शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग १०
मागील भागात आपण पाहिले की अजय सर शाळा उघडण्यासाठी शाळेत येतात.त्यांच्या मागोमाग काही मुले आणि पाचही जिगरी दोस्त शाळेत येतात. अजय सर शाळा उघडू लागतात तोच गावातील सरपंच शाळा बंदच ठेवावी लागेल असे अजय सरांना सांगतात.आता पाहुया पुढे..
पात्र परिचय:
सरपंच: हनुमंतराव पाटील
सरपंचांचे पाठराखे: शिंदे, जाधव
विनोद : शहरातील एका कंपनीत मॅनेजर असलेला तरुण,गावामध्ये जमीन खरेदी करून तिथे सुट्ट्यांमध्ये येऊन शेती करणारा.
अजय सर : शाळेचे संस्थापक
शाळेतील ७ - ८ मुले
पाचही जिगरी दोस्त: रम्या, बाळ्या, गोट्या, महाद्या व किशा
सरपंच: हनुमंतराव पाटील
सरपंचांचे पाठराखे: शिंदे, जाधव
विनोद : शहरातील एका कंपनीत मॅनेजर असलेला तरुण,गावामध्ये जमीन खरेदी करून तिथे सुट्ट्यांमध्ये येऊन शेती करणारा.
अजय सर : शाळेचे संस्थापक
शाळेतील ७ - ८ मुले
पाचही जिगरी दोस्त: रम्या, बाळ्या, गोट्या, महाद्या व किशा
सरपंचांचे गावात वजन होते. सरपंचांनी शाळेतील प्रवेश नाकारल्यामुळे सर्वजण जागीच स्तब्ध झाले. अजय सर देखील थोडे घाबरले.सरपंचांना साथ देण्यासाठी म्हणून त्यांचे पाठराखे शिंदे व जाधव त्यांच्याजवळ आले. आता अजय सरांचा ताण आणखी वाढला.
जाधव नावाचा पाठराखा उन्मत्त होऊन म्हणाला,"खूनखराबा झालेल्या शाळेत विद्या नाही तर गुन्हेगार घडतील; म्हणून शाळा बंद झाली पाहिजे."
शिंदे, मुलांकडे पाहत म्हणाला," ए, काय बघू राहिले रे तुम्ही? सांगितलं ना एकदा शाळा उघडणार नाही म्हणून..जा घरी आपल्या आपल्या."
तरीही मुले काही मागे हटेनात. सर्व मुले पाच जिगरी दोस्तांकडे बघू लागली. त्या पाचही जणांच्या चेहऱ्यावर भीतीचा कुठलाही लवलेश नव्हता.तेवढ्यात किशा पुढे आला.
किशाने एका विशिष्ट जागेकडे हाताने खुणावले आणि म्हणाला," माझे वडील गेले इथे. या इथे होता त्यांचा मृतदेह. (दोन्ही हात पुढे करत) या हातांनी त्यांना अग्नीडाग दिला मी.त्यांच्या आत्म्याची एकच इच्छा होती, आपल्या पोरानं चांगलं शिकावं. त्याची प्रगती व्हावी. त्यांची इच्छा हाच आता माझा परम धर्म आहे ; म्हणून मी तरी शाळेत येणार."
त्याचे बोलणे ऐकून इतर चार जिगरी दोस्त त्याच्यासोबत पुढे आले व एकजूट होत एक सुरात म्हणाले,
“आम्हीही शाळेत येणार.”
“आम्हीही शाळेत येणार.”
सरपंच पुढे आले आणि म्हणाले," हे बघा या गावचा सरपंच म्हणून शाळा बंद ठेवावी हा निर्णय मी घेतला होता ;पण या पोरांचा दांडगा उत्साह पाहून मी आता माझा निर्णय मागे घेतोय.."
शिंदे,जाधव म्हणाले," म्हणजे?"
सरपंच म्हणाले," अजय सर, शाळा बिनधास्त उघडा."
शिंदे,जाधव दचकलेच. त्यांनी सरपंचाकडे नाखुश होऊन पाहिले.
सरपंच म्हणाले,"विनोद व अजय सरांनी जसा गावासाठी उद्याचा सोनेरी भविष्यकाळ पाहिला आहे तसाच मी देखील पाहिला आहे.(चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदचे हलकेसे वलय आणत) चला मग होऊ द्या शाळेचे वर्ग सुरू ,आम्ही येतो."
सरपंचांनी शिंदे व जाधव यांना सोबत येण्याचा इशारा केला.तसे शिंदे, जाधव व सरपंच सोबत निघाले.
शिंदे म्हणाला," (रस्त्याने चालत चालत हळू आवाजात.)सरपंच आपलं काय ठरलं होतं?"
जाधव हळू आवाजात म्हणाला," जे ठरवलं होतं त्यावर तुम्हीच पाणी फेरलं."
सरपंच हळू आवाजात म्हणाले," ए गप बसा रे. मला शिकवू नका काय करायचं ते! आता बघा मी काय करतो ते."
सरपंचांनी हळूच मागे वळून पाहिले व कुत्सित हास्य केले.
इकडे शाळा सुरू होणार म्हणून मुले प्रचंड आनंदात होती. अजय सरांनी वर्गाची खोली उघडली. सर्व मुले आत आली.
अजय सर म्हणाले," नेहमीप्रमाणे गणपती स्तोत्र म्हणून आजचा दिवस प्रसन्न मनाने सुरू करूया."
सर्व मुले एक साथ गणपती स्तोत्र म्हणू लागली. किशा मात्र आपल्या वडिलांच्या खुनाच्या बदल्याने पेटून उठला होता.बदला हा एकच शब्द तो मनाशी बोलत होता.वडिलांचा मृतदेह ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी पाहून तो गणपती स्तोत्र म्हणत होता. त्याच्या बदल्याची आग त्याचे जिगरी मित्र जाणून होते म्हणून ते देखील त्या जागेकडे बघत गणपती स्तोत्र म्हणू लागले.
क्रमश:
भाग १० समाप्त..
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
