Login

आम्हाला नवरा व्हायचंच नाहीये..- भाग १

आधुनिक विवाहित मुलींची कैफियत
“ दीड वर्ष सुद्धा झालं नाही तुम्हा मुलींच्या लग्नाला आणि लगेच आल्या तक्रार घेऊन..महिला आयोग आहे हा,दुकान नाही लग्न जमवायची किंवा मोडण्याची..”
महिला आयोगाच्या अध्यक्षा नेहा पांडे मॅडम रागातच बोलल्या.

“माफ करा मॅडम,पण तुम्ही खरंच महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात ना?”ज्योती म्हणाली.

“हा काय मुर्खासारखा प्रश्न आहे?”पांडे मॅडम आता चांगल्याच बरसल्या.

“ सॉरी मॅडम,पण तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती.”मेघा म्हणाली.

“हे बघा,महिला आयोगाचं काम महिलांना त्रासातून मुक्त करणे हा आहे;नव्हे त्यासाठीच तर आम्ही इथे बसलेलो आहोत पण आजकालची पिढी खरंच वाया गेली आहे.त्यातल्या त्यात मुली समजतात कोण स्वतःला?हल्ली किरकोळ कारणावरून त्या महिला आयोगाकडे तक्रार घेऊन येतात. त्यावरून असं वाटतंय की घरात बायको म्हणून राहण्यापेक्षा नवरा बनायला जास्त आवडतं त्यांना..”

“ माफ करा मॅडम,आम्हाला नवरा व्हायचंच नाहीये.नवरा आणि बायको हे नात्यातील अंतर वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर असलं तरीही बायको म्हणून कोणाची गुलामगिरी सहन करायची आता आमच्यात ताकद नाही.बरोबरीचा अधिकार आम्हालाही हवा आहे मग आम्ही बायको म्हणून राहायला तयार आहोतच पण आमच्या नवऱ्यांनीच आम्हाला अशी टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडलं आहे; म्हणजे तुमच्या भाषेत घरात अगोदरच नवरा असूनही पुन्हा आम्हाला नवरा बनायला भाग पाडले आहे.”राणी म्हणाली.

“ म्हणजे?”

“ कसं आहे ना मॅडम,आम्ही मुली तर आधुनिकच आहोत,आमचे नवरे,त्यांच्या घरचे देखील शिक्षितच आहेत पण म्हणून आमच्या तक्रारींची कारणे थातूरमातूर नक्कीच नाहीत.”राणी

“ हे बघा,शब्दांचे खेळ खेळण्यापेक्षा सरळ तुमच्या तक्रारी किंवा असे काही प्रसंग सांगा,जे तुमचा त्रास अधोरेखीत करतील.”पांडे मॅडम

“ठीक आहे मॅडम,मी ज्योती पाटील.मी तुम्हाला एक कॉमन प्रसंग सांगते जो हल्ली रोजच आमच्या नवरा बायकोत घडतो..”

“ ठीक आहे,सांगा..”

ज्योतीने पुढील प्रसंग अगदी जसाच्या तसा पांडे मॅडमपुढे मांडला..
____________
“ राजेश सोड मला.. काय करतोय तू?”

(जोरात हात पिरगळत)“ तेच जे एका नवऱ्याला करायला हवं.”

“ आ..आ..मीही तुझ्यासारखं वागू शकते.”

( रागाने लालबुंद होत..)” काय म्हणालीस?
ज्योती नाव आहे ना तुझं?लक्षात ठेव..मी या घराचा कर्ताधर्ता पुरुष आहे.बायकांना पूर्वीपासून एकच काम आहे,चूल आणि मूल.समजलं? आणि नवऱ्याचं काम असतं बायकोला ताब्यात ठेवणं;(हात आणखी पिरगळत)म्हणून बायको बनूनच राहायचं.”

( राजेशने धरलेला हात सैल करण्याचा प्रयत्न करत..)
“ हे बघ राजेश, मी तुझी बायको आहे.अरे,आता कुठे आपण आपला संसार थाटला आहे.”

“ म्हणूनच म्हणतो,आधीपासूनच बायकोसारखं राहायचं;निमूट आणि मोलकरीण म्हणून.समजलं?”

क्रमशः
भाग १ समाप्त..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


0

🎭 Series Post

View all