Login

व्हाईट लिली - भाग १२

व्हाईट लिली.. एक रहस्यमय प्रेमकथा..
व्हाईट लिली - भाग १२
©अनुप्रिया.


आशुतोष त्याच्याच विचारात गुंग झाला. त्याचा भूतकाळ त्याची पाठ सोडायला तयार नव्हता. रागिणीच्या विचारांनी त्याला अक्षरशः वेड लागायची वेळ आली होती. शुभदा किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. त्याने टीव्ही बंद केला. उघड्या डोळ्यांनी घराच्या छताकडे तो एकटक पाहत बसला.

“तिचे विचार, तिच्या आठवणी माझ्या मनाला किती चिटकून बसल्यात! किती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तरी जात नाहीत. सहस्त्र नागांनी माझ्या हृदयाला डंख मारावा आणि मरणाच्या दारात तडफडत सोडून द्यावं अगदी तसंच वाटतंय. का इतकी छळते मला तिची आठवण? जे घडलं त्यात माझ्या एकट्याचीच चुक होती? मीच बालिशपणे वागलो. अडनिड्या वयातलं ते प्रेम! इतकी समज तरी कुठे होती?”

आशुतोष त्याच्याच विचारांनी दुखरा झाला. मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. मन दुसरीकडे वळवण्यासाठी त्याने पुन्हा त्याच्या मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. हल्ली सोशल मीडियावरच तो जास्त रमत होता. त्याच्यातल्या कलागुणांचं कौतुक होत होतं. कविता प्रसिद्ध होत होत्या. हळूहळू सोशल मीडियावरचे बरेच लोक त्याला ओळखू लागले होते. प्रशंसा मिळू लागली होती. प्रत्येक वयोगटातले वाचकवर्ग त्याच्याशी बोलायला उत्सुक असायचे. मेसेंजर, व्हाट्सअपचा मेसेजबॉक्स मेसेजेसने खचाखच भरलेला असायचा. आवड, छंद म्हणून लिखाणास केलेली सुरुवात आता तेच त्याचं व्यसन झालं होतं. लॉकडाऊनमुळे नोकरीचं कुठेच काही घडत नव्हतं. पूर्ण शहरात संचारबंदी केल्याने कोणीही घराबाहेर पडत नव्हतं. त्यामुळे मग सोशल मीडियावर डिजिटल व्यासपीठांचा सुळसुळाट झाला होता. सर्वचजण आता इथे सक्रिय झाले होते. आशुतोषही या आभासी जगात छान रमला होता. त्या दिवसांनंतर तिचा काही मेसेज आला नाही. एक दोन दिवस त्याने तिच्या मेसेजची वाट पाहिली; पण तिचा मेसेज काही आला नाही. नंतर आशुतोषही रोजच्या गडबडीत तिला विसरून गेला.

“चांदण्याचे घर तुझ्या डोळ्यांत आहे तर..
माधवीचे दे मला तू दान ओंजळभर..!”
©आशुतोष

“कसलं बाप लिहलंय सर तुम्ही! एकदम चाबूक कविता!”

आशुतोषच्या मोबाईलवर बरोबर आठ दिवसांनी तिचा मेसेज झळकला. त्याचं त्या मेसेजकडे लक्ष गेलं आणि त्या मेसेजने त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं.

“ही कसली भाषा!”

त्याने मेसेज टाईप करायला सुरुवात केली.

“तुमच्या फेसबुक अकाउंटच्या नावावरून म्हणजेच व्हाईट लिली या नावावरून मला वाटलं फार नाजूक असाल तुम्ही; पण आताच्या तुमच्या या भाषेवरून फारच ‘रावडी’ वाटता तुम्ही. एकदम गुंड टाईपच्या वाटल्या.”

तो दिलखुलासपणे हसला. तिनेही हसरी स्माईली पाठवली.

“अहो तसं नाही.. माझं नाव जुईली.. मागे एकदा मी ‘व्हाईटलिली अँड नाईट राईडर’ हे नाटक पाहिलं होतं. ते नाटक मला प्रचंड आवडलं होतं म्हणून मग माझ्या फेसबुक अकाउंटचं नाव मी व्हाईट लिली हे ठेवलं. छान नाहीये का?”

“ओह्ह! याचा अर्थ हिचं नाव जुईली आहे तर!”

आशुतोष स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने मेसेज केला.

“नाही ओ.. छान आहे नाव. फक्त मला वाटलं तुम्ही नावाप्रमाणेच नाजूक असाल.”

“नाही तसं.. माझं नाव जरी जुईली असलं तरी मी खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या मर्जीशिवाय कोणी मला उगीचच त्रास देऊ शकणार नाही. समजलं?”

तिच्या मेसेजमधून तिचा करारी स्वभाव स्पष्टपणे झळकत होता. आशुतोषने तिला विचारलं.

“काय करता तुम्ही? म्हणजे कुठे असता?”

“मी एका मल्टिनॅशनल कंपनीत ‘मार्केटिंग हेड’ म्हणून काम पाहते. तसा माझं जन्म, शिक्षण सगळं मुंबईतच झालं; पण नोकरीनिमित्त बेंगलोरला असते. म्हणजे जन्मभूमी मुंबई आणि बेंगलोर ही कर्मभूमी असंच म्हणा ना! सध्या कोरोनाच्या साथीमुळे घरातूनच काम सुरू आहे. थोडं स्लो डाऊन आहे. सर तुम्ही कुठे असता? आणि पोटापाण्यासाठी काय करता? म्हणजे नोकरी की बिझनेस?”

तिने आशुतोषला प्रश्न केला.

“सध्या काहीच करत नाही. बेरोजगार आहे. एका खाजगी कंपनीत ‘क्वालिटी कंट्रोल’ विभागात काम करत होतो; पण काही वैयक्तिक कारणामुळे नोकरी सोडून दिली. म्हणजे तिथल्या लोकांनी मला खूप वेळा कॉल्स केले. मला परत कामावर रुजू होण्यासाठी निरोपही धाडले; पण का कोणास ठाऊक! मला आता कोणाचाही फोन घेण्याची फार भीती वाटते बघा. जणू काही फोनचा फोबिया झालाय की काय देवच जाणे! आता सध्या मी आमच्या गावी कणकवलीला असतो.”

त्याने मनातली भीती बोलून दाखवली.

“हं.. म्हणजे सध्या तुम्ही घरीच बसून आहात तर? आणि आता तर कोरोनोमुळे तर घरीच थांबावं लागतंय हो ना?”

“हो बरोबर ओळखलंत.”

“पण काहीही म्हणा सर, आपला कोकण म्हणजे एकच नंबर! निसर्गाच्या कुशीत समुद्राच्या सानिध्यात शांत अशा गावी तुम्ही राहताय. किती लकी आहात सर तुम्ही!”

त्याच्या मेसेजला तिने रिप्लाय दिला.

“ह्म्म्म.. कोणास ठाऊक नशीबवान आहे की कमनशिबी!”

त्याने उदासपणे सुस्कारा टाकला.

“असं का म्हणता सर? प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष असतोच. काही बोलून दाखवतात तर काही निमूटपणे दुःख सहन करत मार्गक्रमन करत राहतात. मुळात आपल्या मनातली व्यथा सर्वांसमोर मांडूच नये. उगीच चारचौघात आपलं हसू होतं. बरोबर ना?

व्यथा मनातली मी
कागदावर मांडली..
केला बाजार शब्दांनी
कथा चौघात सांडली..
©जुईली

“व्वा! कमाल लाईन्स! छान सुचलंय तुम्हाला.”

तिने लिहिलेल्या कवितेच्या ओळी वाचून प्रभावित झाल्याने त्याने उत्स्फूर्तपणे मेसेज केला.

“थँक्यू सो मच सर. सहजच आपलं.. काहीतरी सुचलं म्हणून तुम्हाला पाठवलं.”

“छानच आल्यात ओळी.. थोडं लगावलीत बसवल्या तर अजून बहार येईल. मस्तच होईल चारोळी.”

आशुतोषला तिने लिहलेल्या ओळी प्रचंड आवडल्या होत्या.

“तेच तर जमत नाही ना सर. तुम्ही मला शिकवाल का?”

“हो शिकवेन ना.. तुमची शिकण्याची तयारी असेल तर मी शिकवेन तुम्हाला. आमचा कवितेचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करू शकतो.”

तिच्या प्रश्नावर आशुतोषने उत्तर दिलं.

“नको सर, इतक्यात नको.. मला जास्त लोकांत मिसळण्याची फार भीती वाटते. प्रेमात लोकांनी धडेच जास्त दिलेत.”

“म्हणजे?”

“काही नाही.. जाऊ देत. तुम्ही शिकवणार असाल तर सांगा. मला कोणत्याही ग्रुपमध्ये जायचं नाही.”

“बरं ठीक आहे. जशी तुमची इच्छा. मी तुम्हाला माझा व्हाट्सअप नंबर शेअर करतो. तुम्हाला जमेल तेंव्हा तुम्ही मला मेसेज करा. लवकरच शुभारंभ करू.”

“हो चालेल सर.. आजपासूनच सुरुवात करूया. मला ऑफिसला मंगळवारी सुट्टी असते. त्यामुळे मला अभ्यासाला, सरावाला याच दिवशी वेळ मिळेल.”

आशुतोषने तिचा मेसेज वाचला.

“ओह्ह, आय सी! म्हणजे तुम्हाला मंगळवारी सुट्टी असते तर.. म्हणूनच बरोबर आठ दिवसांनी आज मंगळवारी तुम्ही मला मेसेज केलात. खरंय ना?”

त्याने जुईलीला विचारलं आणि सोबत त्याच्या व्हाट्सअप नंबरही तिला शेअर केला.

“हो बरोबर सर, मंगळवारी सुट्टी असते तेंव्हा मी थोडी फ्री असते. आणि थँक्यू बरं का? तुम्ही मला तुमचा नंबर दिलात. सर, मी तुमचा नंबर सेव्ह करते आणि थोड्याच वेळात तुम्हाला व्हाट्सअपला मेसेज करते. चालेल ना?”

“हो चालेल ना.. पण माझी एक अट आहे.”

“कोणती?”

“आपण एकमेकांना अहोजावो करणार नाही. फारच औपचारिक वाटतं ते.”

“अरे व्वा! बरं झालं तुम्हीच म्हणालात. मीच तुम्हाला सांगणार होते, मला तुम्ही माझ्या नावाने आवाज देऊ शकता. मला अरेतुरेच करा. तशीही मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. ज्ञानाने आणि वयानेसुद्धा.. पण मग मला तुम्हाला अरेतुरे करायला कसं जमेल? तुम्ही माझे गुरू आहात.”

“मग त्यात काय? सारं काही मानण्यावर आहे बघ. नातं कोणतंही असू देत, त्यात औपचारिकता आली की ते छान फुलत नाही. अहोजावो केल्याने मान दिला जातो असं कोण म्हणालं तुला? तो आपल्या मनात असतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्तीही आपली गुरू होऊ शकते. आज मी तुला कविता शिकवतोय म्हणून मी तुला तुझा गुरू वाटतोय; पण कदाचित कधीतरी तुच माझा गुरू होशील.”

आशुतोषने हसून मेसेज केला. तिनेही हसून रिप्लाय दिला.

“ठीक आहे मग.. आजपासून आपल्या नात्यात नो फॉर्मॅलिटीज.. नो थॅंक्स, नो सॉरी.. समजलं?”

तिने जणू काही फर्मानच सोडलं.

पुढे काय होतं? आशुतोष आणि जुईलीचे सुर जुळतील का? पाहूया पुढील भागात..