Login

आम्ही जिगरी दोस्त - भाग ६

गावाकडील शाळेच्या पाच जिगरी दोस्तांची गोष्ट

शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त - भाग ६
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा

मागील भागात आपण पाहिले की विनोदच्या बोलण्यामुळे, शाळेला खुनाच्या प्रकरणात खरंच टारगेट केलं गेलं आहे का? अशी शंका अजय सरांच्या मनात निर्माण होते.विनोद अजय सरांना, आपण या सगळ्या प्रकरणात एकमेकांना सोबत असल्याचे सांगतो. तरीही ही शंका मात्र अजय सरांना भीतीचे पाठबळ म्हणून कार्य करते.तरीही ते तसेच विनोदच्या घरातून बाहेर पडतात.

पात्र परिचय:
पाच जिगरी दोस्त: महाद्या,रम्या, गोट्या, बाळ्या, किशा

स्थळ :दोस्तांच्या आवडीचे (नेहमीच्या भेटीचे) मोकळे माळरान

पाचही जिगरी मित्र माळरानावर जवळजवळ पण जरासे तुटक अंतरावर चिंताग्रस्त मनाने बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शाळा बंद असल्याचे दुःख दिसत होते.

तेवढ्यात किशा ताडकन एका झटक्यात उठला
आणि म्हणाला,"बस यार! खूप झालं.माझ्या वडिलांचा खून ही गोष्ट मला आता पचवता येत नाहीये.(तीव्र आवेगाने रागात) ते काही नाही, मी या खुनाचा सुगावा लावणार म्हणजे लावणार.माझ्या बापाच्या खुनाचा बदला घेणार."

गोट्या,किशाच्या जवळ जात म्हणाला," किशा, तू चिंता करू नकोस.आपण सगळे मिळून काकांच्या खुनाचा पाठपुरावा नक्की करू."

महाद्या रक्ताच्या थारोळ्यातील खुनाचे तरल चित्र आठवून, थोडेसे थरथरत असतानाही गंभीर आवाजात म्हणाला,"मी पाहिले आहे काकांना.मी पाहिलंय."

रम्या म्हणाला," हा ना घाबरून काहीही बरळतोय आता."

रम्याचे बोलणे ऐकून महाद्या म्हणाला," मी काहीही बरळत नाहीये." महाद्याने आपली नजर पुन्हा एका ठिकाणी स्थिर केली आणि तो पुन्हा गंभीर झाला.

बाळ्या मात्र समजूतदारपणे म्हणाला," रम्या,महाद्याने ते दृश्य प्रत्यक्ष पाहिले आहे.आधीच तो घाबरट, मेंभळट आहे. त्यामुळे तो असं बोलतोय.आपण त्यालाही समजून घेतलं पाहिजे."

किशाला आपल्या मित्राची दया आली.तो म्हणाला,"
काय अवस्था झालीये महाद्याची..जेव्हापासून त्याने ते दृश्य पाहिले आहे, तेव्हापासून तो घाबरा घुबराच राहतोय.त्याची आई सांगत होती की तो जेवणही धड करत नाहीये."

रम्या मात्र त्याच्यावर जरासा अविश्वास दाखवत म्हणाला," मान्य आहे त्याने ते दृश्य प्रत्यक्ष पाहिले आहे पण त्या दिवशी तुझ्या घरी तर तो स्वतःला सावरत बोलत होता. जाऊ द्या यार! आपलं ठरलंय ना आता. किशाला खंबीर मनाने मदत करायची म्हणून! काकांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे,त्यासाठी त्यांच्या मारेकर्‍ यांच्या नांग्या ठेचाव्याच लागणार.त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागणार."

किश्या देखील सुडाच्या आगीने पेटलेला होताच.तो रम्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला,"तू बरोबर बोलतोय. त्यानंतरच मला समाधान मिळेल; पण माझ्या वडिलांचे या जगातून निघून जाणे मला सतत बोचत राहणार.घरी गेलो की वडिलांशिवाय असणारे आमचे पोरकेपण मला सतत खायला उठते."

गोट्या आपल्या मित्राला धीर देत म्हणाला,"हे बघ किशा, स्वीकार ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे. झालेल्या गोष्टी स्वीकारल्या तरच माणसाला पुढे जाता येतं, मार्ग काढता येतो.नाहीतर चिंता, राग माणसाला खाऊन टाकते आणि हातात काहीच उरत नाही."

रम्या आश्वासकपणे हात पुढे करत, आपल्या इतर मित्रांना उद्देशून म्हणाला, "चला तर मग..इथून पुढे गावावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मिळून मात करण्याचे ठरवूया, आपल्या मैत्रीचा एक नवा अध्याय सुरू करू व एकमेकांना नेहमीच साथ देऊ."

सर्व मित्रांनी हात पुढे केले. महाद्याने देखील जरा उशिराने, घाबरतच स्वतःचा हात पुढे केला.त्यानंतर सर्व मित्रांनी एकमेकांना आलिंगन देत मैत्रीचा नवा अध्याय रचायचे ठरवले.

क्रमश:

भाग ६ समाप्त..

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.