व्हाईट लिली - भाग ११
©अनुप्रिया.
©अनुप्रिया.
“आता कोणाचा मेसेज?”
आशुतोष तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि कपाळावर आठ्या पाडत त्याने मोबाईल हातात घेऊन मेसेज पाहू लागला. मेसेज रिक्वेस्टमध्ये मेसेज येऊन पडला होता.
“व्हाईट लिली? हे कसलं नाव आहे?”
मेसेज पाठवणाऱ्याचं मजेशीर नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर किंचितसं हसू पसरलं.
“नमस्कार सर, खूप छान लिहता तुम्ही.”
आशुतोषच्या लिखाणाचं कोणीतरी कौतुक करत होतं.
“धन्यवाद..”
आशुतोषने त्या मेसेजला रिप्लाय दिला. इतक्यात पलीकडून पुन्हा मेसेज आला.
“तुमच्या कविता तर इतक्या सुरेख असतात की काय सांगू! मी तुमच्या कवितेंची डायहार्ड फॅन झालेय सर..”
“अरे बापरे, इतकं कौतुक! खूप आभार मॅडम.”
त्या मेसेजवरून ती स्त्री एक असावी असा त्याने अंदाज बांधला. तिने पुन्हा रिप्लाय केला.
‘तुझ्याचसाठी फुलणे जगणे
तुझ्याचसाठी ओघळणे
तुझ्याचसाठी जन्म बापुडा
तुझ्याच ठायी विरघळणे
©आशुतोष.’
तुझ्याचसाठी ओघळणे
तुझ्याचसाठी जन्म बापुडा
तुझ्याच ठायी विरघळणे
©आशुतोष.’
“सर, या तुमच्याच ओळी आहेत ना? किती ते प्रेम! किती ते समर्पण! असं प्रेम मिळायला भाग्य लागतं सर.. तुम्ही जिच्यासाठी या ओळी लिहल्यात ना, ती खरंच खूप भाग्यवान आहे. या तुमच्या कवितेच्या ओळीत इतकी ओढ आहे ना सर, बघा मी स्वतःला तुम्हाला मेसेज करण्यापासून थांबवूच शकले नाही.”
तिचे मेसेज वाचून आशुतोष गालातल्या गालात हसत होता. त्याने मेसेज टाईप केला.
“ओह्ह! थँक्यू मॅडम.. तुम्हाला माझ्या कविता आवडतात हे वाचून आनंद झाला.”
“सर, असं आभार व्यक्त करून लाजवू नका. मीच तुमचे मनापासून आभार मानते की, इतक्या सुंदर सुंदर कविता तुम्ही आमच्यासारख्या रसिकांना वाचायला उपलब्ध करून दिल्या. थँक्यू सो मच सर..”
तिने त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला.
“ह्म्म्म.. बरं ठीक आहे. जशी तुमची इच्छा! आभार मानत नाही मी; पण तुम्ही वाचत रहा. आवडलं तर सांगा. नाही आवडलं, काही खटकलं तरी सांगा मला.”
आशुतोषने तिला नम्रपणे उत्तर दिलं. तिने पुन्हा मेसेज केला.
“काहीही काय सर! इतक्या सुंदर कवितेत न आवडण्यासारखं, खटकण्यासारखं काय असणार आहे? गंमत करता आहात का माझी?”
“अहो नाही.. खरं सांगू का? प्रत्येकवेळी आपल्या आवडत्या कवीची प्रत्येक रचना आपल्याला आवडतेच असं नाही नं.. प्रत्येकवेळी चांगलीच कविता येईल असं नसतं.”
“सर, मला तुमच्यासारखं कविता लिहायला जमेल का ओ?”
“का नाही? नक्की जमेल.”
त्याने तिच्या मेसेजला रिप्लाय दिला.
“म्हणजे तसं मी थोडंफार लिहते. माझ्या तोडक्यामोडक्या शब्दात प्रयत्न करते; पण तुमच्यासारखं छान जमत नाही.”
“जमेल ओ.. त्यासाठी आपल्या सभोवतालचं सूक्ष्म निरीक्षण करता यायला हवं. वाचन हवं. मनात इतरांविषयीची ओल असली नं आपल्याला आपोआप सुचू लागतं आणि मग कल्पनाशक्तीही हळूहळू विकसित होत जाते. काय लिहता तुम्ही?”
आशुतोषने तिला मेसेज केला. ती काहीतरी टाईप करत होती.
“तसं फारसं काही लिहलं नाही अजून. अधून मधून तोडकंमोडकं कथालेखन करते. पण कविता लिहणं फारच अवघड काम.. म्हणजे बघा ना, भावनांना मोजक्या शब्दात बांधणं तसं कठीणच असतं ना? मनातल्या स्वैर विचारांना एकसंघ गुंफणं कठीणच. त्यात वृत्तबद्ध कविता लिहणं म्हणजे तर विचारूच नका. मला कवितेतला मुक्तछंद हा प्रकार आवडतो.”
“अच्छा.. छान आहे तेही.”
त्याने मेसेज केला.
“सर, तुम्हाला सांगू का? मला वाचनाचीही आवड आहे. व. पु. काळे, जयवंत दळवी, जी ए. रणजित देसाई माझे आवडते लेखक. शांता शेळके, कुसमाग्रज, बालकवी, सुरेश भट, ग्रेस माझे आवडते कवी आणि आताच्या काळातले म्हणाल तर ना, मला वैभव जोशी, संदीप खरे, गुरू ठाकूर आणि आता तुम्ही.. फार फार आवडता. तुम्ही तर मला रात्र रात्र जागवता.. आय मिन.. तुमच्या कविता वाचायला लागले ना, रात्र कधी सरून गेली कळतच नाही.”
ती भरभरून बोलत होती. फार जुनी ओळख असल्यासारखी ती मेसेजेस मधून गप्पा मारत होती.
“किती निरागस आहे यार ही! किती इनोसंटली बोलतेय!”
आशुतोषला हे सारं फारच मजेशीर वाटत होतं. कितीतरी वर्षांनी कोणीतरी इतकं भरभरून मनापासून त्याच्याशी बोलत होतं. इतक्यात शुभदाने आशुतोषला आवाज दिला.
“आशू.. चहा बनवलाय. ये घ्यायला..”
“हो आलो आई..”
आशुतोषने बसल्या जागेवरून आईला येतो म्हणून आवाज दिला आणि त्याने मेसेज टाईप करायला सुरुवात केली,
“चला, आई आवाज देतेय. थँक्यू वन्स अगेन. असंच वाचत रहा. बोलू पुन्हा.. बाय मॅडम.”
“हो बाय सर.. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.. बाय, टेक केअर सर.”
असं लिहून पलीकडून तिने हसरी स्माईली पाठवली. आशुतोष गालातल्या गालात हसला. तो बाहेर हॉलमध्ये येऊन बसला. शुभदाने त्याला आणि जयवंतला चहा दिला आणि स्वतःसाठी चहाचा कप घेऊन आशुतोषच्या शेजारी येऊन बसली. आशुतोषचं लक्ष अजूनही त्याच्या मोबाईलमध्येच होतं.
“आज कितीतरी दिवसांनी माझ्या आशूच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. डोळ्यात आनंदाची लेकर उमटलेली दिसतेय. हे गजानना! माझ्या बाळाला असंच आनंदी ठेव रे देवा!”
शुभदा मनातल्या मनात बडबडली. जयवंतने चहा संपवला आणि तो बाहेर अंगणात येऊन बागकाम करू लागला. जयवंत उठून गेल्यावर शुभदाने एक कटाक्ष आशुतोषकडे टाकत मिश्किलपणे विचारलं,
“काय राजे! आज काय विशेष? एकदम खूष दिसताय. गालातल्या गालात हसताय काय! काय झालंय समजेल का?”
“काही नाही गं.. असंच.”
त्याने हसून उत्तर दिलं.
“नाही कसं? काहीतरी झालंय हे नक्की. उगीचच का तुझी कळी खुललीय?”
आईच्या शब्दांनी तो तिच्याकडे हसून पाहत म्हणाला,
“अगं, विशेष असं काही नाही. एक वाचक कौतुक करत होती. इतकी भरभरून बोलत होती की काय सांगू!”
आणि मग आशुतोषने घडलेला सारा वृत्तांत शुभदाच्या कानी घातला.
“नाव काय तिचं?”
शुभदाने उत्सुकतेने विचारलं.
“ती तर अजून एक वेगळी गंमत आहे बघ. तिचं नाव फारच गंमतीशीर आहे. ‘व्हाईट लिली’ असं नाव मेसेज पाठवणाऱ्याचं आलंय. असं कुठे नाव असतं का आई? व्हाईट लिली म्हणे..”
आशुतोषला हसू आवरत नव्हतं. मग त्याने आईला तिचे मेसेजेस दाखवले. तिलाही मेसेजेस वाचून हसू आलं.
“चल बाबा, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते. आज माझा मंगळवारचा बाप्पाचा उपवास आहे नं.. पूर्वी आम्ही दोघं दर मंगळवारी बाप्पाच्या मंदिरात जायचो. गणपती बाप्पाचं छान दर्शन घडायचं; पण आता या लॉकडाऊनमुळे सगळंच बंद झालंय. जी काही पूजाअर्चा करायची असते ती घरीच करावी लागतेय. मंदिरांचे प्रवेशद्वार तरी कुठे सर्वांसाठी खुले केलेत? जाऊ दे आहे ते ठीक म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. चला आवरते.”
असं म्हणत टेबलवरचे चहाचे कप ट्रेमध्ये ठेवून शुभदा जागेवरून उठली. आशुतोषने होकारार्थी मान डोलावली. त्याने टीव्हीवर न्यूज चॅनल सुरू केला आणि तो बातम्या पाहू लागला.
“काय तेच तेच पाहायचं? कोरोनाची साथ झपाट्याने वाढतेय. कोरोनाचे इतके रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत झपाट्याने वाढ.. त्याच त्याच बातम्या.. नकारात्मक ऊर्जा पसरवणाऱ्या.. ह्या न्यूज चॅनेलवाल्यांना काही कामधंदे आहेत की नाहीत? उगीच साऱ्या जनतेला घाबरवून सोडलंय. काळजी कमी करण्याऐवजी वाढवण्याचंच काम करताहेत हे.”
आशुतोष स्वतःशीच पुटपुटला. पुन्हा त्याचं लक्ष मोबाईलकडे गेलं. मेसेंजर उघडलं आणि तो त्या ‘व्हाईट लिली’ चे मेसेजेस पुन्हा वाचू लागला. तिच्या नावापुढे हिरवा ठिपका होता. याचाच अर्थ ती ऑनलाईन होती. आशुतोष विचार करू लागला.
“आज कित्येक दिवसांनी कोणीतरी आपल्या गंमतीशीर नावाने का असेना पण इतकं निखळ हसू देऊन गेलं. हसणं जणू काही विसरूनच गेलो होतो. सगळे जिवाभावाचे मित्रमैत्रिणी हळूहळू दूर होत गेले. जो तो आपापल्या संसारात, कामाच्या व्यापात रममाण झाला. आता कोणाला माझी साधी आठवणही होत असेल की नाही देव जाणे! सगळे कसे बदलत गेले? मैत्री इतकी तकलादू होती? तीही किती सहजपणे हात सोडून निघून गेली! तिच्या संसारात रमून गेली. का अशी वागलीस रागिणी? निदान गैरसमजाची जळमटं दूर झाल्यावर तरी आपल्यातली भांडणं मिटवून आपण पुन्हा एक व्हायला हवं होतं; पण तू मला सोडून गेलीस आणि मी मात्र अजूनही तिथेच अडकून पडलोय. तिच्या आठवणीत गुंतून राहिलोय. अजूनही तिच्यावरच कविता लिहतोय. त्या विरहअग्नीत जळतोय. आणि ती?”
आशुतोषच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
