जिथे प्रेम मागावं लागत नाही…सुनिल पुणेTM
"सगळ्यांचंच प्रेम सारखं नसतं" !…ही आयुष्याच्या कपाळावर कोरलेली कडवट, पण निर्विवाद ओळ आहे. काही नाती अशी असतात की तिथे शब्दांची गरज उरत नाही, हक्कांची मागणी करावी लागत नाही, अपेक्षांचं ओझं मनावर येत नाही. समोरची व्यक्ती आपल्या मनाच्या ओठांवर येणाऱ्या भावना उच्चारण्याआधीच ओळखून घेते. तिच्या नजरेत आपल्या अस्तित्वाची स्वीकारार्हता असते, तिच्या कृतीत आपल्या भावनांचं आदरयुक्त प्रतिबिंब दिसतं. अशा नात्यांत प्रेम मागावं लागत नाही, कारण तिथे प्रेम देण्याची तयारी मनापासून तयार असते निस्सीम, नि:स्वार्थ आणि शुद्ध.
पण आयुष्य प्रत्येकाला अशी सोपी समीकरणं देत नाही. काहींच्या वाट्याला अशीही नाती येतात, जिथे माणूस स्वतःला तुटून देत राहतो. तो लहानसहान गोष्टींतून प्रेम व्यक्त करतो, मन जपतो, क्षणाक्षणाला समोरच्याच्या आनंदाचा विचार करतो… तरीही त्याच्या वाट्याला मिळतं ते केवळ उपेक्षेचं मौन. कधी कधी तर प्रेम मागूनही मिळत नाही. ज्या भावना जीवापाड जपल्या, त्यांना किंमतच उरत नाही. आणि अशा वेळी मनाच्या कोपऱ्यात एक प्रश्न टोचत राहतो “माझ्यात कमी काय होतं?”
पण खरं तर कमीपणा माणसात नसतो; विसंगती असते ती फक्त भावनांच्या दिशांमध्ये.
पण खरं तर कमीपणा माणसात नसतो; विसंगती असते ती फक्त भावनांच्या दिशांमध्ये.
काही माणसं प्रेम देण्यात विशाल असतात त्यांची हृदयं खोल असतात, त्यांची माया भरभरून वाहणारी असते. तर काहींची भावनांची दारे अर्धवट उघडी असतात, त्यांच्या क्षमतांना मर्यादा असतात. काहींना योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते, तर काहींच्या आयुष्यात ‘योग्य’ हा शब्द केवळ प्रतीक्षेपुरता उरतो. काहींसाठी प्रेम सहज मिळणारा श्वास बनतो, तर काहींसाठी ते आयुष्यभराचा संघर्ष ठरतो.
पण याचा अर्थ असा अजिबात नसतो की ज्यांना प्रेम मागूनही मिळत नाही ते प्रेमासाठी अयोग्य असतात. ते केवळ चुकीच्या दारात उभे असतात जिथे घंटी कितीही वाजवली तरी आतून प्रतिसाद येत नाही.
प्रेम मिळणं किंवा न मिळणं हे माणसाच्या किमतीवर ठरत नाही. ते ठरतं नशिबाच्या वळणांवर, भेटलेल्या व्यक्तींच्या संवेदनांवर आणि वेळेच्या अचूकतेवर. म्हणूनच काहींना काहीही न मागता सगळं मिळून जातं… आणि काहींना सगळं मागूनही काहीच मिळत नाही.
पण शेवटी एक गोष्ट मात्र नक्की
जेव्हा खऱ्या प्रेमाची वेळ येते, तेव्हा ते कुठलीही मागणी न करता, कुठलीही जाहिरात न करता, अतिशय शांतपणे आणि नि:स्वार्थपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करतं… आणि आपल्याला कळतही नाही, आपण कधी त्याच्या प्रेमात पडलो.
जेव्हा खऱ्या प्रेमाची वेळ येते, तेव्हा ते कुठलीही मागणी न करता, कुठलीही जाहिरात न करता, अतिशय शांतपणे आणि नि:स्वार्थपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करतं… आणि आपल्याला कळतही नाही, आपण कधी त्याच्या प्रेमात पडलो.
सुनिल पुणे TM 9359850065.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा