Login

आम्ही जिगरी दोस्त - भाग ९

गावाकडील शाळेच्या पाच जिगरी दोस्तांची गोष्ट
शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ९

मागील भागात आपण पाहिले शाळेतील मृतदेहाच्या प्रकरणामुळे अजय सरांनी शाळा बंद ठेवली होती. परंतु असे केल्यामुळे गावातील लोकांनी मुलांना शाळेत पाठवणे खरंच बंद केली तर अशी भीती अजय सरांना वाटत होती. त्यांची आई यमुनाबाई यांनी अजय सरांना, धीराने वाटचाल करत आपले कार्य पुढे चालू ठेवले की कुठलीही अडचणी येत नाही असे सांगितले. आता पाहूया पुढे..

पात्र परिचय:
अजय: शाळेचे संस्थापक ,
पाच जिगरी दोस्त:रम्या,गोट्या, किश्या ,बाळ्या,महाद्या,
सात-आठ इतर मुले
विनोद: शहरात काम करणारा मॅनेजर; गावाकडे शेतजमीन विकत घेऊन तिथे आठवडी सुट्ट्यांमध्ये येऊन शेती करणारा
गावचे सरपंच: हनुमंतराव पाटील

दुसऱ्या दिवशी अजय सर शाळेत आले.शाळेच्या भोवतालचे वातावरण नेहमीप्रमाणे प्रसन्न होते. त्यांनी शाळेचे गेट उघडले. गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. नेहमीप्रमाणे शाळा सुरू होण्याची एव्हाना वेळ झालेलीच होती. अजय सरांनी थोडा वेळ विचार केला.त्यांनी शाळेची घंटा वाजवण्यास सुरुवात केली. जवळपास दहा पंधरा वेळा घंटा वाजवल्यावर ते थांबले. तेवढ्यात काही मुलांचा आवाज आला.

आठ दहा मुले एका तालासुरात ' एक साथ नमस्ते ' म्हणाली.

अजय सरांनी मागे वळून पाहिले.त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.ते आनंदाने गहिवरले.आपल्या देवाने आपले ऐकले आणि आपल्यावरील कृपादृष्टीचा जणू काही प्रत्ययच दिला असे अजय सरांना वाटले.त्यांनी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या पुढ्यात असलेल्या मुलांना त्यांनी आनंदाने अलिंगन दिले.अजय सरांनी समोर पाहिले; तिथे पाच जिगरी दोस्त उभे होते.

रम्या म्हणाला, " काल रात्री मी तुमच्या घरी आलो होतो. तुमचे दार ठोठावणार तेवढ्यात तुमचे व तुमच्या आईचे बोलणे मी ऐकले. तेव्हाच मी ठरवले ,सर्व मुलांना घेऊन उद्या शाळेत यायचेच; कारण आमचे अजय सर असे शाळा बंद ठेवणारे मुळीच नाहीत.सर, हे आज ना उद्या तुमच्यासोबत मिळून आम्ही घडवून आणणारच होतो; कारण एकसंघ होऊनच आपण संकटावर मात करू शकतो हे तुम्हीच आम्हाला शिकवत आले आहात."

रम्याच्या या शब्दांनी अजय सर सुखावले.तेवढ्यात बाजूलाच आपल्या शेतावर देखरेखीसाठी आलेला विनोद तिथे आला.

विनोद म्हणाला," अजय तू तुझे कार्य सुरू ठेव, मीही तुझ्यासोबत आहे आणि सदैव राहीन."

तेवढ्यात गावचे सरपंच हनुमंतराव पाटील देखील तिथे आले.

हनुमंतराव पाटील म्हणाले," थांबा, अजय सर तुम्ही शाळा उघडण्यासाठी माझी परवानगी घेतलेली नाही म्हणून तुम्ही शाळा उघडू शकत नाही."

सारी मुले दचकली.ती व्यथित झाली.पाच जिगरी दोस्त मात्र खंबीर होते. त्यांनी इतर मुलांना वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी हाताने इशारा केला. त्याबरोबर सर्व मुले वर्गात जाण्यासाठी निघाली.

अजय सर मवाळ व्यक्तिमत्वाचे असल्याने धीर गंभीर होत,तरीही हिंमतीने मुलांना उद्देशून ते म्हणाले,"थांबा. वर्गात प्रवेश करू नका."

पाचही जिगरी दोस्त नाखुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले.

"अजय सर, या सरपंचांना मी चांगलाच ओळखून आहे. गावाची प्रगती होऊ नये, कुणीही पुढे जाऊ नये ही त्यांची मानसिकता आहे; जेणेकरून त्यांची या गावावर दहशतीची जरब कायम घट्ट असेल." रम्या म्हणाला.

"रमेश, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस."अजय सर म्हणाले.

"पण सर.."
रमेशला वाईट वाटले. अजय सरांनी सांगितल्यामुळे तो शांत बसला.

क्रमश:

भाग ९ समाप्त..

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.