Login

व्हाईट लिली -२

ही कथा एका झुंजार व्हाईट लिलीची. तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तिच्या एका राजकुमाराची.
व्हाईट लिली - भाग २
©अनुप्रिया.


बराच वेळ वाट पाहूनही वृषाली ऑनलाईन दिसली नाही. शेवटी कंटाळून आशुतोषने मोबाईल तिथेच बाजूला ठेवला आणि पुन्हा डोळे मिटून तसाच बसून राहिला. वृषाली त्याची सध्याची म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीची सोशल मीडियावरची जिवाभावाची मैत्रीण. साहित्यिक म्हणून तिची त्याच्याशी झालेली ओळख आणि त्यानंतर फुललेली त्यांची मैत्री. हल्ली तिच्याजवळच आशुतोष मन मोकळं करायचा. वृषालीने मराठी विषय घेऊन एमए केलं होतं. त्याचबरोबर तिने मानसशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा दोन्ही विषयांचा अभ्यास केला होता. त्यामुळे माणसांच्या मनाची अवस्था ती अचूक ओळखायची. तिच्याशी बोललं की मनावर आलेली मरगळ निदान काही प्रमाणात दूर व्हायची. आताही त्या स्वप्नाचा अर्थ त्याला वृषालीच नीट सांगू शकेल असं आशुतोषला वाटलं आणि म्हणून मग त्याने तिला मेसेज केला होता. त्याच विचारात असताना अचानक आशुतोषच्या कानावर शेजारच्या घरातून जिवलगा सिरीयलचं शीर्षक गीत पडलं. सक्तीच्या लॉकडाऊनमुळे स्टार पल्स, स्टार प्रवाह टीव्ही चॅनलवाल्यांनी नवीन दर्शकांसाठी जुन्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या होत्या. त्यापैकीच जिवलगा ही मालिका. आशुतोष डोळे मिटून तल्लीन होऊन गाणं ऐकू लागला . गाण्याचे शब्द मनात झिरपत होते.


जग सारे इथे थांबले वाटते..
भोवतालची तरी चांदणे दाटते
मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते..

ओघळे थेंब गाली सुखाचा
मिटे अंतर लपेटून घेता…..
तू माझा मीच तुझी सख्या
जिवलगा…
ऐल हि तूच अन पैलही तू सख्या
जिवलगा…”

तिच्या आठवणींनी आशुतोष व्याकुळ झाला. मनात पुन्हा कालवाकालव झाली.

“खरंच तर होतं, तिच्या सानिद्यात जणू सारं जग थांबून गेल्यासारखं वाटायचं. तिच्यासोबत चालताना ऊनसुद्धा सावलीसारखं वाटायचं. माझ्यासाठी ऐल आणि पैल दोन्ही तीच होती. माझी जिवलगा..”

त्याच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. इतक्यात आशुतोष आई पुन्हा त्याच्या खोलीत आली. इतका वेळ झाला तरी आशुतोषला बिछान्यातच बसलेलं पाहून ती पुन्हा चिडली,

“अरे, अजून किती वेळ असाच बसणार आहेस? एका जागी बसून पुतळा व्हायची वेळ आली तरी अजून तसाच ढिम्मासारखा बसून आहेस. किती ओरडायला लावशील? उठ ना पटकन..”

आई पुन्हा त्याच्यावर डाफरली.

“अगं आई, कशाला चिडतेस? आणि काय घाई आहे तुला? लवकर तयार होऊन कुठे जायचंय? इतक्या घाईने कोणती गाडी पकडायची आहे? अगं आई, सक्तीचा लॉकडाऊन सुरू आहे. आयसोलेटेड आहोत आपण. आपल्याला घर सोडून कुठेही जाता येणार नाही.”

आशुतोष अंगाला आळोखेपिळोखे देत म्हणाला. आई आणखीनच चिडून म्हणाली,

“मग? अंघोळ करायची नाही? पोटात काही भर घालायची नाही. घरात बसून तुला काही कामं नसतील. मला खूप कामं आहेत. पटकन अंघोळीला जा.. आणि लवकर बाथरूम रिकामं कर, मला अजून कपडे धुवायचे आहेत. भांड्याचा ढीग पडलाय.”

“तुझी बडबड ऐकण्यापेक्षा अंघोळीला गेलेलं परवडलं.”

असं म्हणत तो काहीसा चिडूनच जागेवरून उठला. त्याने टॉवेल उचलला आणि फ्रेश व्हायला बाथरूमकडे निघाला. प्रातविधी उरकून बेसिनजवळ येत आशुतोषने आरश्यात पाहिलं.

“काय अवतार झालाय माझा! दाढी वाढलीय, केस वाढलेत, डोळे खोल गेलेत आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागलीत. गाल आत गेलेत. ओठ काळे पडलेत. तब्येत तर इतकी उतरलीय की हाडांचा सापळाच दिसतोय. कधीकाळी कॉलेजमध्ये सर्वांचा आवडता होतो मी. तरुणाईचा आवाज होतो मी.. चैतन्याचा धबधबा म्हणायचे मला. कॉलेजमधल्या मुलींच्या हृदयाची धडकन होतो मी.. त्यांच्यासाठी चार्मिंग प्रिन्स होतो मी.. माझ्या कविता वाचून तर मुली अगदी घायाळ होऊन जायच्या; पण ती गेली आणि साऱ्या आयुष्याची धूळधाण झाली.”

जुन्या आठवणी पुन्हा मनात डोकावू लागल्या. आशुतोषने तोंडावर पाण्याचे तीन चार हबके मारले आणि केसांत हात फिरवून पुन्हा आरश्यात पाहिलं.

“केस वाढलेत, दाढीही वाढलीय. लॉकडाऊनमुळे सलूनही बंद असतील. घरच्या घरी निदान दाढी तरी करूया.”

आशुतोष स्वतःशीच पुटपुटला. दाढी करायला त्याने ब्रश आणि क्रीम घेतली. पुन्हा आरश्यात पाहत दाढीवरून हात फिरवला.

“नको नाहीतर.. कशाला उगीच! कोणाला दाखवायचंय? राहू देत.. उद्या वगैरे बघू.”

अशा विचाराने एक सुस्कारा सोडत बेत रद्द केला. आरशावर तोंडाची वाफ पसरून आशुतोष हातानेच आरसा पुसू लागला. अगदी उगाच! आरश्यात स्वतःला पाहून पुन्हा तो विचारात गेला. त्याला पुन्हा ते स्वप्न आठवलं.

“ती आकाशातून धरणीवर अवतरणारी स्वप्नसुंदरी.. ते गणपतीच्या मंदिरातला घंटानाद.. ते बांबूचं हॉटेल.. अचानक तिचं निघून जाणं.. किती सुंदर होती ती! ती रागिणी नव्हती हे मात्र खरं.. पण काय अर्थ असेल त्या स्वप्नाचा?कसले संकेत असतील?”

आशुतोषची पुन्हा तंद्री लागली. त्याला कॉलेजमधले दिवस आठवू लागले. आशुतोष संपूर्ण कॉलेजचा लाडका विद्यार्थी होता. खरंतर शाळेत असल्यापासूनच आशुतोष अभ्यास, वक्तृत्व, लेखन, खेळ सगळ्यांत कायम पुढे असायचा. कधी कसलीच तक्रार नाही. खरंतर तो अगदी पहिलीपासून अभ्यासात हुशार होता पण त्यानंतर वक्तृत्व, लेखन, खेळ प्रत्येक स्पर्धेत पुढे राहू लागला. किरकोळ देहयष्टी. त्यामुळे खेळात त्यामानाने कमीच पण तरी तो संघात कायम असायचा. दरवर्षी वर्गात पहिला क्रमांक त्याचाच ठरलेला असायचा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत शाळेसाठी ढाल मिळवून आणली तेव्हा झालेला सत्कार आणि ती मिरवणूक आणि मग त्यानंतर तर शाळेत, घरी अगदी सगळीकडेच लाड होत गेले. आयुष्य कसं आरामात सुरू होतं. मित्रांच्या घरी गेलं की त्याला कोण मान! जिवाभावाचे मोजके मित्र पण शत्रू नव्हतेच मुळी.

“आता काय! तो आरसा कशाला घासत बसलायस? जा ना, आंघोळ करून घे. तो चहा करून ठेवलाय तो ढोसा आणि कामाचं बघा काहीतरी. उपकार करा आमच्यावर. म्हातारे झालो आता आम्ही."

आईच्या जळजळीत बोलांनी आशुतोषची तंद्री भंगली. त्याने आईकडे पाहिलं पण तिच्या त्या आरपार जाणार्‍या नजरेला नजर देणं त्याला जमलं नाही. एक थंड उसासा टाकीत आशुतोष निमुटपणे आंघोळीला निघून गेला. तिथेही नळ चालू केला पण डोक्यातून विचार काही केल्या जात नव्हते. शाळेतले दिवस आठवू लागले. शाळेमधल्या मित्रमैत्रिणींची आठवण येऊ लागली. समोर बादली भरून वाहतेय याकडे त्याचं लक्षच नव्हतं.

“किती जिवाभावाचे मित्र होते! काय ती मजा होती! काय ते सुख! किती मखमली दिवस होते ते! ना कसली चिंता ना काळजी! दुनियादारीशी कसलाच संबंध नाही. हसणं, खेळणं, बागडणं, समुद्रकिनारी, दऱ्या खोऱ्यात हिंडणं, जंगलातून फेरफटका इतकंच काय ते आयुष्य!”

जुन्या आठवणींनी आशुतोष हळवा झाला. मोठी ताई अवनी आणि अदिती यांची खूप आठवण येऊ लागली. त्यांच्या आठवणींनी गळ्यात हुंदका दाटून आला. आईव्यतिरिक्त जर त्याची काळजी करणारं कोणी असेल तर त्या होत्या त्याच्या मोठ्या बहिणी. दोघींचीही लग्न झाली होती. त्यामुळे त्या दोघी सासरी गेल्यावर घरात आशुतोषचे आई बाबा आणि तो इतकाच परिवार होता.

“आशू, ए आशू.. झालं का? आटोपलं की नाही? किती उशीर! तुझ्या बाबांना पण जायचंय. लवकर बाहेर ये..”

आशुतोषच्या आईने पुन्हा त्याला आवाज दिला. तिच्या आवाजाने त्याच्या विचारांची शृंखला तुटली. समोर बादली भरून वाहत होती. त्याने पटकन पाण्याचा नळ बंद केला. अंगावर दोन चार तांबे ओतले आणि तो फ्रेश होऊन बाहेर आला. अंगावर कपडे चढवले आणि टॉवेलने डोक्यावरचे केस पुसत तो आरशासमोर उभा राहिला. बाबा पटकन बाथरूममध्ये गेले आणि त्यांचं आवरून बाहेर आले. कपाटातल्या हँगरला लटकवलेले कपडे कपाटातून बाहेर काढून अंगावर चढवले आणि आशुतोषकडे पाहत ते म्हणाले,

“अरे, घरातलं वाणसामान संपलंय.. तुझ्या आईला आणून द्यावं लागेल. लॉकडाऊनमुळे दुकानं ठराविक वेळेतच अगदी एक दोन तासांसाठीच उघडतात. तेवढ्यावेळेतच सामान घेता येईल, नाहीतर वाणसामानही मिळणार नाही.”

टेबलवरची कापडी पिशवी आणि वाणसामानाची यादी हातात घेऊन ते दाराच्या दिशेने निघाले. इतक्यात आशुतोषने त्यांना आवाज दिला,

“बाबा, मी आणतो वाणसामान..”

“नको तुझं उरकेपर्यंत दुकानं बंद होतील. परत सर्वांची उपासमार व्हायची. मीच जातो.”

उंबऱ्याबाहेर ठेवलेल्या चपला पायात अडकवत आशुतोषचे बाबा म्हणाले तसं बाबांचे वार्धक्याने झुकलेले खांदे पाहून त्याला गलबलून आलं. इतक्यात मोबाईलचा मेसेज टोन वाजला. त्याने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं. वृषालीचा मेसेज झळकला.