व्हाईट लिली - भाग ७
©अनुप्रिया.
©अनुप्रिया.
एक दिवस शुभदाच्या घरातले सर्वजण त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. शुभदा घरात एकटीच होती. संध्याकाळ झाली तसं तिने घर झाडून घेतलं. देवापुढे दिवा लावला आणि गॅसवर चहाचं आधण ठेवलं. इतक्यात दारावर थाप पडली.
“दादा, आहात का?”
शुभदा दारापाशी आली. समोर जयवंत उभा होता.
“तुम्ही? पण दादा नाहीये. सगळे लग्नाला गेलेत. रात्री येतील.”
“अच्छा..”
शुभदाच्या उत्तरावर तो क्षणभर तिथेच थांबला. जयवंतला दाराशी घुटमळताना पाहून शुभदाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
“काही महत्त्वाचं काम होतं का दादाकडे? काही असेल तर मला सांगा मी देईन तुमचा निरोप.”
“न..नाही.. म्हणजे सहजच आलो होतो दादांना भेटायला. तसं काही विशेष काम असं नव्हतं.”
जयवंत अगदी मुश्किलीने बोलत होता.
“त.. तुझी काही हरकत नसेल तर मी काही वेळ आत बसून वाट पाहू शकतो का दादांची?”
शुभदाने होकारार्थी मान हलवून त्याला आत यायला सांगितलं. जयवंत आत येऊन खुर्चीत बसला. शुभदाने किचनमधून त्याच्यासाठी पाण्याचा तांब्या भरून आणला आणि मग थोड्या वेळाने चहा घेऊन आली. थोडीशी अवघडतच ती टेबलापाशी उभी राहिली. जयवंतने तांब्यामधलं पाणी पेल्यात ओतून घेतलं आणि थरथरत्या हातानेच पाण्याचे एक दोन घोट घेतले आणि पेला खाली ठेवणार इतक्यात तिने त्याच्या हातातून पेला आणि तांब्या घेतला आणि ती किचनमध्ये ठेवून आली.
“खरंतर यायला हवे होते एव्हाना.. एस टी मिळाली की नाही कुणास ठाऊक?”
शांतता मोडून काढायला शुभदाने चहाचा कप समोर धरत जुजबी बोलायला सुरवात केली.
“हो ना.. कुणाचं लग्न आहे म्हणालीस?”
तिच्या हातातला चहाचा कप घेत जयवंतने विचारलं.
“आमच्या मानलेल्या आत्याच्या मुलाचं.. सुरू दादा. सुरेश नाव त्याचं पण आम्ही सगळे त्याला सुरू म्हणतो.”
“हो का? अच्छा अच्छा..”
त्याने गळ्यात आलेला एक अवंढा गिळत शुभदाकडे पाहिलं. तिचे ते खोल गहिरे डोळे आणि त्यातला सलज्ज निर्विकार भाव पाहून तो नेहमीच घायाळ व्हायचा. आजही तेच होत होतं. त्याच्या तसं एकटक पाहण्याने तिच्या डोळ्यात बरेच प्रश्नं उभे राहिले होते. भानावर येत त्याने एक दीर्घ उसासा टाकत बोलायला सुरुवात केली.
“शुभा, खूप दिवसांपासून एक गोष्ट सांगायची होती तुला. मला माहित नाही, ते ऐकून कदाचित तुला राग येईल, धक्का बसेल; पण तरीही मी जे सांगणार आहे ते एकदा शांतपणे ऐकून घे.”
त्याच्या छातीची धडधड त्याच्याच कानी ऐकू जात होती. जीभ कधीही गुंडाळून घशात अडकेल की काय! असं त्याला वाटत होतं. तरीही मनाचा हिय्या करुन तो बोलू लागला.
“शुभा, तुझ्या लग्नाच्या आधीपासून मी तुला पाहत होतो. तुला ओळखत होतो. तू मात्र कधी मान वर करून कुणाकडे पाहत नसायची; पण तुला ज्या क्षणी मी पहिल्यांदा पाहिलं, अगदी त्या क्षणापासून मला तू आवडतेस. शहरातून आलो की, तुला फक्त एकदा बघण्यासाठी मी या रस्त्याला किती घिरट्या घालायचो काय सांगू तुला! असंच तुला आयुष्यभर पाहत राहावं असं वाटायचं. मी खूपदा तुला हे सगळं बोलून दाखवण्याचा विचार केला होता पण माझी कधी हिंमतच झाली नाही. आणि अशात एक दिवस तुझं लग्न ठरल्याचं समजलं. मला खूप वाईट वाटत होतं. माझं जिच्यावर जीवापाड प्रेम आहे ती माझी न होता दुसऱ्या कोणाचा तरी हात पकडून लग्नाच्या बेडीत अडकणार म्हणून माझा जीव तुटत होता; देवाचीच मर्जी असेल मी माझं दुःख मनातच ठेवलं; पण मी तुझ्यासाठी खूष होतो. तू सुखी आहेस ना! इतकंच मला वाटत होतं. पण ईश्वराच्या मनात काही वेगळं होतं. आपण पुन्हा भेटलो. मला माहित नाही तू माझ्याबद्दल काय विचार करतेस; पण मी तेव्हा न बोलण्याची चूक केली आणि तीच चूक मला आता पुन्हा करायची नव्हती. म्हणून हे सारं बोलतोय. मला समजून घेणं न घेणं ही तुझी इच्छा. मी अट्टहास करणार नाही.”
तो क्षणभर थांबला. शुभदा कमाल शांतपणे लक्ष देऊन त्याचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यांची कड पाणावली होती पण ती ते जाणवू न देण्याचा भयंकर अट्टाहास करत होती. काही क्षणांच्या शांततेनंतर त्याचे बोल तिच्या कानावर पडले.
“शुभा, माझ्याशी लग्न करशील? मी तुला आयुष्यभर साथ देईन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.. शुभा, शुभा.. ऐकतेस ना?”
“शुभा.. ए शुभा.. बाहेर ये जरा. सगळं वाणसामान आणलंय. एकदा बघून घे. काही राहिलं असेल तर आणता येईल पटकन. शुभा..”
बाहेरून जयवंतने शुभदाला आवाज दिला तशी ती भानावर आली. डोळ्यांतून वाहणारं पाणी साडीच्या पदरानं पुसलं आणि ती बाहेर येत म्हणाली,
“यादीप्रमाणे आणलंय ना? मग बरोबरच असेल. तुम्ही हातपाय धुवून घ्या. जेवण तयार आहे. वाढते तुम्हा दोघांना.”
आणि ती पिशवीतलं सामान उचलून आत किचनमध्ये घेऊन गेली. शुभदाने पानं वाढायला घेतली; पण मन अजून भूतकाळातच अडकलं होतं. जयवंतने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो प्रसंग आजही जशाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत तिच्याविषयीचं प्रेम तिला स्पष्ट दिसलं होतं. ते आठवून ती लाजली आणि गालातल्या गालात हसली. इतक्यात जयवंत हातपाय धुवून जेवणासाठी स्वयंपाकघरात आला. तिला असं एकटीला हसताना पाहून त्याने हसत तिला विचारलं,
“शुभा, काय झालं? कुठे हरवलीस? आणि अशी एकटीच काय हसतेस?”
“काही नाही.. जुन्या गोष्टी आठवल्या. तुम्ही मला लग्नासाठी विचारलं होतं. आता हसू येतंय पण तेव्हा मी किती घाबरले होते म्हणून सांगू!”
ती पुन्हा हसली.
“अच्छा ते होय.. खरं सांगू का? त्यावेळीस तुला विचारताना मीही फार घाबरलो होतो.”
तो डोळे मिचकावत म्हणाला. जयवंत पुढे काही बोलणार इतक्यात शुभदा त्याला अडवत म्हणाली,
“पुरे.. थट्टा पुरे.. आशूलाही जेवणासाठी आवाज द्या. एकत्रच बसू..”
तिच्याकडे पाहून हसत हसतच त्याने आशूला आवाज दिला. तिघेही जेवायला बसले. शुभदाच्या मनात मात्र त्याच आठवणी फिरत होत्या. जयवंतने तिला लग्नाबद्दल विचारलं आणि ती पुरती घाबरून गेली होती; पण तरीही तिने शांतपणे उत्तर दिलं होतं.
तिच्याकडे पाहून हसत हसतच त्याने आशूला आवाज दिला. तिघेही जेवायला बसले. शुभदाच्या मनात मात्र त्याच आठवणी फिरत होत्या. जयवंतने तिला लग्नाबद्दल विचारलं आणि ती पुरती घाबरून गेली होती; पण तरीही तिने शांतपणे उत्तर दिलं होतं.
“तुमचं म्हणणं मी ऐकलंय. एक काम करा, तुम्ही याबद्दल आई आणि दादाला विचारा.”
“पण तुझ्या मनात काय आहे ते तर आधी सांग ना. तुझा होकार असेल तर पुढे तुझ्या आईशी दादांशी बोलायला. तुला आवडतो का मी? कसा वाटतो मी तुला?”
शुभदाने काहीच उत्तर दिलं नाही. खरंतर तिलाही जयवंत आवडू लागला होता. त्याचा समजूतदारपणा आणि मुलखाचा भाबडेपणा भावला होता. त्याचा प्रेमळ लाघवी स्वभाव, सदा हसतमुख चेहरा, घरातल्या लोकांबद्दल त्याच्या पोटात असलेली माया.. सारं तिला आवडू लागलं होतं. जयवंतचं प्रेम तिलाही हवंहवंसं वाटत होतं; पण तिने जयवंतला अजून तरी तिच्या मनातलं काही सांगितलं नव्हतं. खरंतर त्याच्या प्रश्नाने ती बावरली होती.
“मी लगेच असं तुम्हाला सांगू शकत नाही. मला विचार करावा लागेल. मला थोडा वेळ हवाय. आणि तुमच्या घरच्यांचं काय? ते तयार होतील? एका दुसऱ्या जातीच्या, तुमच्यापेक्षा कमी कुळातल्या मुलीला ते सून म्हणून स्वीकारतील? नाहीतर आपण उगी ‘मनात मांडे आणि पदरात धोंडे.’ असं व्हायचं. तुम्ही आधी तुमच्या घरी विचारा आणि नंतर माझ्या..”
शुभदाच्या प्रश्नांनी जयवंतच्या डोक्यात प्रकाश पडला.
“तू बरोबर बोलतेयस. घरी सांगितलंच नाही; पण ते का नकार देतील? तू सुंदर आहेस. संस्कारी आहेस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते माझ्या सुखाचाच विचार करतील. माझ्या सुखापेक्षा त्यांना अजून वेगळं काय हवंय? माझे आई बाबा नक्कीच हो म्हणतील.”
जयवंत मोठ्या विश्वासाने म्हणाला.
“एका नवऱ्याने टाकलेल्या बाईला सून म्हणून स्वीकारतील? तुम्ही अविवाहित आहात. तुम्हाला कोणीही आनंदाने आपली मुलगी देईल. तुमच्या जातीतली, तोलामोलाची, तुमच्या घराण्याला शोभेल अशीच मुलगी ते पाहतील. ते मला का स्वीकारतील?”
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा