Login

आम्ही जिगरी दोस्त - भाग ८

गावाकडील शाळेच्या जिगरी दोस्तांची गोष्ट

शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त भाग ८
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा

मागील भागात आपण पाहिले की अजय सर झोपेत स्वप्न बघतात.ज्यात त्यांना त्यांच्या शाळेचा पहिल्या दिवसाचा फ्लॅशबॅक जसाच्या तसा डोळ्यांसमोर दिसू लागतो.त्यांची स्वतःची शाळेबद्दलची असणारी धडपड त्यांच्या भाषणातून सर्वांना समजते.ते गाढ झोपेत असतात.आता पाहुया पुढे..

पात्र परिचय:
अजय सर : शाळेचे संस्थापक
यमुनाबाई : अजयची आई

स्थळ :अजयचे घर

तेवढ्यात अजय सरांना कोणीतरी आवाज देत असल्याचे लक्षात आले.
“अजय,अजय..”

अंथरुणात असलेली त्यांची आजारी आई वेदनेने विव्हळत होती.

अजय सर ताडकन उठले.आई बद्दलच्या मायेने ते प्रचंड कळवळले व मायेने तिच्याजवळ जात म्हणाले,"आई, आई? काही पाहिजे आहे का तुला?"

यमुनाबाई म्हणाल्या,"पाणी पाहिजे रे बाळा.."

अजय सरांनी पटकन पाणी दिले.
" हे घे.."

स्वतःच्या हाताने आईला पाणी पाजत असतानाच आईनेही त्यांच्या हाताला हात लावला.

यमुनाबाईंनी पाणी पिऊन ग्लास हळूहळू खाली ठेवला.
त्या म्हणाल्या," बाळा, काळजी करू नकोस. होईल सुरू तुझी शाळा.आज एवढी वर्ष तू सारं काही व्यवस्थित सांभाळलं,एवढे विद्यार्थी घडवले, स्वतःच्या लग्नाचा देखील विचार केला नाहीस.लक्षात ठेव! चांगल्या कर्माला कधीही मरण नसते."

अजय सर पाणवलेल्या डोळ्यांनी आईला हलकेसे कुशीत घेत, स्वतःला सावरत म्हणाले," आई, माझं कर्तव्य हाच माझा धर्म आहे. तू झोप आता.(आईला हळुवारपणे खाली ठेवत) शांत झोप.आपली शाळा सुरू होणार आहे.तू काळजी करू नकोस. नक्की सुरू होणार आपली शाळा."

आई म्हणाली," अरे लेकरा,तुझी आई आहे रे मी.तुझ्या वेदना तू न बोलताही ओळखते मी.निराश होऊ नको राजा.ईश्वराचे लक्ष आहे तुझ्याकडे."

" हो आई,तुझ्या रूपाने तो आहे माझ्यापाशी. म्हणूनच मी स्वतःला सावरू शकलो.आता तुझ्या आशीर्वादाच्या रूपाने तोच सारे काही ठीक करेल."

आपल्या मुलाचे असे संयमी, मायेचे आणि आत्मविश्वासाचे बोल ऐकून यमुनाबाई निश्चिंत झाल्या.त्यांनी समाधानाने स्वतःला निद्रेच्या अधीन केले.

आईला शांत झोपलेले पाहून अजय सर उठले आणि रूमच्या खिडकीजवळ आले. ते स्वगत करायला लागले.
‘खरंच ते दिवस पुन्हा येतील? शाळेत पूर्वीसारखा मुलांचा जल्लोष होईल? तो खून शाळेत झाला म्हणून पालकांनी शाळाच नाकारली तर? पण विनोदने त्या दिवशी सांगितले तसे खून शाळेत झाला की तो मृतदेह तिथे कोणी आणून टाकला?
अजय तुला धीट व्हायला हवे,तुला तुझ्या स्वप्नांना आकार द्यायचा आहे, गावाचे भवितव्य घडवायचे आहे; म्हणून तुला धीर ठेवावाच लागेल, त्यासाठी उद्याच्या उद्या काहीतरी करावेच लागेल.'

अजय सरांनी आपल्या झोपलेल्या आईकडे प्रेमाने पाहिले. तिच्या अंगावर व्यवस्थित पांघरून घातले. तिच्या पायांना स्पर्श केला व उद्याच्या भविष्यासाठी तिच्याकडे आशीर्वाद मागितला.
"आशीर्वाद दे आई उद्याच्या भविष्यासाठी, गावाच्या प्रगतीसाठी.."

त्यानंतर अजय धीट मनाने झोपी गेला.

क्रमश:

भाग ८ समाप्त..

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.