व्हाईट लिली - भाग ३
©अनुप्रिया.
©अनुप्रिया.
“गुडमॉर्निंग आशू, सॉरी थोडं कामात होते आताच मी तुझा मेसेज वाचला. कॉलवर बोलू. मी फ्री झाले की कॉल करते तुला.”
आशुतोषने वृषालीचा मेसेज वाचला.
“ठीक आहे. निवांत कर.”
त्याने वृषालीला मेसेज केला. पुन्हा त्याचं लक्ष त्याच्या बाबांकडे गेलं.
“या वयातही किती धावपळ करताहेत बाबा! किती दगदग करावी लागतेय त्यांना! थकलेल्या खांद्यावर आजही कुटुंबाची जबाबदारी आहे. खरंतर आता त्यांना आरामाची गरज आहे. सुखासमाधानाने जगायला हवं. कुटुंबाची जबाबदारी आता मी माझ्या खांद्यावर घ्यायला हवी; पण मी…”
आशुतोषच्या मनावर पुन्हा मळभ दाटून आलं आणि तो उदास झाला. बाबांनी पटकन दारात उभी असलेल्या दुचाकीला किक मारून गाडी स्टार्ट केली आणि ते भुरर्कन अंगणातलं गेट उघडून बाहेर पडले. आशुतोष त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगदी ते दिसेनासे होईपर्यंत पाहत राहिला. आशुतोष बाहेर जाणाऱ्या आपल्या बाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत होता. वयोमानामुळे म्हणा किंवा कुटुंबाच्या जबाबदारीमुळे म्हणा, वार्धक्याकडे झुकलेल्या, थकलेल्या बाबांना पाहून त्याला गहिवरून आलं. उगीच त्याला अपराधी वाटू लागलं. त्याच्या लहानपणापासून बाबांनी घेतलेले अपार कष्ट डोळ्यासमोर येऊ लागले. त्यालाही त्या कष्टांची पूर्ण जाणीव होतीच. आशुतोषला त्याचं बालपण आठवलं. तरुणपणीचे आपले रुबाबदार बाबा आठवले. आशुतोष मोबाईलमधल्या फोटो गॅलरीतले जुने फोटो चाळू लागला. एकेक फोटो पाहताना ओठांवर अलगद हसू आणि डोळ्यात पाणी येऊ लागलं.
“किती छान दिसत होते बाबा! कायम हसतमुख.. देखणे, रुबाबदार..”
बघता बघता सारा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर पिंगा घालू लागला. दिमाखात उभ्या असलेल्या ‘गुलमोहर’ बंगल्याचं पूर्वीचं रूप आपसूकच आठवू लागलं. उंच हिरवेगार डोंगर आणि अथांग समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य लाभलेलं, हिरव्यागार वनराईच्या कुशीत वसलेलं, घाटरस्त्यांनी वेढलेलं, डोंगराच्या उतार भागात सर्वत्र आनंदानं डोलणारी, डोळ्यांचं पारणं फेडणारी भातशेती, असा हा सुंदर कणकवलीच्या छोट्याश्या खेडेगावाचा परिसर.. त्यात पाच पन्नास घरं असलेली छोटी वाडी आणि त्या वाडीत मोठ्या दिमाखात उभा असलेला जयवंत गडकरी यांचा ‘गुलमोहर’ बंगला. त्याला पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेलं कौलारू छप्पर, बंगल्यासमोर भलं मोठ्ठं अंगण.. चढत्या क्रमाने असलेली पडवी, स्वयंपाकघर, माजघर, अंगणात आनंदानं डोलणारी फुलझाडं, आंबा, नारळी फणसाची झाडं, केळीच्या बागा. देव्हाऱ्यात अखंड तेवणारा नंदादीप आणि सुखानं नांदणारं गडकरी यांचं सुखी कुटुंब.
आशुतोषचे बाबा म्हणजे जयवंत गडकरी एका खाजगी कंपनीत काम करत होते. स्वभावाने अतिशय साधे, कोणावरही चटकन विश्वास ठेवायचे. सगळं जग त्यांना आपल्यासारखंचं निर्मळ वाटायचं. ते नेहमी म्हणायचे,
“या जगात वाईट माणसं नाहीतच आणि असली तरी ती आपल्या वाटयाला का येतील? आपण चांगले असलो तर समोरचा कशाला वाईट वागेल? आणि समजा वागला तर आपण आपला चांगुलपणा सोडू नये. कधीतरी वाईट वागणाऱ्याला आपल्या वाईट कर्माची उपरती होईलच ना? सर्वांशी प्रेमाने वागा मग तेही तुमच्याही प्रेमाने वागतील.”
बाबा नेहमी सर्वांशी प्रेमाने वागायचे. कधी कोणाला दुखवायचे नाही. त्यांच्या या स्वभावाचा अनेकांनी गैरफायदा घेतला होता. आर्थिक, मानसिक नुकसानही झालं होतं. पुन्हा पुन्हा वाईट अनुभव येऊनही बाबा काही बदलायचे नाहीत. बाबा पुन्हा पुन्हा त्याच चुका करायचे. ते त्यांच्या फसवणाऱ्या मित्रांवर, नातेवाईकांवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवायचे आणि ती लोकं त्यांना पुन्हा फसवून जायची. समोरचा फसवतोय हे त्यांना कळत नसायचं असं नाही पण ते काही बोलायचे नाहीत. त्यांच्या या साध्या स्वभावामुळे कधीकधी शुभदा खूप चिडायची. हल्ली मुलंही बोलू लागली होती; पण ते हसून सोडून द्यायचे.
आशुतोषचे बाबा आयुष्यभर प्रामाणिकपणे, सचोटीने कंपनीत काम करत राहिले. इतक्या वर्षे काम केल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी जयवंत कंपनीतून सेवानिवृत्त झाले. कंपनीच्या मालकांनी, लोकांनी त्यांच्या स्वभावाचं, चांगल्या वर्तणुकीचं भरभरून कौतुक केलं. शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. मालकाने स्वइच्छेने त्यांना छोटीशी भेटवस्तूही दिली. काही महिन्यातच त्यांची पेन्शन सुरू झाली. नोकरीत असताना पगार तुटपुंजा असल्याने पेन्शन फारशी नव्हती; तरी शुभदाने कधी कुरबूर केली नाही. घरात पैशाची चणचण असायची; पण आई शुभदा मात्र सारं निभावून न्यायची. काटकसर करून, काडी काडी वेचून ती नेटानं आपला संसार करत होती. शुभदा म्हणजे जणू त्या घरातलं चालतं बोलतं विद्यापीठच. आकाशात उडणाऱ्या घारीप्रमाणे तिचं आपल्या पिलांवर लक्ष असायचं. शुभदा आपल्या तिन्ही मुलांवर जितकी माया करायची तशी ती फार कडक शिस्तीची होती. मुलांच्या शिक्षणासाठी तिने अतोनात प्रयत्न केले. मुलांना शिकवलं, मोठं केलं. ती माऊली दिवस रात्र मुलांच्या सुखासाठी झटत होती. तिने सोसलेल्या दुःखाची कल्पनाच करता येणार नव्हती. आशुतोष म्हणजे सर्वांचा जीव की प्राण! घरातलं लाडकं अपत्य त्यामुळे त्याचे लाडकौतुक अगदी आतापर्यंत चालूच. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आजवर आशुतोषला त्यांनी कसलीच झळ लागली नव्हती. शुभदाचा तीन मुलांमध्ये सर्वांत जास्त जीव आशुतोषवर होता.
अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीच्या हॉर्नमुळे आशुतोष भानावर आला. आणि अश्ववेगाने चौफेर धावणाऱ्या मनातल्या विचारांच्या गाडीला ब्रेक लागला. आशुतोषला आईच्या विचारांनी गहिवरून आलं. तो हॉलमधून उठून आत देवघरात गेला. देवाला नमस्कार केल्यानंतर आईच्या पाया पडायला गेला. आई स्वयंपाकघरात गॅसपाशी उभी होती. पाया पडून उभा राहिला. आईच्या डोळ्यात पाणी होतं. आई रडतेय हे त्याला समजून आलं.
“आई काय झालं? का रडतेय? तुला काही दुखतंय का गं?”
त्याने काळजीने विचारलं.
“नाही तसं काही नाही. कांदा चिरतेय ना त्यामुळे डोळ्यात पाणी आलं.”
आईने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं.
“आई मला समजतंय तू का रडतेय ते.. काही कांद्यामुळे डोळ्यातून पाणी येत नाहीये.. खोटं बोलतेयस तू.. मला माहित आहे, तू माझ्यावर रागावलीस, मलाच बोल लावलेस म्हणून तुलाच वाईट वाटतंय ना? स्वतःचाच राग येतोय ना? माझ्यावर चिडल्याचा तुला त्रास होतोय ना? पण आई तुझं काहीच चुकलं नाही. आणि तू कधीच चुकणारही नाहीस. तुझी होणारी चिडचिड मला समजत नाही का? पण आई काय करू गं! आयुष्यानेच मला अशा वळणावर आणून ठेवलंय की, मला काहीच कळत नाहीये. सर्वत्र फक्त अंधारच दिसतोय.”
आशुतोष उदास होऊन मनातल्या मनात पुटपुटला. आईच्या मनाची अवस्था आशुतोषला कळत होती. तिचा त्रागा, तिची चिडचिड या मागचं कारण त्याला समजत होतं. आशुतोषच्या बेफिकीर वागण्याने शुभदाला आता त्याच्या भवितव्याची चिंता वाटू लागली होती.
“कसं होणार माझ्या आशुचं? काय असेल त्याचं भविष्य? किती दिवस असं भूतकाळातल्या आठवणीत जगायचं? शिक्षणही अर्धवट सोडून आलाय. चांगली नोकरी लागली होती; तीही याच्या अशा बिनधास्त वागण्यामुळे सोडून दिली. आणि आता यापूढे त्याच्या भवितव्याचं काय? सारंच अंधारातच..”
शुभदाच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागले. आशुतोषचंही आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. तिने सोसलेल्या दुःखाची त्याला चांगलीच कल्पना होती. आणि त्याचमुळे तो आईला कधीच दुखवत नसायचा. शुभदा आशुतोषची फक्त आई नव्हती तर त्याची चांगली मैत्रीणही होती. आशुतोष आपल्या आईपासून कधीच काही लपवत नसे आणि शुभदाही त्याला तिच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी सांगायची. अगदी त्याच्या बाबांशी लग्न झाल्यापासून गुलमोहर बंगल्यात सुन म्हणून आल्यापासून, घरात झालेला सासुरवास ते वडिलोपार्जित संपत्तीसाठी झालेल्या वादापर्यंत सारं काही आशुतोषला ठाऊक होतं. पदवी मिळेपर्यंत सारं काही छान होतं; पण पदवीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेला आणि मुंबईच्या भुलभूलैया शहरात तो कायमचाच हरवला. मुंबईच्या मायावी नगरीनं वेड लावलं. याच शहरात प्रेम गवसलं आणि लगेच हरवलंही. तिच्या जाण्याने तो कोलमडून गेला. आणि दोन वर्षांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडून तो गावी परतला. आशुतोष आपल्या घरी आला खरा; पण तो पुरता बदलला होता. कायम हसतमुख असणारा आशुतोष आता उदास आणि शांत वाटू लागला. आपलं सर्वस्व हरपल्यासारखा वागू लागला. घरात कोणाशी नीट बोलत नव्हता. स्वतःच्या खोलीत कोंडून घ्यायचा. स्वतःच्याच विश्वात तो हरवलेला असायचा. दिवसभर घराबाहेरच असायचा. संध्याकाळी, कधी कधी रात्री उशिरा घरी यायचा. शुभदाला त्याची काळजी वाटू लागली.
क्रमशः
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा