Login

आम्हाला नवरा व्हायचंच नाहीये..- ३(अंतिम भाग)

आधुनिक विवाहित मुलींची कैफियत

“ हम्म “पांडे मॅडम

“ नुसतं हम्म बोलून किंवा मुलींना नावं ठेऊनच तर समाज अशा विकृतींना घास टाकतोय मॅडम.. आज समाज एवढा प्रगत असूनही नवरा आणि बायको या नात्यांत घरातल्या जबाबदाऱ्यांचे अंतर का पाळले जाते? खरं तर या सगळ्या आमच्या क्लेश कलहाचे कारण आम्ही मुली नसून आमचे नवरेच आहेत.”राणी

आता मात्र पांडे मॅडम यांच्या भुवया उंचावल्या.

“ माफ करा मॅडम.मी नावाने राणी आहे शिवाय यांच्यासारखीच माझी कहाणी आहे परंतु ती कहाणी ऐकवून तुमची सहानुभूती मिळवण्यात मला अजिबात रस नाही.मला केवळ नी केवळ धडा शिकवायचा आहे..कोणाला माहितीये? लग्न झाल्यानंतर तयार झालेल्या या लिंग-भेदभावाला! नवरा बायको या नात्यातील त्रासिक अंतराला..आम्हा मुलींना तर लहानापासून सगळं आलं पाहिजे असं शिकवलं जातं; मग मुलांना का नाही?तुम्हाला माहितीये? जपानमध्ये स्वयंपाक शिकणे ही कला सर्वांना म्हणजे मुलाला आणि मुलीला यायला हवी म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.”
राणीचे सडेतोड बोलणे ऐकून पांडे मॅडम पुरत्या खजील झाल्या.त्यांना काय बोलावे ते कळेना.

“डोन्ट वरी मॅडम.. हे घ्या पाणी.( पांडे मॅडमनी घटाघटा पाणी पिले.) आता तुमचंच उदाहरण बघा,तुम्ही त्रासलेल्या महिलांची जबाबदारी घेतलीच आहे ना? कोणाच्या सपोर्टमुळे? तुमच्या घरच्यांच्या.. बरोबर?”
राणी अगदी मुद्देसूद तरीही परखडपणे बोलली.

“ हो, खरंय..”

पांडे मॅडम मध्येच टाळ्या वाजवू लागल्या..महिला आयोगाच्या कार्यालयात तूर्तास मैत्री झालेल्या राणी,मेघा आणि ज्योती गोंधळात पडल्या.

पांडे मॅडम पुढे म्हणाल्या,
“ मुलींनो,तुम्ही आपली बाजू यशस्वीपणे मांडली आणि मला जिंकलंत.तुमचे अन्यायाविरुद्ध लढण्याचे हेच रौद्र रूप बाहेर आणण्यासाठी मी हे मुलींच्या बाजूने नसल्याचे नाटक केले.खरं सांगू?सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा देऊन स्वतःला सिद्ध व्हावे लागले होते कारण?नवरा आणि बायको हे नात्यातील अंतर..अगदी मुलीच नाही तर मुलांना देखील काही मुली खूप त्रास देतात,धारेवर धरतात; किंबहुना अशीही प्रकरणे मी मार्गी लावली आहेत.त्या केसमध्ये महिला आयोगाची अध्यक्ष असूनही मी अत्याचार पीडित मुलाला देखील खंबीर केले.”

मेघा,ज्योती आणि राणी अवाक होऊन मॅडमकडे बघतच राहिल्या कारण एक महिला म्हणून पांडे मॅडमने देखील त्यांच्यातील स्त्रीला खंबीर करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी,नात्यातील अंतराची भिंत जमीनदोस्त करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची एक अनोखी तरीही धाडसी अनुभूती दिली होती.

वाचकहो,आज घटस्फोटांची प्रकरणे सारखी वाढत आहेत,मुली किंवा मुलं लग्न करण्यासाठीच नकार देत आहेत.का? कारण कुठेतरी घरात किंवा आजूबाजूला त्यांनी या नात्यातील अंतर त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.म्हणून हे सारं सुरळीत होण्यासाठी पांडे मॅडमांसारखी सुजाण व्यक्ती प्रत्येक वेळी भेटेलच असे सांगता येत नाही,त्यामुळे आपल्या मुलांना आणि मुलांना घरातच हे नाते किती दृढ असू शकते,किती प्रेमळ असू शकते याची प्रत्यक्ष अनुभूती दिली तर समाजाला लागलेला हा घटस्फोटाचा किंवा लग्न टाळण्याचा विळखा नक्कीच संपुष्टात येईल.हो ना?