Login

व्हाईट लिली -४

ही कथा एका झुंजार व्हाईट लिलीची. तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तिच्या एका राजकुमाराची.
व्हाईट लिली - भाग ४
©अनुप्रिया.


दिवसरात्र घराबाहेर राहणाऱ्या आशुतोषकडे पाहून शुभदाला आपल्या मुलाची खूप काळजी वाटू लागली.

“काय झालंय माझ्या आशूला? कुठे जात असेल? वाईट मुलांच्या नादी तर लागला नसेल? व्यसन तर करत नसेल? तसा माझा मुलगा खूप गुणी आहे; पण दुःखाचा अतिरेक होऊन व्यसनी मुलांच्या नादी लागून तो व्यसनाच्या आहारी गेला तर? हल्ली फारच विचित्र वागायला लागलाय तो.”

शुभदाचं मन चिंतेनं ग्रासून जायचं. एकदा तर तिने आशुतोषला विचारलंही. त्या दिवशी आशुतोष मध्यरात्री खूप उशिरा घरी परतला. शुभदा त्याची वाट पाहत थांबली होती. तो घरी आला आणि तडक फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तोपर्यंत शुभदाने जेवण गरम करून वाढलं. तो जेवायला बसला. आशुतोष काहीही न बोलता ताटात वाढलेलं अन्न जेवू लागला. शुभदा त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडे पाहत होती. वाटीत आमटी वाढत तिने त्याला विचारलं,

“ओठ काळे कशाने पडले रे इतके?"

“काही काय! माझे ओठ कधी गुलाबी होते? असेच आहेत की.."

“खरं सांग सिगारेट ओढतो ना तू?"

“आज हे काय आणि नवीन?"

“काल कपड्यांना पण वास येत होता. खरं सांग. नाहीतर तू आहेस आणि मी आहे."

“अगं आई, मी आजवर कधी व्यसन केलंय का? आणि तुलाही माहिती आहे मी असलं काही कधीच करणार नाही; मग कशाला डोकं खातेय?"

“मग तो वास?"

“अगं टपरीवर चहा प्यायला गेलो होतो. तिथे दोघे तिघेजण पीत होते सिगारेट. त्याचा वास असेल. तुझं आपलं उगीच काहीतरी. सीआयडी सारख्या चौकशा.."

आशुतोष रागाने म्हणाला आणि जेवणाच्या ताटाला नमस्कार करून उठला.

“अरे संपव तरी सगळं.. असं अर्धवट ताटावरून उठू नये.”

“नको आई, बस्स झालं मला. पोट भरलं माझं. तशीही फारशी भूक नव्हती मला.”

असं म्हणत वॉशबेसिनमध्ये हात धुवून तो आपल्या खोलीत निघून गेला. शुभदा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती.

“मला माहित आहे, माझा आशू तसा मुलगा नाही. मला खात्री आहे तो वाईट व्यसनांच्या नादी लागणार नाही. पण आईचा जीव आहे ना! थोडा घाबराघुबरा होणारच.”

शुभदा स्वतःशीच पुटपुटली. आशुतोषवर तिचा विश्वास होता; पण रागिणीच्या जाण्याने तो पुरता निराशेच्या गर्तेत गेला होता. त्यामुळे तो व्यसनाच्या आहारी तर जाणार नाही ना म्हणून ती उगीच त्याला विचारून तिच्या मनाची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत असे. बरेचदा ती त्याचं पाकीट तपासायची. पाकिटात त्याने लपवून ठेवलेला रागिणीचा फोटो तिनेही कित्येकदा पाहिला होता; पण ती कधीच त्याला दुखवायची नाही. तिला माहीत होतं की तो मनस्वी आहे. त्याच्या अश्या बिनधास्त वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचे अजून एक कारण म्हणजे घरात त्याच्याइतकं तिला समजून घेणारा दुसरा कुणीच सदस्य नव्हता. सगळं काही ठीकठाक होतं; पण मग काय होतं त्याच्या आयुष्यात ज्यामुळे तो असा हरवलेला असायचा? शुभदाला काही कळायचं नाही. त्याच्या काळजीने ती व्यथित व्हायची. आजही आपल्या लाडक्या लेकाला ओरडल्याचं शल्य तिच्या मनाला टोचत होतं.

“बोलेन त्याच्याशी निवांत. मला बोलायलाच हवं. आता असं शांत बसून चालणार नाही.”

ती वरणाला फोडणी देता देता स्वतःशीच पुटपुटली. इतक्यात आशुतोषच्या मोबाईलच्या रिंगच्या आवाजाने त्या दोघांच्याही विचारांची शृंखला तुटली. आईने त्याच्याकडे पाहिलं आणि ‘कोणाचा कॉल आहे?’ असं तिने त्याला नजरेनंच विचारलं. मोबाईल स्क्रिनवर वृषालीचं नाव झळकलं. त्याने पटकन कॉल घेतला.

“हॅलो वृषा..”

आशुतोषच्या तोंडी वृषालीचं नाव ऐकून कॉल वृषालीचा आहे हे शुभदाच्या लक्षात आलं. वृषालीने बोलायला सुरुवात केली.

“हं बोल आशू.. काय झालं?”

“काही नाही गं.. पुन्हा तेच स्वप्न. कळत नाही काय अर्थ असेल या साऱ्या गोष्टींचा? नेमकं पहाटेच्या वेळी स्वप्नं पडताहेत. आणि अचानक जाग येते.”

“हं..”

वृषालीने आशुतोषच्या बोलण्यावर हुंकार भरला आणि ती विचार करू लागली.

“कदाचित तुझ्या मनातल्या इच्छा तुझं स्वप्न बनून तुझ्यासमोर येत असतील. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते पण ती सत्यात उतरत नसेल तर आपण सुप्त मन त्या इच्छेच्या मागे धावत राहतं आणि मग स्वप्न बनून आपल्याला दिसत राहतं.”

वृषाली म्हणाली.

“अगं नाही वृषा.. तसलं काही माझ्या मनातही येत नाही. तुला तर सगळंच ठाऊक आहे ना? असं कोणी माझ्या आयुष्यात नाहीये आणि नकोच मला काही.”

तो काहीसा चिडून म्हणाला. रागिणीवरचा राग उफाळून आला. डोळ्यात पाणी साठू लागलं.

“हं.. ठीक आहे. तू त्याचा जास्त विचार करू नकोस. आपण एक काम करू. मी तुला काही ऑडिओ क्लिप्स पाठवते. म्युजिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. झोपण्यापूर्वी ते ऐक. शांत वाटेल मनाला. काही दिवस ते करून पाहू. त्याने काही फरक पडतोय का ते पाहू. फरक पडला तर ठीक नाहीतर मग दुसरा उपाय करू.”

वृषाली त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली.

“हो चालेल.. तेही करून पाहू.”

“अरे पण आशू, तू त्या स्वप्नाचं इतकं टेन्शन का घेतोस? एक स्वप्नसुंदरी तुझ्यासाठी आकाशातून अवतरते, ही आनंदाची गोष्ट आहे ना! बेटा, असं हे स्वप्नसुंदऱ्यांना पाहणं सगळ्यांच्या नशिबात नसतं. सो एन्जॉय द ड्रीम..”

वृषाली त्याला चिडवत म्हणाली.

“पण स्वप्नाच्या शेवटी ती स्वप्नसुंदरी मला सोडून जाते. ती गेली तशी..”

आशुतोषच्या वाक्याने वातावरण गंभीर झालं.

“बरं ते सगळं सोड.. नवीन काय लिहलंस? किती भारी लिहतोस अरे तू! प्रत्येक शब्द मनाला भिडतो बघ. मी सुद्धा लिहते; पण तुझ्या इतकं छान जमत नाही मला. ए तुला तो मकरंद माहितीये? मकरंद सावंत? तोही कसलं छान लिहतो माहितीये? आजकाल सोशल मीडियावर त्याचे कोट्स किती व्हायरल होताहेत. मला त्याचं लिखाण फार आवडतं अरे..”

आशुतोषचा मूड बदलण्याचा वृषाली प्रयत्न करत होती.

“कोण गं? मला आठवत नाहीये; पण तू म्हणतेय तर एकदा त्याच्या वॉलवर फेरफटका मारून यायलाच हवा. वृषा, तुही छान लिहतेस अगं.. फक्त थोडं पॉलिश करायची गरज असते; पण मुळात तुझ्या कल्पनाच इतक्या भन्नाट आणि हळव्या असतात ना काय सांगू तुला! आणि माझं म्हणशील तर मला इतक्यात तर छान काही सुचलं नाहीये. लिहायला घेतलं की पूर्ण ब्लँक होतो मी. सुचणंच थांबून जातं. काय झालंय मला खरंच कळत नाहीये अगं. आणि त्यात हा लॉकडाऊन. काम न धंदा. खायचं आणि आडवं पडायचं. घरात असं नुसतं बसून कंटाळा आलाय बघ. ही काय जिंदगी आहे?”

त्याच्या आवाजातला त्रागा तिला स्पष्ट जाणवत होता.

“हो रे आशू, सगळीकडे तीच परिस्थिती आहे बघ. रोज टीव्हीला त्या मृत्यूचं थैमान घातलेल्या बातम्या.. रोज वाढत जाणारी ती आकडेवारी पाहून तर जीव घाबरायला होतो बघ. एनी वे.. तू काळजी घे घरच्यांची आणि स्वतःचीसुद्धा. लिहायला काही सुचत नसेल तर वाचन कर. टीव्ही बघ. हास्यजत्राचे एपिसोड बघतो की नाही? धमाल असते नुसती..”

वृषाली आशुतोषला नकारात्मक विचारांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होती. मग थोडा वेळ बोलून आशुतोषने कॉल कट केला. फोन ठेवल्यावर आईने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत प्रश्न आणि काळजी दोन्ही स्पष्ट दिसत होती.

“काय झालंय आशू? काय म्हणत होती वृषा?”

शुभदाने प्रश्न केला.

“काही विशेष नाही गं आई.. सहजच बोलत होतो.”

आशुतोष म्हणाला.

“आईला काही सांगायला नको. उगीच काळजी करत बसेल.”

आशुतोष मनातल्या मनात पुटपुटला.

“ते तिला तू स्वप्नाचं काय म्हणत होतास? माझ्या कानावर तुझं बोलणं पडलं. कसलं स्वप्न? काही त्रास होतोय का तुला? खरं सांग आशू, माझ्यापासून लपवू नकोस.”

आईने काळजीने विचारलं.

“अगं आई, तू कशाला टेन्शन घेतेस? काळजी करण्याइतकं काही झालेलं नाही.”

“नसेलही काही; पण जे काही असेल ते मला ऐकायचंय. तू कधीपासून गोष्टी अशा लपवायला लागलायस?”

पुढे काय होतं? आशुतोषच्या आयुष्यात काय घडणार आहे? पाहूया पुढील भागात..