Login

वासना...

इंटरनेट वापरा पण जरा जपून
वासना....
चॅम्पियन ट्रॉफी 2025
लघुकथा

"रिया.... रिया तुझ्या मोबाईलमध्ये कधीचे मेसेज येत आहे. आवाज कमी कर आधी त्या मोबाईलचा." कुसुम किचन मधून रियाला हाका मारत होती. रियाचा मोबाईल हॉलमध्ये होता आणि ती फ्रेश व्हायला आत तिच्या खोलीत गेली होती.
थोड्या वेळाने रिया बाहेर आली.

"काय झालं आई? का इतकी हाका मारत आहेस?"

"तो तुझा मेला मोबाईल कधीचा आवाज करतोय. कोण एवढे मेसेज करत तुला?"

"अगं आई, कोण असणार? माझ्या मैत्रिणी..."

"तेवढं लक्ष अभ्यासात दिलं ना तर टॉपला येशील."

"ह्म्म आणि त्याने काय होईल." रिया लाडात येऊन आईला मागेहून बिलगली.

"ह्म्म हा डबा घ्या आणि निघा आता कॉलेजला उशीर होतोय. "

रियाने डबा घेतला आणि ती गेली.

रिया वीस वर्षाची कॉलेज तरुणी होती. बी.बी.ए. च्या द्वितीय वर्षाला शिकत होती.
घरी आई बाबा, एक लहान बहीण आणि रिया असं चौकोनी कुटुंब होतं.

रिया लहानपणापासून अभ्यासात हुशार होती, पण थोडी चंचल होती.  समोरच्यावर लवकर विश्वास ठेवायची. समोर जे आहे ते खरं आहे असचं समजणारी. नेहमी घोळक्यात वावरणारी म्हणजे तिला तिच्या आजूबाजूला नेहमी माणसं हवी असायची.

तिचं लहानपणापासून एकच स्वप्न होतं. खूप शिकायचं आणि स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. कुणाच्यातरी हाताखाली काम करायचं हे तिला कधीचं पटलं नव्हतं.

एक दिवस मोबाईलवर मेसेज आला.

"हाय ब्युटीफुल.."
मेसेज वाचून मन फुलपाखरू सारखं उडायला लागलं.
'कोण असेल हा? आणि मला का मेसेज केला."

"कोण तू? आणि मला का मेसेज केला?" तिने रिप्लाय दिला.

"मी रोहन.."
दोघांची ओळख झाली.

रोज मेसेज वर बोलणं सुरू झालं.

एकमेकांना एकमेकांविषयी सांगून झालं.

आता रोज काय करतो- करते, जेवली- जेवला का इथपासून बोलण्याची सुरुवात होते ते अख्खी रात्र जागून निघते.

एकमेकांना प्रत्यक्षात कधीही न बघितलेले हे दोघे एकमेकांना फोटो पाठवायचे, एकमेकांची स्तुती करायला लागले.

महिनाभर चॅटिंग सुरू होतं.

रिया रात्री अभ्यास करायचं सोडून रोहनशी बोलायची.

"हाय." रिया
"हाय. आपण भेटायचं का? मला तुला प्रत्यक्षात बघायचं आहे."

"नको, मला भिती वाटते..कुणाला कळलं तर?"

"कुणाला कसं कळणार? आपण कुणालाही काहीही कळू द्यायचं नाही आहे. प्लीज भेट ना मला."

"ह्म्म बघू उद्या सांगते मी तुला."

दुसर्‍या दिवशी दोघांनीही भेटायचं ठरवलं.

रिया तिच्या खोलीत तयार होत होती.

रियाची आई आली.

बेडवर कपड्यांचा ढीग बघून तिच्यावर ओरडलीच.

"रिया अगं काय हे"?
"किती हा पसारा?"

"आई अगं कोणता ड्रेस घालू कळतं नव्हतं."

"तू नक्की कॉलेजलाच जात आहेस ना?"

"हो गं."

"मग रोज तर इतका विचार करत नाही. आज इतका नट्टापट्टा का?"

"असंच गं."

"बरं जायच्या आधी हे सगळं आवरून जा."

"हो मी करते सगळं, मला आधी तयार होऊ दे. खूप उशीर होतोय."

रिया पटापट तयार झाली आणि तिच्या स्कुटीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली.

तो आधीच येऊन बसलेला होता. हिची नजर त्याला शोधत होती.

क्षणात तो समोर दिसला. त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं फील झालं.

ती त्याच्या पुढ्यात उभी राहिली.
"हाय.." तिचा श्वास थोडा वाढला होता.

"हाय रिया..हाऊ आर यू.." तो कॅज्युअली बोलला.

तो नॉर्मल होता, तिच्या मनात मात्र फुलपाखरू उडायला लागले.

दोघांची नजरानजर झाली, जनरल बोलणं सुरू झालं.
त्याने तिच्या हातावर हात ठेवला, ती थोडी लाजली. तिला नाही म्हणायचं होतं, पण त्याच्या स्पर्शाची तिडीक तिच्या  हृदयापर्यंत पोहोचली होती.

दोघांचं निवांत बोलणं झालं, दोघेही त्यांच्या वाटेने निघाले.
रिया घरी आली.

"आज इतक्या लवकर कशी आली?"
"क्लास नव्हते म्हणून."

"हात पाय धुवून घे आणि जेवण कर."
"नको.. मला भूक नाही आहे."

रिया तिच्या खोलीत निघून गेली.

मोबाईलमध्ये त्याचा फोटो बघू लागली.

"किती क्यूट आहेस तू.. हॅन्डसम...कूल... अगदी स्वप्नातल्या राजकुमारसारखा."

त्याच्या जादूने रियाच्या मनावर भुरळ पाडली होती.
ती त्याच्या स्वप्नात रंगायला लागली.

एक दिवस तो बोलला..

"रिया आय लव यू.."

तिच्यासाठी 'सोने पे सूहागा' असं झालं होतं.

"रिया तुझं उत्तर आलेलं नाही आहे."
"बोललंच पाहिजे का?"
"न बोलून कसं कळेलं?"

"आय लव यू टू.."

तिने लगेच फोन ठेवला..
बेडवर पडून स्वप्नं बघायला लागली. मंद आवाजात गाणं सुरु होतं.

'पहला नशा, पहला खुमार
नया प्यार है नया इंतज़ार
कर लूँ मैं क्या अपना हाल
ऐ दिल-ए-बेक़रार
मेरे दिल-ए-बेक़रार तू ही बता..."

आता ती त्याच्या स्वप्नात जगायला लागली.
हळूहळू भेटी वाढल्या, शारीरिक आकर्षण निर्माण झालं.

त्याचा स्पर्शाची जादू तिच्यावर हावी होतं होती.

"रोहन, हे चुकीचं आहे."

"काय चुकीचं आहे, आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपलं मन एकत्र आलंय तर मग हा शारीरिक दुरावा का? मन एक झालंय मग तन एक नको व्हायला.

तिला नाही असं स्पष्ट सांगायचं होतं पण ती बोलूच शकली नव्हती.

'कळतं पण वळत नाही' अशी अवस्था झाली होती.

त्याच्या स्पर्शाने हळूहळू तिचं तन शहारून आलं.
दोघेही एकमेकांमध्ये सामावून गेले.

दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली होती.

काही वेळाने ती भानावर आली, स्वतःला असं बघून सैरावैरा झाली, अंगावर कपडे चढवले आणि तिथून निघून थेट घरी आली.
बाथरूममध्ये शॉवर घेतला, स्वतःच्याच नजरेला नजर मिळवू शकत नव्हती.

तिने त्याला लग्नाबद्दल विचारलं.

"रोहन आपण लग्न करुयात."

तो हसला...जोरजोरात हसला.

"वेडी आहेस तू? मूर्ख आहे? लग्न आणि मी तेही तुझ्याशी?"

"व्हॉट डू यू मिन तुझ्याशी? प्रेम करतोस ना माझ्यावर मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे?"

"मी तुझ्यावर प्रेम करत नाही."

"काय? काय बोललास तू? तुझं माझ्यावर प्रेम नाही? मग इतके दिवस, महिने आपण जे बोलत होतो, भेटत होतो ते सगळं काय होतं? आणि त्यापलीकडे तू जी शारीरिक जवळीक निर्माण केली ती..काय होतं ते?"

"ती फक्त वासना होती...कळलं तुला फक्त वासना होती.
मला तुझ्याशी आता कधीही बोलायचं नाही आहे रिया."

"एक मिनिट...एक मिनिट रोहन.. तू फोन ठेवणार नाही आहेस, माझं अजून बोलून झालेलं नाही आहे.
तू चीट केलंय मला. तू फक्त माझा वापर करून घेतला. बोल रोहन...बोल."

"हो..हो वापर करून घेतला मी तुझा आणि आता मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही आहे." रोहनने फोन ठेवला.

रियाने टाहो फोडला, ध्यानीमनी नसताना तिच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं होतं.
ती खूप रडली, मनातलं कुणालाही सांगता येत नव्हतं, कोंडी व्हायला लागली होती तिची...

दिवस गेले, महिने गेले...रियाने स्वतःला सावरलं कुणालाही काहीही कळू न देता..

यानंतर असं काही आपल्या आयुष्यात घडू द्यायचं नाही ही गाठ मनाशी पक्की करून पुढील वाटचाल सुरू केली.
तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पी.जी. पूर्ण करून पी.एच. डी. पूर्ण केली. स्वतःचा व्यवसाय सुरू केला. बहिणीला शिकवलं. आई वडीलांना आधार दिला. स्वतःला भक्कम बनवलं आणि आता एंट्री झाली ती सोहमची...

पण रिया नम्रपणे त्याला नकार देऊन मोकळी झाली. तिने एका मुलीला दत्तक घेतलं आणि तिच्यासोबत ती आनंदाने राहू लागली...

समाप्त

ऋतुजा वैरागडकर

आजच्या युगात मोबाईलचं खूप फॅड आलंय. लहाणापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे मोबाईल वापरतात. मोबाईलचा जितका सदुपयोग होतो. तितकाच दुरुपयोग पण होतो. ऑनलाईन मैत्री केली जाते. ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही तो जवळचा वाटायला लागतो. ऑनलाईन मैत्री करा पण जरा जपून... रिया सारख्या खूप घटना आपल्या समाजात घडतात. कुठेतरी याला आळा बसायला हवा.


0