बोलायचे आहे.... " ती काय बोलायचे आधीच अर्णव बोलून मोकळा झाला....

" अर्णव पण... " नित्या काही बोलणार पण त्या आधीच यावेळी अर्णवणे पुढाकार घेतला.....

" प्लीज..... थोडा वेळ तर बसू शकतेस ना.... " यावेळी तिला अर्णवला नकार देता आला नाही त्यामुळे ते दोघेही कॉलेज पासून थोडया अंतरावर असलेल्या एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसले... अर्णवणे दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली..... थोड्या वेळातच त्यांची कॉफी आली... दोघेही शांतपणे कॉफी पीत होते.....


" नित्या मला सगळे समजले आहे.... कोवळ्या वयात तुझ्याकडून झालेली चूक , तुझे ते लग्न आणि त्यानंतर झालेला घटस्फोट याबद्दल मला सगळी माहिती मिळाली आहे..... पण मला मात्र त्याने काहीही फरक पडला नाही.... माझे तुझ्यावर जे प्रेम होते ते अजूनही तसेच आहे..... माझा तो प्रेमाचा प्रश्न अजूनही माझ्या मनात तसाच आहे...... " अर्णव तिच्याकडे पाहून शांत स्वरात बोलतो.....

" नाही अर्णव यावेळी मात्र तुझ्या त्या प्रेमाच्या प्रश्नाला माझ्याकडे नाही हेच उत्तर आहे.... एकदा मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन बघितले त्याच्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांनाही खूप काही सहन करावे लागले, पण आता नाही..... आता मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे...... त्यांना मला खूप शिकलेली आणि मोठ्या पदावर काम करताना बघायचे आहे, आता मी पहिल्यांदा त्यांचे स्वप्न पूर्ण करेल आणि मग माझ्या आयुष्याचा विचार करेल......

अर्णव तू खरच खूप चांगला मुलगा आहे..... तुझ्यासारखा मित्र भेटणे म्हणजे भाग्यच ! मला आपली ही सुंदर मैत्री गमवायची नाही आहे त्यामुळे प्लीज मला समजण्याचा प्रयत्न कर.... आपल्यामध्ये असलेले हे मैत्रीचे नाते असेच कायम असू दे....

मैत्रीचे नाते हे खूप सुंदर नाते आहे .... रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊनही याची एक वेगळेच विश्व आहे.... मला तुझ्या रूपाने एक चांगला मित्र भेटला आहे बस मला आता तो गमवायचा नाही आहे.... " नित्या त्याच्याकडे बघून हळव्या स्वरात उत्तर देते.....

" बस नित्या आज पासून माझ्या मनात असलेल्या हा 'प्रेमाचा प्रश्न' कायम मनातच राहील.... तो कधीही ओठांवर येणार नाही , पण इथून पुढे आपली मैत्री अशीच कायम राहील..... आपल्या नात्याची सुरुवात ही मैत्रिणी झाली होती आणि ही मैत्री आयुष्यभर निभावण्यासाठी मी तयार आहे..... " अर्णव पण हसतमुखाने तिच्याकडे पाहून उत्तर देतो.....

दोघांमध्ये निर्माण झालेली ही मैत्री अशीच कायम तर राहिली आहे , पण पुढे जाऊन अर्णव च्या प्रश्नाचे त्याच्या प्रेमाचे उत्तर काय! ( असेल त्याला मिळेल का?)