Login

व्हाईट लिली -६

व्हाईट लिली.. एक रहस्यमय प्रेम कथा..
व्हाईट लिली - भाग ६
©अनुप्रिया.


“मी इथे थांबायला आलेलो नाहीये. तुमच्या लाडक्या लेकीला सोडायला आलोय. सांभाळा तुमच्या मुलीला..”

तो गरजला. त्याचे शब्द ऐकून सगळेच चिंतीत झाले.

“अहो, काय झालंय जावईबापू? दोघे भांडलात का? अहो, हे असं चालायचंच. संसार म्हटला की अशा छोट्या मोठ्या कुरबुरी, भांडणं असणारच. त्याशिवाय का संसाराला गोडी येणार आहे?”

शुभदाची आई वातावरण शांत करण्याच्या हेतूने मजेने हसून म्हणाली. शुभदाकडे रागाने पाहत दातओठ खात तिच्या नवऱ्याने बोलायला सुरुवात केली.

“अहो, आमची खूप मोठी चुक झाली. तुमच्या मुलीला पसंत केली. तुमच्याशी सोयरीक केली. आम्ही तिच्या भोळ्या चेहऱ्याला भुललो. कसलीही चौकशी न करता तुमच्या मुलीसोबत लग्न करायला तयार झालो. आता हिने रंग दाखवायला सुरुवात केलीय. ह्या भोळ्या चेहऱ्यामागे किती कपटी चेहरा लपलाय हे आमच्या बरोबर लक्षात आलंय. हिचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय. मला आता मला हिच्याबरोबर एक दिवसही राहायचं नाहीये. मी चाललो.”

शुभदाचा नवरा चिडून म्हणाला.

“अहो, पण असं तिला सोडून जाण्यासारखं झालंय तरी काय? शुभा, काय झालंय? सांग बाई लवकर. उगीच माझा जीव टांगणीला लावू नकोस.”

आता शुभदाच्या आईला काळजी वाटू लागली होती.

“ती काय सांगणार तुम्हाला आणि कोणत्या तोंडाने? सांगण्यासारखं हिने काय ठेवलंय? तुम्ही विचारत बसा तिला. मी निघालो.”

शुभदाकडे रागाने पाहत तो पुढे म्हणाला,

“आता रहा इथेच आणि काय करायचं तर कर. पुन्हा तिकडे कधीच येऊ नकोस. तुझं काळं तोंडही मला दाखवू नकोस.”

असं म्हणत तो रागाने तिथून निघून जाऊ लागला.

“अहो, पण ऐकून तर घ्या. काय झालंय ते नीट सांगा तरी. थांबा थोडं.. आपण बोलूया. बोलून कोणतेही प्रश्न सुटतात.”

शुभदाची आई विनवण्या करत होती. शुभदाच्या नवऱ्याला जाण्यापासून अडवत होती. शुभदा मात्र आसवं गाळत एका कडेला उभी होती.

“हे पहा, मला काही बोलायचं नाहीये. मी हिला परत घेऊन जाणार नाही कधीच. अशा स्त्रीशी मला संसारच करायचा नाही.”

तो फणकाऱ्याने म्हणाला.

“अशी म्हणजे? काय केलंय तिने? माझ्या मुलीला काही बोलण्याआधी विचार करा. तिच्यावर असे भलते सलते आरोप करू नका. जरा सामोपचाराने घ्या.”

आता मात्र शुभदाच्या आईचा स्वर चढला होता. इतकं सबुरीने घेऊनही जावई स्वतःच्याच तालात नाचतोय म्हटल्यावर तिचाही संताप अनावर झाला होता. शुभदाचे दोन्ही भाऊ पुढे आले. तिच्या नवऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले; पण तो काही कोणाला जुमानत नव्हता. त्याचा संताप, राग वाढतच चालला होता. अखेर इतका वेळ शांत उभ्या असलेल्या शुभदाने तोंड उघडलं,

“आई, दादा.. जाऊ द्या त्यांना. थांबवू नका. मलाच त्यांच्यासोबत राहायचं नाही. मीच तो उंबरठा कायमचा ओलांडून आलेय. जाऊ दे त्यांना.”

शुभदाचं बोलणं ऐकून तिच्या नवऱ्याचा जळफळाट झाला. आई आणि दोघे भाऊ स्तब्ध झाले आणि तो पाय आपटत तिथून निघून गेला. तो गेल्यावर शुभदाने आईला आणि आपल्या भावांना सारी कर्मकहाणी सांगितली.

“आई, त्यांना माझ्यावर संशय आहे.”

“म्हणजे?”

आईने विचारलं.

“माझ्या चारित्र्यावर सारखं बोट ठेवलं जातं. माझ्या वागण्यावर लांच्छन लावलं जात होतं. सतत उठता बसता ते आणि त्यांच्या घरचे टोमणे मारत असतात. घालुनपाडून मला बोलत असतात. कोणाशी बोलू देत नाहीत. घरात कोंडून ठेवतात. चार चार दिवस तर कोणाला माझं साधं नखही दिसत नाही. आई, त्यांनी मला कधीच बायको म्हणून वागवलं नाही. सारखं गुलामासारखं राबवत राहिले. आई, मी कंटाळून गेलेय गं. सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं म्हणून मी ते माझं नवऱ्याचं घर कायमचं सोडून परत आलेय. आता मी तिकडे कधीच जाणार नाही.”

शुभदाने रडत रडत आपला निर्णय घरच्यांना सांगितला.

“पण शुभा, तुला आपली परिस्थिती माहित आहे ना? पूर्वीचे दिवस गेलेत बाळ आता. तुझं कसं होईल गं?”

आईने काळजीने विचारलं.

“होईल सगळं ठीक. मी कोणाला त्रास देणार नाही. माझं माझं कष्ट करून दिवस काढेन. कोणावर अवलंबून राहणार नाही.”

शुभदा निक्षुन म्हणाली. शुभदाचा खाचखळग्यांनी भरलेला प्रवास सुरू झाला. सुरुवातीला बऱ्या वागणाऱ्या भावजया हळूहळू राग राग करू लागल्या. घरातली सर्व कामे तिच्याकडूनच करवून घेऊ लागल्या. नवऱ्याने सोडून दिलं म्हणून सारखं सुनावू लागल्या.

“तो सोडून गेला आणि आता आमच्या डोक्याला ताप झालाय. आता आयुष्यभर पोसा यांना. इथे आमचीच पोटं आम्ही कशीबशी भरतो त्यात आता अजून यांची भर.. आजूबाजूच्या बायकांची बोलणी पण आम्हालाच ऐकून घ्यावी लागतात. हिला काय फरक पडतोय? ही येऊन बसलीय आमच्या छातीवर मूग दळायला.”

शुभदा निमूटपणे सारं सहन करत होती. शुभदाच्या आईलाही काही बोलता येत नव्हतं. मुलीची बाजू घेतली की, दोघी सुना भांडायला उठायच्या. आपल्या नवऱ्याकडे तक्रार करायच्या. बायकोपुढे काहीच चालत नसल्याने मुलंसुद्धा मूग गिळून गप्प बसायचे. आईला ठाऊक होतं, नवऱ्याला सोडून माहेरी येण्याचा निर्णय तिने घेतला, त्याचवेळीस दुःखाच्या प्रवासाला तिची सुरुवात झाली होती. त्या दोघींच्या जाचापासून तिची सुटका व्हावी म्हणून शुभदाच्या आईने काही दिवसांकरता शुभदाला गावाकडच्या बहिणीने पाठवून दिलं. तिथे तरी काही दिवस ती सुखात, आनंदात राहील असं आईला वाटलं; पण तिथेही चित्रं काही वेगळं नव्हतं. तिच्या लाडक्या बहिणीने काही दिवस तिला सांभाळण्यासाठी नेलं आणि तिथेही तिला राबवूनच घेतलं. आपण निराधार असलो की नाती कशी बदलत जातात तिच्या डोळ्यांनी ती पाहत होती. बदलत जाणाऱ्या नात्यांचे रंग ती अनुभवत होती. पोटाची भ्रांत तिला स्वस्थ बसू देत नव्हती. गरिबीला कसलीच लाज नसते. कोणाच्याही हाताखाली राबणं इतकंच ठाऊक असतं. ‘रांधा वाढा, उष्टी काढा.’ इतकंच आयुष्य उरलं होतं. ‘नवऱ्याने टाकलेली’ हा शिक्का माथी होताच त्यामुळे समाजही विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होता. पुरुषांच्या पाशवी डसणाऱ्या नजरांचा रोज सामना करावा लागत होता. कष्ट, अवहेलना, अपमान सारं सहन करत ती जगत होती. कधी कधी एकांतात तिच्या मनात विचार यायचा.

“काय हे आयुष्य माझ्या वाट्याला आलं! कोणत्या जन्मीचे भोग? कोणत्या पापाची शिक्षा? मी नवऱ्याला सोडून आले. चुक तर केली नाही ना? नको हे असलं आयुष्य. असं उपऱ्यासारखं जगण्यापेक्षा संपलेलं बरं. असंही माझ्या असण्यानसण्याने कोणाला फरक पडणार आहे? आता असंच जगावं लागेल? सुख कधी येणारच नाही?”

स्वतःलाच पडलेल्या प्रश्नांनी शुभदा व्याकुळ व्हायची. आहे ते स्वीकारणं यापलीकडे तिच्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. तिची सुखाची आशा मावळत चालली होती; पण नशिबाने पुन्हा तिला साद घातली. दुःखाच्या आभाळाला सुखाची किनार लाभावी तसं पुन्हा जयवंतने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. जयवंत आपल्या आई बाबा आणि बहिणीसह गावी परतला. शहरात त्याने कमावलेल्या अल्पशा पुंजीतून गावाला घर बांधलं. मोठ्या दिमाखात तिथे गुलमोहरचा जन्म झाला. दोन मजल्यांचं मोठं घर उभं राहिलं. साऱ्या गावाला गुलमोहरचं अप्रूप वाटत होतं. जयवंतने घराची वास्तुशांतीची पूजा केली. साऱ्या गावाला पूजेला बोलावलं. आणि त्या पूजेला शुभदाच्या घरच्यांनाही आमंत्रण होतं. शुभदा पूजेला आली होती. इतक्या दिवसांनी जयवंतने तिला तिथे त्याच्या घरात पाहिलं होतं. तिला पूजेला आलेलं पाहून त्याला खूप आनंद झाला होता. थोड्याच वेळात जेवणाच्या पंगती उठल्या. सर्वजण जेवण करून तृप्त मनाने आशीर्वाद देऊन आपापल्या घरी परतले. निरोप देऊन जाताना मागे वळून पाहणारी शुभदा त्याला आठवत होती.

हळूहळू शुभदाच्या संसाराची झालेली वाताहत जयवंतच्या कानावर आली. ते ऐकून त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याचं मन आक्रंदत राहिलं. मोठ्या भावाशी मैत्री केली. त्याचं त्यांच्या घरी येणंजाणं वाढलं. त्याने त्यांच्या कुटुंबाला कधी आर्थिक तर कधी भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. जयवंतला शुभदाला त्याच्या मनातलं प्रेम सांगायचं होतं; पण तशी त्याला संधी मिळत नव्हती.

अखेर एक दिवस तो योग चालून आला आणि त्याने शुभदाला त्याच्या मनातली गोष्ट बोलून दाखवण्याचं ठरवलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..