Login

वॉर्ड 20A

The Last Journey Before Death

अचानक धावपळ सुरू झाली. मला उचलून टॅक्सीतून हॉस्पिटलमध्ये आणलं. ह्यांच नक्की काय चालू आहे काहीच कळायला मार्ग नव्हता. हॉस्पिलमध्ये टॅक्सी थांबवली आणि मला व्हीलचेअरवर बसवून इमर्जन्सी ओ.पी. डी जवळ आणले. तिथे एक तरुण डॉक्टर होता.



"तो म्हणाला की एवढी सिरियस केस आम्ही घेऊ नाही शकत ह्यांचे जगण्याचे चान्स खूप कमी आहेत. बेड सुद्धा नाहीय आता सगळे बेड फुल्ल आहेत आणि बेड रिकामी होण्यासाठी किती काळ जाईल सांगू शकत नाही."


जसे जसे डॉक्टर बोलत होता तस ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप गंभीर होत होते.


"ठीक आहे तरी ह्यांना आम्ही ॲडमिट करून घेतो. पण व्हेंटिलेटर खाली नाहीत. तुम्ही आत एक बेड अरेंज करतो त्यावर घ्या ह्यांना तो पर्यंत उपचार सुरू करूया."
डॉक्टर म्हणाले आणि धावतपळत आत निघून गेले.



ही कसली हवा येतेय नाकात. अचानक मिळणाऱ्या ऑक्सिजनने मला जाग आली. पण हे काय हे असे हाताने दाबून फुगा फुगत होता आणि मला मास्क मधून ऑक्सिजन मिळत होत. हे मी काय नवीनच बघत होतो. काय काय नवीन निघेल काही सांगता येत नाही असे म्हणून पुन्हा पडून राहिलो दुसरा काही पर्याय सुद्धा नव्हता. पाहायला गेलं तर फक्त प्राण होते माझ्या शरीरात. आता बाकी सगळे कृत्रिम मिळणार होत. आता तुम्ही विचार करत असाल की हे काय बडबड लावली आहे. तर या सविस्तर सांगतो.


मी एक म्हातारा. वय वर्ष साधारण ८२ ते ८४ असेल. असा विचार करू नका बरं की म्हातारा आहे म्हणून काही बडबडतोय. तर तसे काही नाहीय. खरं तर काय झालं अचानक एक दिवस मला लघवीला त्रास व्हायला सूरवात झाली. मी बाथरूमला जाऊन आलो आणि जे घरच्या बेडवर पडलो ते उठताच येईना. काय होतंय? काय झालंय? काही समजेना. घरातले घाबरून गेले. कसे तरी लेकाने आणि नातीने धरल मला आणि जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर आले तपासल. दोन - तीन प्रकारचे रिपोर्ट्स काढले आणि मला लघवीची पिशवी लावली. त्याने थोड बरं वाटतं होत आता मला. सलाईन मधून इंजेक्शन दिलं होत त्याने मला काही वेळ शांत झोप सुद्धा लागली. उठलो तर छान वाटतं होत. मनात विचार केला चला आता घरी जाता येईल. पण पुन्हा संध्याकाळी डॉक्टर आले म्हणे ह्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील ह्यांना तीन - चार दिवस ॲडमिट करावं लागेल. मी सांगत होतो. मला काही झालेलं नाहीय मी ठणठणीत आहे पण कोणी ऐकल नाही. ह्यांचे प्रयोग माझ्यावर सुरूच होते. पोटात अन्नाचा एक कण राहत नव्हता माझ्या. काही खाल तरी उलटी होत असे. असच त्या हॉस्पिटलमध्ये चार दिवस निघून गेले. आता मला सुद्धा जाणवत होत की माझी तब्येत जरा जास्तच खालावली आहे. आता डोक्यात काहीस दुखायला लागलं होत. मुंग्या फिरत होत्या नजरे समोर आणि सतत काहीतरी जाणवत होत किंवा विसरायला होत होते.


डॉक्टर आले. मला तपासल आणि म्हणाले.
"ही केस आम्हाला हाताळता येत नाहीय. तुम्ही ह्यांना दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा."
झालं सगळे भडकले. बरोबर आहे त्यांचं सुद्धा जर नव्हतच जमत तर चार दिवस कशाला ठेवायचं.


मी काय बोलणार. मला आता बोलता सुद्धा येत नव्हत आणि उठता सुद्धा येत नव्हत. सगळ्यांनी ठरवून मला आमच्या रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आता तुम्हाला विचार आला असेल. आमचं रेल्वेच हॉस्पिटल म्हणजे काय बरं. तर तुम्हाला सांगतो. मी रेल्वेमध्ये कामाला होतो. छान नोकरी, पगार, घर एवढंच काय तर तेवढाच मी धडधाकट होतो. कशाच व्यसन नाही. कसला घाणेरडा नाद नाही. कधी वाईट संगत नाही. अगदी सुशिक्षित आणि चांगल्या हुद्द्यावर होतो. आता तरी हे कसे झाले ते सांगतो तुम्हाला पण नंतर.


तर मला रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझ्यावर उपचार सुरू झाले. सलाईन लावलं. माझ्या पोटात काहीच अन्न राहत नव्हत म्हणून नाकावाटे पोटाच्या आतल्या भागापर्यंत एक नळी टाकली. मला ते काही सहन होत नव्हत पण त्यातून पाण्यासोबत औषध आणि ज्यूस वैगरे द्यायचं असच सांगितल होत. ह्यांनी परत वेगळे रिपोर्ट्स काढायला सांगितले. उद्या सी. टी . स्कॅन करायचं म्हणून दुसरीकडे घेऊन जावं लागेल असे सांगितल. कुठे नेणार आहेत ते सांगितल होत. पण हे बघा मी परत विसरलो. हे असे का होतंय काही कळत नाहीय.


दुसऱ्या दिवशी सकाळी मला रुग्णवाहिकेत टाकलं आणि नेल सी. टी. स्कॅन साठी. छान थंड वाटत होत आणि शांत सुद्धा पण मी मधेच उठून बसत होतो आणि बडबडत होतो म्हणून मला इंजेक्शन दिलं. अजूनही डोक्यात काही तरी मुंग्या फिरत होत्या. नंतर मला ती टेस्ट करून हॉस्पिटलमध्ये आणलं. रिपोर्ट्स तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. काही वेळाने शुध्दीवर आलो. खूप राग येत होता. सतत चिडचिड होत होती. असे वाटत होत हे सगळे जे होतंय त्याने मला त्रास होतोय हे ओरडून सांगव पण डोकं दुखत होत. शरीर साथ देत नव्हत आणि मी त्या हाताला लावलेल्या नळ्या आणि ती नाकातली नळी खेचून काढत होतो. अरे हो तुम्हाला सांगायचं राहिलं रिपोर्ट्स आले बरं का. मला ब्रेन स्ट्रोक झाला आहे असे काही तरी सांगितल डॉक्टरने...



To Be Continued...

🎭 Series Post

View all