Login

व्हाईट लिली - भाग १४

व्हाईट लिली.. एक रहस्यमय प्रेमकथा..
व्हाईट लिली - भाग १४
©अनुप्रिया


आशुतोष आणि जुईलीचं बोलणं सुरू झालं. कित्येक वर्षांनी आशुतोष कोण्या एका अनोळखी मुलीशी बोलत होता. अनोळखी तरी कसं म्हणावं? आजवरच्या तिच्या मेसेजेसमधल्या संभाषणावरून ते परकेपण कधीच गळून पडलं होतं. ती रात्र दोघांच्याही आयुष्यातली अविस्मरणीय रात्र ठरली. सुरू झाला होता एका अनोळखी वळणावरचा संवादाचा, मनातल्या भावनांचा कधीही न संपणारा प्रवास.. ती भरभरून बोलत होती. आशुतोष तिच्या बोलण्यात व्यत्यय न आणता तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता.

“मग आशुतोष, लिखाणाव्यतिरिक्त काय आवडतं तुला?”

“फारसं काही नाही. बोलायला, गप्पा मारायला, नवीन फ्रेंड्स बनवायला आवडतं?”

“फ्रेंड्स? अच्छा.. मैत्रीत तुझी फसवणूक झाली नाहीये ना म्हणूनच नवीन फ्रेंड्स बनवायला आवडतात असं बोलतोयस.”

“म्हणजे? तू का इतकी मैत्रीच्या बाबतीत उदासीन आहेस? काही झालंय का?”

“काही नाही. सोड तो विषय,. बरं तू सांग.. तुझ्या घरी कोण कोण असतं?”

“माझ्या घरी मी, माझे आईबाबा असं तिघेच राहतो. दोन बहिणी आहेत. त्यांची लग्न झालीत. त्या त्यांच्या सासरी असतात. मोठी बहीण इथेच शेजारच्या गावात आहे आणि धाकट्या बहिणीला मुंबईत दिलंय. बाबा रिटायर्ड झालेत आणि आई गृहिणी आहे. तुझ्या घरी कोण कोण असतं?”

आशुतोषने जुईलीला प्रश्न केला.

“माझ्या घरी माझे आईबाबा, मोठा भाऊ प्रसाद दादा, अर्पिता वहिनी, त्यांची दोन मुलं म्हणजे माझे भाचरे, माझा धाकटा भाऊ उमेश आणि आमची माई असा परिवार आहे.”

तिने पटकन उत्तर दिलं.

छानच आहे तुझं.. एकत्र फँमिली..”

“ह्म्म्म, आणि तुझं शिक्षण आशुतोष?”

मी एम. एस्सी (केमिस्ट्री) झालोय. म्हणजे पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण होता होता राहिलं.”

“का अर्धवट राहिलं? इंटरेस्ट नव्हता का?”

“तसं नाही.. आयुष्यात अशा काही घटना घडल्या की सगळं सोडून गावी आलो आणि बघ ना आता इथे अडकून बसलोय. ना काम ना धंदा.. काय करावं समजत नाही.”

“सर्वांत आधी तर तू स्वतःला दोष देणं बंद कर.. कोविडच्या काळात बऱ्याच जणांना तुझ्यासारखाच अनुभव आलाय. हळूहळू परिस्थिती बदलत जाईल. देवावर विश्वास आहे ना तुझा? देव कधीच चुकत नसतो इतकंच लक्षात ठेव. ही वेळ सुद्धा निघून जाईल. कीप पेशंन्स यार..”

“खरंय तुझं.. थोडा संयम दाखवायलाच हवा. पण खरं सांगू का जुईली? काहीच करावंसं वाटत नाही. सगळं संपल्यासारखं वाटतं. मी का आहे हाच प्रश्न पडतो बघ कधी कधी..”

“अरे आशुतोष! हे कसलं बोलणं? इतका छान हळव्या मनाचा कवी तू आणि असं बोलतोस? आशुतोष, एक विचारू?”

“ह्म्म्म.. हळव्या मनाचा आहे आणि तोच तर प्रॉब्लेम आहे अगं.. तू विचार तुला काय विचारायचं ते..”

“तुझी गर्लफ्रेंड?”

जुईलीच्या प्रश्नावर आशुतोष काही क्षण शांत झाला. त्या शांततेत बरंच काही दडलं होतं. एका ठसठसणाऱ्या जखमेवरची खपली उडाली होती आणि जखम भळभळून वाहू लागली होती.

“ह्म्म्म.. आलं लक्षात.. तुझ्या शांत बसण्याचा अर्थ समजला. ब्रेकअप?”

जुईलीने प्रश्न केला. आशुतोष तरीही शांत होता.

“आशुतोष, तू माझ्याशी बोलू शकतोस. तुझ्या मनात काय दुःख आहे, तू मला सांगू शकतोस. बघ म्हणजे कसं असतं ना! दुःख सांगितल्याने हलकं होतं. म्हणजे कसं बघ, दुःख जितकं उगाळत बसशील, म्हणजे सांगून मोकळा होशील तर त्याची धार बोथट होईल. त्याची तीव्रता कमी होईल. तू माझ्याशी बोलू शकतोस. आणि विश्वास ठेव आपल्यातलं बोलणं आपल्यातच राहील. बोल ना आशुतोष, काय सलतंय तुला?”

आशुतोषने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“काही नाही गं.. त्या गोष्टीला आता बरीच वर्षे झालीत. साधारण पाच सहा वर्षे.. मी एम एस्सीसाठी मुंबईला गेलो होतो. तिथे कॉलेजमध्ये मला ती भेटली.”

“काय नाव होतं तिचं?”

“रागिणी देसाई.. आमच्या ग्रुपमध्ये होती..”

आशुतोष जुईलीला त्याच्या प्रेमाबद्दल सांगत होता. जुन्या आठवणी ओसंडून वाहू लागल्या. त्याला मुंबईतल्या कॉलेजमधला पहिला दिवस आठवला. आपोआप मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने धावू लागले. डोळ्यातला पाऊस आपसूकच बरसू लागला. आठवणींची गर्दी झाली. कॉलेजच्या मखमली दिवसांतला सोनेरी क्षणाचा कप्पा अलगद उलगडत होता. जणू काही काल परवाच घडलेली गोष्ट.. त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी ती डोळ्यांसमोर फेर धरू लागली.

“त्या दिवशीही असाच पाऊस कोसळत होता..”

खिडकीतून ओथंबणारे थेंब पाहून तो स्वतःशीच बडबडला. ती पावसाळी रात्र.. गंधाळलेले ते क्षण सारं डोळ्यासमोर तरळून गेलं. तो जुन्या आठवणीत हरपून गेला. त्याला तो रम्य काळ आठवला आणि भरून आलेल्या आभाळासारखी त्याची अवस्था झाली.

मुंबईमधल्या कॉलेजचं पहिलंच वर्ष. ते सोनेरी दिवस.. स्वप्नांचा वेध घेणारं, फुलपाखरांचे पंख लावून उडण्याचं ते वय. प्रेमात वेडं होण्याचं, फुलायचं, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोपळ्यावाचून झुलायचं वय.. मे महिना संपून नुकताच जून महिना सुरू झाला होता. कॉलेज सुरू झालं होतं तरी अजून अभ्यासक्रमाला फारशी सुरुवात झाली नव्हती. रागिणी आणि तिची मैत्रीण स्नेहल कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्टॉपवर थांबल्या होत्या आणि अचानक कूस पालटावी तशी ऋतुचक्राने कूस पालटली रखरखीत उन्हाच्या झळा लागत असताना अचानक सोसट्याचा वारा सुरू झाला. काळ्या ढगांनी सूर्य झाकोळून गेला. अचानक हवेत गारवा वाटू लागला आणि पहिल्या पावसाने आपली वर्दी दिली. अचानक आलेल्या पावसानं रस्त्यावरच्या गर्दीची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. छत्री, रेनकोट काहीही सोबत नसल्याने बरेचजण पावसापासून वाचण्यासाठी बसस्टॉप, आजूबाजूच्या दुकानात आडोश्याला शिरले. पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.

“असा कसा आगंतुकासारखा आलाय कोण जाणे! आधीच कॉलेजला जायला उशीर झालाय आणि हा थांबायचं नाव घेईना. लेक्चर सुरुही झालं असेल.”

रागिणीकडे पाहत स्नेहल बडबडली. रागिणीचं मात्र तिच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. पावसाचे थेंब अंगावर झेलण्यात ती गुंग होती. तिला पाऊस खूप आवडायचा. हात पसरून आकाशाकडे तोंड करून पावसाचे थेंब झेलताना तिला प्रचंड आनंद व्हायचा. आजही ती चिंब भिजली होती. गुलाबी रंगाचा चुडीदार तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता. चाफेकळी नाक, गालावर गोड खळी, पाणीदार काळेभोर बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठांच्या पाकळ्या. हातात नाजूक सोन्याचं ब्रेसलेट, काळेभोर केस मोकळे सोडलेले. मधेच तिचं ते गोड मधाळ हसू. हृदयाचा ठोका चुकवणारा तिचा तो कटाक्ष.. पावसाच्या धारा झेलतानाचं तिचं ते रूप अधिकच मोहक दिसत होतं. इतक्यात स्नेहलला बस येताना दिसली.

“रागिणी, काय वेडेपणा आहे हा? अगं, किती भिजली आहेस! अशीच ओलेत्याने लेक्चरला बसणार आहेस का? आजारी पडशील ना! चल बस आलीय बघ. पुरे आता..”

स्नेहलने अक्षरशः तिला खेचून पुन्हा बसस्टॉपवर आणलं. मोठया नाखुशीनेच रागिणी बसमध्ये चढली.

“आह..! सुरेख..”

रागिणीला पाहताच आशुतोषच्या मुखातून कौतुकाने आपसूक शब्द बाहेर पडले. तो तिच्याकडे अवाक होऊन पाहतच राहिला.

“काय गं तू पण! किती छान पाऊस कोसळतोय! आणि तू? अगदीच अनरोमँटिक आहेस बघ.”

रागिणी नाखुशीनेच नाक फुगवून बसमध्ये खिडकीशेजारच्या सीटवर बसत स्नेहलला म्हणाली.

“असू दे मी अनरोमँटिक. तू आहेस ना रोमँटिक तेच बस झालं. ”

स्नेहल तिला चिडवत म्हणाली. बाजूच्या सीटवर बसलेला मुलगा आपल्याकडे एकटक पाहतोय हे रागिणीच्या लक्षात आलं.

“काय विचित्रच आहे हा.. कधी मुलगी पाहिली की नाही.. कसा एकटक बघतोय..”

ती त्याच्याकडे रागाने पाहत पुटपुटली. तिने त्रासिक मुद्रा करून त्याच्याकडं पाहिलं तसं आशुतोषने तिच्यावरून आपली नजर हटवली आणि तो खिडकीबाहेर पाहू लागला.

थोड्याच वेळात बस कॉलेजच्या स्टॉपवर थांबली तश्या त्या दोघी खाली उतरल्या. तोही खाली उतरून घाईघाईने तिथून निघून गेला. आधीच त्यांना खूप उशीर झाला होता.

“चल लवकर रागिणी, सगळे लेक्चर्स संपले असतील आता.” स्नेहल म्हणाली.

“मग कशाला जायचं वर्गात रिकाम्या खुर्च्या मोजायला? राहू दे ना गं.. आपण जाऊया ना परत. पावसात भिजूया मस्त!”

रागिणी तिला वर्गात जाण्यापासून अडवत म्हणाली.

“नाही आपण वर्गात जाणार आहोत. समजलं?”

“बरं बाई चल. अभ्यासाचं भूत चढलंय ना तुझ्या डोक्यावर.. चला जाऊ वर्गात..”

रागिणी नाखुशीनेच वर्गाच्या दिशेने जाऊ लागली.

“मे आय कम इन सर?”

सर्वांचं लक्ष वर्गाबाहेर उभ्या असणाऱ्या त्या दोघींकडे गेलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..