व्हाईट लिली - भाग १३
©अनुप्रिया.
आशुतोषने जुईलीला त्याचा व्हाट्सअप नंबर शेअर केला आणि तो तिच्या मेसेजची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी तिचा मेसेज आला नाही म्हणून तो थोडा अस्वस्थ झाला. थोड्या वेळाने शुभदाने सर्वांना पानं वाढली. सर्वांची दुपारची जेवणंही झाली. अजूनही जुईलीचा मेसेज आला नव्हता. वाट पाहून कंटाळल्यावर तो त्याच्या खोलीत जाऊन आडवा झाला. आशुतोषच्या मनात तिचाच विचार घोळत होता. इतक्यात त्याचा मोबाईलचा मेसेज टोन वाजला. त्याने पटकन मोबाईल उचलून पाहिलं. जुईलीचा मेसेज आला होता.
“हॅलो सर, मी जुईली..”
“हाय, मला वाटलं विसरलीस की काय?”
“नाही सर, थोडी घरातली साफसफाई करायला घेतली होती. आठवड्याभराची सगळी कामं सुट्टीच्या दिवशीच उरकायची असतात ना, त्यामुळे थोडा उशीर झाला. जेवलात का सर?”
“हो जेवलो.. तू जेवलीस? आणि हे काय? काय ठरलं होतं आपलं? अहोजावो करायचं नाही. मग कशाला उगीच फॉर्मॅलिटीज?”
“ओह्ह! विसरलेच मी. अहोजावो करायचं नाहीये नाही का? ठरलं तर मग.. आजपासून, आतापासून मी तुम्हाला फक्त आशुतोष म्हणेन. चालेल ना?”
“हो चालेल गं.. व्हाईट लिली..”
तिला चिडवण्याच्या हेतूने आशुतोषने तिला मेसेज केला.
“नको ना प्लिज.. मला तू फक्त जुईच म्हण..”
आशुतोष गालातल्या गालात हसला.
“बरं बाई.. आता थोडं कवितेबद्दल बोलूया? अभ्यासाला सुरुवात करूया का?”
“हो चालेल.. काय शिकायचं आज?”
जुईलीने आशुतोषला मेसेज केला आणि आशुतोषने तिला शिकवायला सुरुवात केली. जुईली सगळे मेसेजेस स्टार करून ठेवत होती. मुळातच हुशार असल्याने आशुतोष जे काही सांगत होता ते तिला पटकन समजत होतं. आधीपासून कविता कथा लिहण्याची सवय असल्याने तिला कविता समजणं फारसं जड गेलं नाही; पण सातत्याने कविता लिहण्याचा सराव नसल्याने, ऑफिसमधल्या कामाच्या व्यापामुळे ती या क्षेत्रात थोडी मागे पडली होती. आशुतोष तिला वृत्तबद्ध कवितेचे प्रकार शिकवत होता. दर मंगळवारी तो नवीन काहीतरी शिकवायचा आणि मग पूर्ण आठवडाभर जुईलीकडून सराव करून घेत असे. आठवडाभर गृहपाठ केल्यावर मग पुन्हा दुसऱ्या मंगळवारी नवीन वृत्त शिकवलं जायचं. जुईलीने सुद्धा पुन्हा नव्या जोमाने लिहायला सुरुवात केली होती. आता छान लिहू लागली होती. मदतीला आशुतोष होताच. आपल्या मुलाला आनंदात पाहून शुभदाही खूष होती. लॉकडाऊन संपल्याशिवाय नोकरीबद्दल बोलण्यात काही अर्थच नव्हता.
हळूहळू आशुतोष आणि जुईली यांच्यातलं मेसेजेसचं प्रमाण वाढू लागलं होतं. लिखाणाच्या व्यतिरिक्तही मेसेजमधून बोलणं होऊ लागलं. लिखाणाच्या स्टाईलवरून थोडाफार स्वभावही कळू लागला होता. मेसेजमधून कधीकधी चेष्टामस्करी होऊ लागली. जुईलीलाही आशुतोषशी मेसेजमधलं बोलणं आवडू लागलं होतं. त्याच्या हळव्या मनाची ओळख होऊ लागली होती. आशुतोषला आता जुईलीविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. ती कशी दिसते? तिचा आवाज कसा आहे? आशुतोषला काहीच माहित नव्हतं. तिने व्हाट्सअपला, फेसबुकच्या तिच्या अकाउंटला तिचा डीपीही ठेवला नव्हता. त्यामुळे ती कशी दिसते हे समजण्याचा काहीच मार्ग नव्हता. तिचे शब्द, तिचे मेसेजेस इतकीच काय तर तिची ओळख होती. तिच्या निरागस शब्दांमुळे त्याला ती आवडली होती. आशुतोषच्या मनात आता ती कशी दिसत असेल? तिचा आवाज ऐकण्याची उत्कंठा वाढत चालली होती.
आणि एक दिवस मनाचा हिय्या करून आशुतोषने जुईलीला मेसेज केला.
“जुई, आपण इतके दिवस मेसेजमधून बोलतोय. आता आपली बऱ्यापैकी ओळख झाली आहे ना?”
“हो मग.. चांगले ओळखतो आपण एकमेकांना.”
जुईलीने रिप्लाय दिला.
“आता आपल्यात फक्त गुरुशिष्य या नात्यापलीकडेही एक मैत्रीचं नातं होतेय. छान सूर जुळू लागलेत. हो ना?”
“ह्म्म्म..”
“पण अजूनही तू दिसते कशी? बोलतेस कशी? मला काहीच माहित नाही.”
“म्हणजे मी कोण आहे? मुलगीच आहे ना हे जाणून घ्यायचंय का तुला? कोणी मुलगा वगैरे असेल आणि तुझ्याशी मुलगी म्हणून बोलत असेल असं वाटतंय?”
“अगं तसं नाही; पण इतके दिवस आपण ज्या व्यक्तीशी मेसेजेसमधून बोलतोय; ती व्यक्ती कशी आहे. तिचा आवाज कसा आहे हे जाणून घ्यायला हवं ना? तुला असं वाटतं नाही का, आता आपल्यात निदान एखादा साधा कॉल तरी व्हायला हवा?”
आशुतोषने मेसेज पाठवून दिला. जुईलीने तो वाचलाही. त्याच्या मेसेजसमोर निळी टिक दिसत होती. काही क्षण असाच शांततेत गेला.
“यार, तिला हे विचारून मी चुक तर केली नाही ना? ती काहीच का रिप्लाय करत नाहीये. रागावली तर नसेल? असंच माती खातो मी.. या एका कारणामुळे तिने बोलणं सोडू नये म्हणजे झालं. प्लिज जुई, रिप्लाय दे..”
जुईलीचा रिप्लाय येत नव्हता म्हणून आशुतोषचा जीव कासावीस झाला. मनात नाना विचार येत होते. इतक्यात तिचा भला मोठा मेसेज आला.
“आशुतोष, आपल्याला कॉलवर बोलायला काही हरकत नाही; पण माझं आयुष्य मी माझ्या अटींवर जगते. माझे काही नियम आहेत. मी स्वतः भोवती एक वलय निर्माण केलंय आणि ते मी कोणासाठी तोडणार नाही. अगदी कोणाहीसाठी नाही. पहिली गोष्ट तर आपले मैत्रीचे सूर जुळतील असं मला अजिबात वाटत नाही; कारण मुळात माझा मैत्रीवर विश्वासच नाही. उगीच मनाचे खेळ सारे.. या जगात आपण आपले एकटेच असतो. हे मैत्री, प्रेम.. सारं काही झूठ आहे. समजलं? मी तुझ्याशी जरूर बोलेन; पण मला तू माझ्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. मी माझे फोटोज शेअर कारणार नाही. कधीही व्हिडिओ कॉल करणार नाही. तुझं आणि माझं नातं फक्त आणि फक्त कवितेंपुरतंच आहे. त्यामुळे आपल्यात कधीच काहीही होऊ शकत नाही. हे मनावर पक्कं बिंबव. हे सारं तुला मान्य असेल तरच आपण बोलूया.”
“ही कसली जगवेगळी अट? हे कसलं स्वतःभोवती वलय? आणि कशासाठी? बाकी सगळं ठीक आहे पण मैत्रीबद्दल इतकी कटुता का तिच्या मनात? काय आहे तिच्या आयुष्यात?”
जुईलीचा मेसेज वाचून त्याच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले होते.
“प्रत्येकाचं एक खाजगी आयुष्य असतं. जसं माझंही आहे. आपण कशाला दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जायचं? आणि तसंही मला तरी कुठे तिच्याशी नातं जोडायला जायचंय! कोण आहे, कशी आहे इतकं समजलं तरी खूप आहे.”
आशुतोषने स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि तिला मेसेज केला.
“ठीक आहे मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत; पण मला तुझा आवाज ऐकायचा आहे. फक्त एकदा बोल. मग त्यानंतर ठरवू आपण, पुढे बोलायचं की नाही ते..”
“ठीक आहे, माझ्या अटी तुला मान्य असतील तर आपण बोलूया. आज रात्री मी कॉल करेन तुला.”
“हो चालेल. मी वाट पाहीन तुझ्या कॉलची. चल बाय फॉर नाऊ. जेवून घेतो. मग बोलू निवांत.”
“ह्म्म्म.. बाय.”
जुईलीने आशुतोषला मेसेज केला आणि ती तिच्या कामाला लागली. आशुतोषने पटकन जेवण उरकलं आणि तो त्याच्या खोलीत येऊन तिच्या कॉलची वाट पहात बसला. अजूनही जुईलीचा कॉल आला नव्हता. नवीन कवितेच्या ओळी मनात रेंगाळत होत्या. त्याने पटकन मोबाईलमध्ये कविता टाईप करायला सुरुवात केली.
रंगीत भावनांचे अत्तर उडून गेले
उरलेत पावसाचे डोळ्यांत थेंब ओले
© आशुतोष
इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग झाली. मोबाईलच्या डिस्प्ले स्क्रीनवर जुईलीचं नाव झळकलं. आशुतोषचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. थरथरत्या हातांनी त्याने कॉल घेतला.
“हॅलो आशुतोष..”
एक गोड आवाज त्याच्या कानी पडला.
“हॅलो..”
त्याच्या तोंडून इतकाच शब्द बाहेर पडला. त्याच्या आवाजाला जणू कंप फुटला होता. ऐन थंडीत कपाळावर घामाचे थेंब जमा व्हायला लागले होते.
“पटली का खात्री, मी एक मुलगीच आहे याची? तीच शंका दूर करायची होती मला. नाहीतर उगीच कोणाशी बोलतोय याचा विचार करत बसला असतास.”
पलीकडून खळखळून हसण्याचा आवाज आला.
“ह्म्म्म.. बरं झालं तुझा कॉल आला नाहीतर इतक्या गोड आवाजाला मी मुकलो असतो ना.. थँक्यू हं..”
आशुतोष मिश्किलपणे म्हणाला तसं पुन्हा एकदा पलीकडून हास्याचे कारंजे उडाले. जुईली आणि आशुतोष आता एकमेकांशी सहज बोलू लागले होते. दोघांच्याही मनावरचं दडपण बऱ्यापैकी कमी झालं होतं.
पुढे काय होतं? जुईली आणि आशुतोष यांच्यात खरंच मैत्रीचे सूर जुळतील? जुईलीच्या अशा विचित्र वागण्याचा अर्थ काय आहे? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा