सहाच महिने झाले सुनिताच्या लग्नाला. नवरा व बायकोत सर्व काही छान सुरू असतांनाच अचानक एक दिवस तिच्या नवऱ्याने, दिपकने तिला माहेरी आणुन सोडले. माहेरची मंडळी हक्के बक्के झाली. विचार करू लागली की हे असे कसे झाले? दीपकला सुनीता किती आवडायची. त्याने त्याच्या घरच्यांच्या, नातेवाईकांच्या, सर्वांच्या विरोधात जाऊन सुनिताशी लग्न केलेले. त्यामुळे त्याने जेव्हा सुनिताला माहेरी सोडायचा निर्णय घरी सांगितला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी किंवा घरातील इतर कोणीही त्याला थांबवले नाही.
दिपक एक अज्ञाकारी, सु स्वभावी, चार लोकात उठून दिसणार असा लोभस मुलगा, त्याचं घराणं गावातलं नावाजलेलं घराणं. आपल्यातील मतभेद आपल्यातच ठेवून मान मर्यादा पाळत अजुनही पन्नास ते साठ स्त्री-पुरुष सदस्यांचे एकत्र कुटूंबं. दिपकच्या दोन काकांची मुलं डाॅक्टर, इंजिनीअर होऊन मोठ्या शहरात सेटल झालेले. तर दिपक सर्वांत लहान लाडाचा, लाडात वाढवलेला शेंडेफळ. तो तरी गावात आपल्या जवळ, आपल्या सोबत राहावा, वडिलोपार्जीत पंचांवन्न एकर शेती त्याने पाहावी. या इराद्याने त्याच्या बाबा व काकांनी त्याला डॉक्टर इंजिनियर न बनवता शिक्षक बनवलं. जेणेकरून तो गावातच राहून गावातील मुलांना शिक्षणाचे धडे देईल. यात त्यांचा हेतू गावकऱ्यांसाठी या पिढीतील चांगला शिक्षक देणे हाही होता. त्यांनी दिपकसाठी गावातच स्वतःची पाचवी पर्यंत शाळा काढली. त्याला आपल्या भावंडांपेक्षा काही कमी वाटू नये म्हणून त्याची खोली शहरातील चांगल्या इंटेरियर डिझायनरला बोलवून सजवली, शहरात असतील नसतील त्या सर्व सोयी सुविधा त्यांनी दीपकलाही द्यायचे ठरवले. त्याच्या खोलीत एसी सुद्धा लावला. सर्वांचा लाडोबा असलेल्या दिपकचाही त्याच्या घरच्यांवर खूप जीव होता. त्यांच्या शब्दाबाहेर तो कधीच जायचा नाही.
वयाची पंचविशी पार झाली तशी चांगल्या चांगल्या घरच्या उच्चशिक्षित व सुंदर मुलींची स्थळं त्याच्यासाठी येऊ लागली. परंतु त्याच्या घरच्यांना त्याच्यासारखीच सु स्वभावी, त्याच्या इतकेच शिक्षण असलेली शिक्षिका व त्यांच्या घराण्याच्या तोला मोलाची मुलगी हवी होती. मात्र त्यांना हवी तशी मुलगी काही मिळेना. कोणी सुंदर असे, पण तिचे शिक्षण जास्त किंवा वेगळे असे. एक दोन शिक्षिका मुली त्याच्या आई-वडिलांच्या मनात बसल्या पण लग्न झाल्यावर त्यांना गावात राहायचे नव्हते. काही शिक्षिका व गावात राहायला तयार मुली मिळाल्या परंतु त्या दिसायला त्याला साजेशा किंवा अगदीच सामान्य होत्या. कुठे एखाद्या मुलीचा स्वभावच त्यांना पटेना.
बिचारा दिपक एक महिन्यात मुली बघण्याच्या कार्यक्रमाला जाऊन जाऊन पार थकला. त्याने घरी सांगून दिले की तो आता एक वर्ष तरी अजिबात मुली बघायला जाणार नाही. उगीच निराशा पदरी पडते. त्याच्या भाऊ-बहिणींनीही हेच ठीक समजले. कारण मुलगी पाहताच त्याच्या तारुण्य सुलभ भावना जागृत व्हायच्या मात्र त्या मुलीत काही ना काही खोट निघे अन घरची मंडळी तिला नापसंत करत किंवा त्या मुलीच्या अपेक्षेत हा बसत नसे. यामुळे त्याला त्रास व्हायला लागला.
काही दिवस हा मुद्दा दूर ठेवणेच योग्य असे सर्वांनी निश्चित केले. दिपक परत आपल्या शाळेवर लक्ष देऊ लागला. शाळेचा व्याप मोठा असल्याने त्याला इतर सर्व गोष्टी विसरण्यात काही वेळ लागला नाही.
अशातच एका मित्राच्या लग्नात त्याने अठरा वर्षाच्या सुनिताला पाहीलं. गोरीपान, नाजूक चनिची सुनिता त्याला पहिल्याच नजरेत भावली. तिच्याबद्दल आणखी माहिती काढता यावी म्हणून त्याने त्याच्या घरच्यांनाही सांगितले. त्याच्यासाठी स्थळ बघणे सुरूच होते म्हणून त्यांनाही यात काही वावगं वाटलं नाही. सुनिता कोण, कुठली, कोणाची मुलगी ही सर्व माहिती त्यांनी काढली. सुदैवाने सुनिता त्यांच्याच दूरच्या नात्यातली निघाली. बारावी उत्तीर्ण करून डि. एड. चे शिक्षण घेणारी, त्यामुळे त्यांना जशी हवी तशी मुलगी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा