Login

आम्ही जिगरी दोस्त - भाग १

गावातील पाच शाळकरी मुलांची गोष्ट
शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा


पात्र परिचय:
पाच जिगरीदोस्त: महाद्या,रम्या,गोट्या,बाळ्या,किशा( वय साधारण १४ ते १५ वर्षे)
महाद्या: पाच जिगरी दोस्तांतील एक
पारू: रम्याचे शाळेतील प्रेम
आजी:बाजूच्या शेतात काम करणारी व्यक्ती
जमाव(५ ते ६ बघणारी माणसं):आजूबाजूच्या शेतात काम करणारे लोक
विनोद: शहरात काम करणारा, एका कंपनीतील मोठ्या हुद्दयावरील मॅनेजर,एक सुजाण मदतगार नागरिक.गावाकडे जमीन घेऊन गावासाठी काहीतरी करण्याचा मानस असणारी व्यक्ती.
राम: महाद्याचे वडील
सखू: मृत केशवची बायको
अजय सर: शाळेचा संस्थापक,सर्वेसर्वा

स्थळ:‘विकास विद्या मंदिर’ शाळा

“आज रम्याची चांगलीच मजा घेऊ.त्या पारूकडे गुपचूप टक लावून पाहत असतो.आज याची पोल खोलतोच! तेही सगळ्यांसमोर.. नाही म्हणजे त्याच्या इज्जतीचा फालुदा करेन पण आमच्या पाचच जणांमध्ये.आमच्या जिगरी यारांपुढे..कारण तो पण आमच्यातीलच एक ना.चला, रोजच्या सवयीप्रमाणे सर्वांत आधी येऊन आमच्या ‘विकास विद्या मंदिर’शाळेचे गेट उघडणारा शाळेचाच विद्यार्थी महाद्या, म्हणजे मी, आई सरस्वतीला प्रणाम करतो.”

(नमस्कार करुन,गेट उघडून महाद्या आत आला आणि जोरात किंचाळला.)

“ खून, खून,खून..”

(समोर असलेला छिन्न विच्छिन्न मृतदेह पाहून त्याला ग्लानी आली आणि तो कोसळला.त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणारे लोक गोळा झाले.
सारेच समोरील वास्तव पाहून घाबरले आणि आश्चर्यचकित झाले.त्यांच्यात कुजबुज सुरू झाली.काहीजण रडू लागले.)

जमलेल्या लोकांपैकी एक आजी शाळेच्या प्रवेश द्वारावर असलेल्या श्री गणेशाला पाहत म्हणाल्या, “ देवा,एवढ्या दिवसांत माझ्या गावाने इतकी संकटे पाहिली पण हा खून खराबा? काय समजायचं आम्ही? काय चुकलं आमचं? का कोपलास आम्हाला?”

(जमावातील बायका तसेच माणसं कानाला हात लावून मनातल्या मनात क्षमा याचना करू लागली.)

त्या गर्दीतच उभा असलेला विनोद,हतबल होऊन ,चिंताग्रस्त मुद्रेत, समोरील दृश्याकडे पाहत तसेच परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून ग्लानी आलेल्या महाद्याच्या पुढे आला.त्याने त्या मुलाला जवळ घेतले.

जमावातून पुढे येत राम नावाचा गृहस्थ म्हणाला,
“विनोद साहेब,हा तर माझा महाद्या आहे.काय झालं रे देवा याला?”

“शांत व्हा.. असं घाबरून चालणार आहे का?आधी याला शुद्धीवर आणण्यासाठी इथून जरा लांब व्हा..” विनोद म्हणाला.

सारे दूर झाले.

“जरा पाणी द्या.” विनोद म्हणाला.

विनोदने महाद्याला आपल्या मांडीवर शांतपणे झोपवले. महाद्याच्या छोट्या पिशवीत पाण्याची बाटली होती.त्याच्या वडिलांनी ती विनोदकडे दिली.त्यातील पाणी विनोदने मुलाच्या तोंडावर शिंपडले.
महाद्या जागा झाला.

समोरच आपल्या वडिलांना पाहून, कापऱ्या आवाजात महाद्या म्हणाला, “बाबा,बाबा,ते समोर,तिथे…”

“दादा,याला आधी घरी घेऊन जा..शांत करा..” विनोद सामंजस्य दाखवत म्हणाला.

महाद्या आणि राम तिथून घरी निघाले.

जमलेल्या जमावाला उद्देशून विनोद म्हणाला,
“हे बघा, हे देवाचा कोप वगैरे काहीही नसतं.. आपल्याला हा खून कोणी केला, का केला हे शोधायला हवे.या दुःखातून मार्ग काढायला हवा.”

त्या मृतदेहाजवळ एक बाई आली आणि म्हणाली,
“माझं धनी काल पासून घरात नाही.हे माझे धनी तर नाहीत?”

तिने त्या देहाला निरखून पाहिले.कालच आपल्या लेकीने बनवलेली काड्यांची अंगठी त्या मृतदेहाच्या बोटात पाहून जोरात टाहो फोडत,ती जोरात ओरडली,
“धनी..”

ती ओक्साबोक्शी रडू लागली.जमावातील बायका तिला सावरण्यासाठी पुढे आल्या.

“अगदी सरळमार्गी धनी होता हो माझा. आपलं काम भलं अन् आपण भलं. मग कोणी केला त्यांचा घात? का केला?का अशी अवस्था करून त्यांना मरणाच्या दाढेत टाकलं? का?”

जमावातून पुढे येत आजी म्हणाल्या,
“सखू,शांत हो..”

सखू रडत रडत म्हणाली, “विद्यामंदिरातच व्हायचं होतं का हे?”

“सखू,आम्ही तुझ्यासोबत आहोतच.आपण तपास नक्कीच करू.आपल्या शाळेचे अजय सर आणि हा भला माणूस,विनोद नक्कीच काहीतरी मार्ग काढतील या शोधासाठी..” आजी आश्वासक होऊन म्हणाल्या.

तेवढ्यात अजय तिथे आला.

“विनोद,काय झालं आहे? शाळेसमोर एवढी गर्दी?” अजय म्हणाला.

विनोदने समोर बोट दाखवत अजयला तिकडे बघण्याचा इशारा केला.अजयने समोर पाहिले.तो अवाक झाला आणि त्याने खाली बसून घेतले.विनोदने त्याला उठवले आणि त्याच्या खांद्यावर प्रेमाने, सहानुभूतीपूर्वक हात ठेवला.

अजयने निशब्द होऊन मनात विचार सुरू केला,

‘झालेल्या घटनेचे पडसाद आता पूर्ण गावावर नक्कीच पडलेत.त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल?काय करावे यातून मार्ग काढण्यासाठी?हा खून म्हणजे नेमके काय प्रकरण आहे?गावातील माणसं तर साधी भोळी आहेत.. मग असे कसे काय घडले? तेही माझ्या शाळेच्या प्रांगणात?'

क्रमश:

भाग १ समाप्त..

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.