Login

आम्ही जिगरी दोस्त - भाग ५

गावाकडील शाळेच्या दोस्तांची गोष्ट
शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त- भाग ५
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा

मागील भागात आपण पाहिले किशाच्या वडिलांच्या खुनामुळे त्याच्या आईची अवस्था खूप वाईट होते. त्यामुळे किशा व्यथित होतो.त्याचे इतर जिगरी दोस्त त्याला भेटायला आले असता किशाला उभारी येते.आता पाहुया पुढे..

पात्र परिचय:
अजय: शाळेचे संस्थापक
विनोद :शहरातील एका कंपनीत मॅनेजर( गावात खरेदी केलेल्या जमिनीवर शेती करण्यासाठी सुट्टी घेऊन आलेला असतो.)
श्यामकाका: विनोदचे घरकाम करणारा नोकर

स्थळ: विनोदचे गावाकडील घर.

अजयने दरवाजा वाजवला.कोणीही प्रतिसाद देत नाही हे पाहून त्याने पुन्हा एकदा दार वाजवले. विनोद अजूनही झोपलेला होता. दाराच्या बेलच्या आवाजाने त्याची झोप मोडली.तो डोळे चोळत उठला.त्याने घरातील नोकराला आवाज दिला,
"श्यामकाका,कोण आलंय बघा जरा."

श्यामकाका म्हणाले,"हो हो बघतो साहेब.."
श्यामकाकांनी दार उघडले.

अजय सर म्हणाले,"नमस्कार श्याम काका."

" नमस्कार.."

अजय म्हणाला,"विनोद आहेत का?"

"हो आहेत.आत्ताच उठलेत ते.थांबा मी बोलवतो त्यांना.तोवर बसा ना,आत या."

अजय किंचित हसून हॉलमधील सोफ्यावर बसला. हॉलमधील अनेक वस्तूंवर त्याची नजर गेली. अलिशान एलईडी टीव्ही, अंबाबाईचा देवळातील फोटो, सुखवस्तु असे फर्निचर,समोरच ठेवलेला काचेचा टेबल व एक सुंदर असा विनोदच्या आई वडील व बायकोसोबतचा फोटो..तेवढ्यात विनोद तिथे आला.

अजय जागेवरून उठत म्हणाला,"नमस्कार साहेब."

"अरे साहेब काय? आपण सारख्या वयाचे. मग अरे- तुरेच कर की मला. त्याने मैत्रीचे नाते छान फुलते."

"हो नक्कीच पण माझ्या या मित्राची मी सकाळी झोप मोडली म्हणून सॉरी बरं का!"अजय दिलगिरी व्यक्त करत म्हणाला.

विनोद म्हणाला," हे बघ मित्रा,मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू.श्याम काका एक फक्कड चहा होऊन जाऊ द्या बरं."
श्याम काका चेहऱ्यावर छान हसू ठेवत म्हणाले,"आलोच साहेब."

विनोद अगदी प्रसन्न चेहऱ्याने म्हणाला,"काय म्हणतोस अजय?"

"त्यादिवशी..(खाली मान तसेच नजर टाकत) तू तर होताच." अजय दुःखी होत म्हणाला.

"हो जे झालं ते वाईट झालं पण शाळेला यात का टार्गेट केलं गेलं?" विनोदने प्रश्नार्थक नजरेने अजयला विचारले.

अजय देखील विनोदच्या या मुद्द्यामुळे पेचात पडला आणि म्हणाला," टार्गेट केलं गेलं म्हणजे?"

"बघ ना म्हणजे आपलं गाव इतकं मोठं आहे तरीही तो मृतदेह शाळेतच कसा काय ठेवला कोणीतरी? किंवा मारलं असेल तर तिथेच का मारलं?बरं तो मृतदेह सापडला तोही प्रवेशद्वारा जवळ..ज्या ज्ञान मंदिराला तू गावाच्या प्रगतीसाठी,विकासासाठी उभं केलंस तिथेच हा प्रकार का घडावा?" विनोदने आपले म्हणणे मांडले.

अजय आणखी चिंताग्रस्त झाला.त्याचे ते भाव विनोदने टिपले.विनोद अजयच्या जवळ गेला. त्याच्या खांद्यावर हळुवारपणे हात ठेवत तो म्हणाला ,
"हे बघ अजय, मी तुझ्यासोबत आहेच.एक मित्र म्हणून नाहीतर एक भाऊ म्हणून. गावाची प्रगती मलाही हवी आहे; त्यामुळे हा खुनाचा गुंता आपण मिळवून सोडवू असे मी तुला आश्वासन देतो. शाळा काही दिवसांमध्ये सुरू कर.काही अडलं तर मी आहेच."

अजय दिलासा मिळाल्याचे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला,"विनोद,आज तू एवढा धीर दिलास की मला नवीन उभारी आली आहे. माझ्यासोबत माझी आई सोडून आणखी कोणीतरी आहे याचे मला आज खूप समाधान वाटत आहे.हे गाव तर माझेच आहे, पण तुझे हे आश्वासक शब्द आज मला खूप मोठे बळ देऊन गेले आहेत."

विनोदने अजयचा हात हातात घेतला आणि म्हणाला," मित्रा मी तुझ्यासोबत कायम आहे,इथून पुढेही राहील."

तेवढ्यात श्याम काकांनी चहा आणला. दोघांनीही चहाचे कप हातात घेतले.श्याम काका निघून गेले.

विनोद थोडं थांबून म्हणाला,"अजय,स्वतःला व शाळेतील विद्यार्थ्यांना जप."

चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य करत अजयने मान डोलावली.त्याने चहा संपवला आणि तो घरी जायला निघाला.

अजय जागेवरून उठत म्हणाला,
"चल, येतो मी."

विनोद आश्वस्थ होऊन म्हणाला," बरं.."

रस्त्याने चालत असताना, अजयच्या मनात विनोदने काढलेली शंका डोकावत होती त्यामुळे तो पुन्हा विचारात पडली.तरीही पावले उचलत तो तसाच पुढे चालत राहिला.

क्रमश:

भाग ५ समाप्त..

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.