फिरुन पडली गाठ

पहिल्या प्रेमाची पुर्नभेट
आज सकाळपासूनच घरात लगबग चालू होती .मीराला सकाळपासून जराही फुरसत नव्हती. घरातली आवराआवर जोरदार चालू होती. तिच्या सायलीला बघायला, आज मुलाकडची मंडळी येणार होती. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सायली साठी बऱ्याच दिवसापासून वरसंशोधन चालू होते .आज पहिल्यांदाच पत्रिका फोटो सारे काही जुळल्यानंतर एक मुलगा बघायला येणार होता. पहिलावहिला हा कार्यक्रम असल्यामुळे मीरा एक्साईटेड होती. त्याबरोबर सायली ही बावरलेली होती तिच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग .
तिच्यासाठी स्थळ पाहण्याआधी मीराने मोकळेपणाने ,तिने बाहेर कुठे कुणाशी जमवले आहे का ?हे विचारून घेतले होते.कारण सायलीचे मित्र मंडळ बरेच मोठे होते, पण सायलीने ,मला भरपूर मित्र मंडळ आहे पण ज्याच्याशी लग्न करावंसं वाटेल असं कोणीच नाही त्यामुळे तुम्हीच माझ्यासाठी योग्य मुलगा शोधा असं म्हणून आई-बाबांना मोकळीक दिलेली होती .
मग ओळखीपाळखी च्या लोकांना ,नातेवाईकांना सांगणे ,समाजाच्या वधु वर सूचक मंडळांमध्ये नाव नोंदवणे ,या सर्व प्रोसेस मधूनच तिच्यासाठी वरसंशोधन सुरू होते .
आणि आज त्यातलाच एक मुलगा निखिल आणि त्याचे आई-बाबा तिला बघण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी येणार होते, अर्थातच भेट पारंपरिक ,बघण्याचा कार्यक्रम मीराच्या घरीच होणार होता .
ठरल्यावेळी मंडळी आली. पारंपरिक चहा-पोहे ऐवजी ,इडली सांबार आणि बंगाली मिठाई असा प्रोग्राम मीराने बनवला होता. निखिलच्या वडिलांकडे बघून मीरा थोडी चकितच झाली, तो तिच्या कॉलेजमधला मित्र अविनाश होता .तोच अविनाश ज्याच्यावर ती मनोमन प्रेम करत होती, आयुष्यभर प्रेम निभावण्या च्या आणाभाका घेतल्या होत्या, पण घरच्यांचा विरोध असल्यामुळे दोघांनीही माघार घेतली होती, आणि घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाशी /मुलीशी विवाह केला होता .अर्थातच 25 वर्षांपूर्वीचा तो काळ होता ,ज्या वेळेला आई-वडिलांना आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या तोडीस तोड असे स्थळ आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हवे असायचे. मीराच्या आई-बाबांच्या दृष्टीने अविनाशचा आर्थिक आणि सामाजिक त्यांच्यापेक्षा कमी होता. आणि केवळ विरोधासाठी विरोध किंवा मुलीने निवडलेल्या मुलाशी लग्न करू द्यायचे नाही असा हट्ट यामुळे हे लग्न झाले नव्हते .
अचानक पणे मुलीच्या सासऱ्याच्या रूपात अविनाशला बघून मीरा गोंधळून गेली .अविनाशनेही मीराला ओळखले, त्यालाही काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेना .
एकमेकांना विसरून बराच काळ झाला होता ,आणि आज अचानकच दोघे समोरासमोर उभे ठाकले होते आपला भूतकाळ, मुलांच्या भविष्यकाळाच्या आड येऊ नये अशी दोघांचीही मनोमन इच्छा होती ,आणि त्यासाठी एकमेकांसमोर सहज वावरणं आवश्यक होतं .मीराने कसेबसे स्वतःला सावरले .अविनाशनेही चेहरा निर्विकार केला ,आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीने प्रमाणे संवाद चालू केला.
चहापाणी आणि खाणेपिणे आटोपल्यावर अविनाशच्या बायकोनेच प्रस्ताव मांडला की निखिलला आणि सायलीला एकमेकांशी काही बोलायचे असेल तर त्यांना थोडा वेळ बाहेर पाठवून देऊ या .
अर्थातच यात हरकत घेण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे सगळ्यांनी होकार दिला आणि निखिल आणि सायली जवळच असणाऱ्या मॉलमध्ये फिरायला निघून गेले .
घरी उरले चौघेजण एकमेकांशी काय बोलावे याच्या विवंचनेत शेवटी अविनाशने पुढाकार घेतला आणि बोलायला सुरुवात केली "मंगेश तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मीरा माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे बरं का "
मीराला असे काही अविनाश बोलेल हे ठाऊक नसल्यामुळे ती चकित झाली आणि तिने ही सांभाळून घेतले," होओळखले तुला तुझ्यासोबतचे दिवसही आठवले."

मात्र मीरा सोबतच्या संबंधांविषयी अविनाशने सांगितले असल्यामुळे अनघालं लगेच कळले. मंगेशला मात्र मीराने आपल्या लग्नाआधीच्या आयुष्याविषयी आणि अविनाश विषयी काहीच सांगितलेले नव्हते, त्यामुळे खरोखर ती घाबरली होती आणि आता जर आपल्या मुलांनी लग्नाला होकार दिला तर वारंवार आपण असे समोर येऊ आणि जुने दिवस आठवतील त्यामुळे तिला मनोमन हे लग्न जमू नये असे वाटायला लागले .
तिच्या चेहऱ्याकडे पाहून अविनाशला तिच्या मनातली घालमेल समजली पण तो त्या क्षणी काहीही करू शकणार नव्हता कारण मंगेश समोर काही बोलून त्याला तिला ऑकवर्ड करायचे नव्हते.
थोडेसे नातेवाईकांविषयी ,मुलांविषयी ,मुलांच्या आवडीनिवडी विषयी विविध विषयांवर बोलत एक तास कसा गेला ते कळलंच नाही .
तेवढ्यात निखिल आणि सायली ही फिरून आले आल्यावर दोघांनीही एक-दोन दिवसांमध्ये विचार करून आम्ही निर्णय सांगतो. गरज पडली तर पुन्हा एकदा भेटू ,असे म्हणून मोठ्यांना वेळ मागून घेतला.
अविनाश अनघा आपल्या घरी परतले इकडे मीराच्या मनाची घालमेल चालू होती. तिला एकीकडे मंगेशला जुने सर्व सांगून टाकावे असे वाटायला लागले तर दुसरीकडे हे लग्न जमलेच नाही तर कशाला आता एवढ्या जुन्या जखमेवरची खपली काढा, त्यामुळे गप्प रहावे का असे तिला वाटायला लागले .
दुसऱ्या दिवशीची दुपार उजाडली. मीरा घरातली काम आटपून थोडीशी निवांत होती, तेवढ्यातच फोन वाजला पलीकडे अविनाश होता त्याने म्हटले "मीरा आपल्या मुलांचे लग्न जमले तरी तु मनावर दडपण ठेवू नको जुन्या गोष्टी मी कधीच विसरलो आहे आणि तुझ्या ही मनावर तुला दडपण नको असेल तर तू मंगेशला आजच आपले जुने संबंध कसे होते ते सांगून टाक त्याचं मळभ आपल्या मुलांच्या भविष्य काळावर नको आपण दोघेही सुशिक्षित होतो मनापासून आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहिलो आहे त्यामुळे आपल्याला संकोच वाटायचे काही कारण नाही अनघाला तर मी लग्न आधीच आपल्या दोघांविषयी सांगितले होते त्यामुळे काल तुला भेटल्यावर पण तिने काहीही वेगळी प्रतिक्रिया दिली नाही उलट मीरा छान आहे असं ती म्हणत होती "
मीराला ही अविनाश चे बोलणे पटले. संध्याकाळी मंगेश ऑफिसमधून आला की आपण त्याच्याशी याविषयी बोलावे असे तिने ठरवले .संध्याकाळी नेहेमीप्रमाणे मंगेश ऑफिसमधून आला चहापाणी झाल्यावर मीरा म्हणाली ,"थोडं बोलायचं आहे"
मंगेश म्हणाला ,"ठीक आहे बोल "
"काल आपल्याकडे निखिल आणि त्याचे आई वडील आले होते तुम्हाला माहीत आहे का की हा अविनाश कोण होता माझ्या कॉलेजमधला मित्र "
मंगेश म्हणाला ,"हो मला माहित आहे, अगं तू जरी मला सांगितलं नाहीस तरी तुझ्या बाबांनी लग्नाआधी मला तुझे आणि अविनाशचे एकमेकांवर प्रेम होते, पण तुमचं आर्थिक आणि सामाजिक स्तर जुळत नसल्यामुळे ,लग्नाला परवानगी दिली नाही हे सांगितले होते. मी तर ते त्याच वेळी विसरून गेलो होतो कारण लग्नानंतर तू माझ्याशी किती एकनिष्ठ होतीस,माझ्यावर प्रेम करत होतीस, हे मला दिसतच होते ना
.काल तू अविनाशला बघून गोंधळलीस हे जाणवलं मला, पण मीही विचार केला की मी जर हा विषय काढला तर तुला ऑकवर्ड वाटेल त्यापेक्षा ,आपण पुढे काय होईल ते बघूया आणि तू जर बोललीस तर मग तुला खरी गोष्ट सांगून टाकूया"
मीराच्या मनावरचं ओझं उतरलं .आता सायली आणि निखिल चे लग्न ठरले तरी ,तिला कसलेच दडपण असणार नव्हते आणि तिला तिच्या बाबांचा ही त्यावेळेला अभिमान वाटलं की त्यांनी खरं काय ते सांगितलं होतं
निखिल आणि सायली ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा भेटले आणि दोघांनाही आपण एकमेकांना अनुरूप आहोत असं पटलं त्यांच्या आई-वडिलांच्या सहमतीने लग्नही ठरलं .आता मीराच्या मनावर कोणतंही दडपण नव्हतं मंगेश च्या साथीने, ती अविनाशशी पुन्हा एकदा मैत्री करणार होती .



भाग्यश्री मुधोळकर