व्हाईट लिली - भाग ८
©अनुप्रिया.
©अनुप्रिया.
शुभदाच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं. जयवंत क्षणभर थांबला. तिच्या बोलण्याने तोही विचारात पडला.
“खरंच आई बाबा परवानगी देतील? शुभदाला स्वीकारतील? का नाही स्वीकारणार तिला? माझ्या सुखाचा, आनंदाचा ते नक्की विचार करतील. आणि नाही केला तर?”
जयवंतला चिंतित झाला. काही वेळ असाच शांततेत गेला. ती आत जायला निघाली. इतक्यात जयवंतने तिचा हात पकडला आणि म्हणाला,
“शुभा, माझं तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे. माझ्या घरच्यांनी जरी नाकारलं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या पूर्वायुष्याचे पडसाद आपल्या आजच्या आयुष्यावर कधीच पडणार नाहीत. कोणी जरी नसलं तरी मी असेन शुभा.. कायम तुझ्या सोबत असेन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..”
“शुभा.. ए शुभा.. पुन्हा हरवलीस की काय? आमटी वाढ आशूला.”
जयवंतने शुभदाला आवाज दिला. ती भानावर येत हसून म्हणाली,
“हो वाढतेय.. तुम्हाला वाढू?”
त्याने होकारार्थी मान डोलावली. तिने दोघांच्या वाटीत आमटी वाढली.
शुभदा अजूनही भूतकाळातल्या गोष्टीत रमली होती.
“त्याने आजपर्यंत त्याचा शब्द पाळलाय. कधीच माझी साथ सोडली नाही. आयुष्यात किती कठीण परिस्थिती आली तरी त्याने हार मानली नाही. आई वडिलांचा, नातेवाईकांचा विरोध पत्करून तो माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. प्रसंगी स्वतःचं राहतं घरही सोडावं लागलं. आईवडिलांनाही सोडावं लागलं. गुलमोहरसारखा टोलेजंग वाडा सोडून भाड्याच्या एका छोट्याश्या खोलीत नव्याने संसार थाटावा लागला पण तो डगमगला नाही. गुलमोहरच्या दारातून अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं होतं. त्याच वाड्यात पुन्हा थाटामाटानं, सन्मानानं घेऊन आला. त्या वाड्याच्या कुलवधूचा मान मला परत मिळवून दिला. मी खरंच किती नशीबवान आहे असा जोडीदार मला मिळाला!”
“कसला विचार करतेस आई?”
आईला विचारात मग्न असलेलं पाहून आशुतोषने प्रश्न केला.
“काही नाही जुन्या आठवणीने ताज्या झाल्या.”
“कोणत्या?”
“आमच्या लग्नाच्या वेळच्या.”
जयवंतकडे पाहत शुभदाने हसून उत्तर दिलं. तोही हसला.
“आशू, तुझी आई फार धीराची बघ. सगळं सहन केलं. सर्वांचा सासुरवास भोगला पण कधी कसलीच तक्रार केली नाही. आपली अवनी ताई झाली तेव्हा तर तुझ्या आजी आणि आत्याने गुलमोहरमधून बाहेर काढलं होतं. छोट्याश्या भाड्याच्या घरात राहिलो. छोटी मोठी कामं करून कसंबसं जगत राहिलो. त्याच भाड्याच्या घरात अदिती आणि तुझा जन्म झाला. याच गुलमोहरच्या गेटबाहेर दारात तुझी आई आणि तुम्हा तीन मुलांना घेऊन भर पावसात उभी होती. कोणाला दया नव्हती आली. तिने हे सारं कसं सहन केलं हे तिचं तिलाच माहित! तिच्याजागी दुसरं कोणी असतं तर कधीच मला, हे घर, हा संसार सोडून निघून गेली असती. तुझी आई आहे म्हणून हे घर आहे. मी आहे, आपण आहोत आणि या घरात सुख आहे. तुझ्या आईच्या रूपाने इथे लक्ष्मीचा वास आहे.”
हे सारं बोलताना जयवंतचा आवाज कापरा झाला.
“पुरे, पुरे.. किती ते कौतुक! बस झालं.. आशूसमोर उगीच काहीतरी बोलायचं.”
शुभदा जयवंतकडे लटक्या रागाने पाहत म्हणाली. त्याच्या कौतुकाने तिच्या गालावर लाजेची लाली पसरली. आशुतोष आपल्या आईबाबांचा प्रेमळ संवाद अगदी मनापासून ऐकत होता.
“किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर! अगदी मेड फॉर इच अदर.. असं नितांत प्रेम करणारं माणूस मिळायला नशीब लागतं. नाहीतर असतात काही काही माझ्यासारखे कमनशिबी..”
आशुतोष उदास झाला. ही गोष्ट शुभदाच्या लक्षात आली. जयवंत आणि त्याच्याकडे पाहत ती म्हणाली,
“प्रत्येकाच्या आयुष्याचा जोडीदार ईश्वराने आधीच निवडलेला असतो. कार्मिक कनेक्शन म्हणतात त्याला.. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती उगीच विनाकारण आलेली नसते. त्यामागेही काही कारणं असतात; त्याचप्रमाणे आपल्याला सोडून जाणारी व्यक्तीही वाईट असतेच असं नाही. माणसं कधीच वाईट नसतात. वेळ, परिस्थिती वाईट असते. कदाचित सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा आपल्या सोबतचा प्रवास तिथपर्यंतच होता. तितकीच साथ असावी. कदाचित जन्मोजन्मीचा जोडीदार वेगळाच कोणीतरी असेल. आयुष्याच्या प्रवासात अनेक प्रवाशी भेटत जातात, प्रत्येकजण आपापल्या थांब्यावर उतरून जातात. जो शेवटपर्यंत सोबत असतो तोच आपला आयुष्यभराचा साथीदार.. हो ना?”
“अगदी बरोबर..”
जयवंतने तिच्या बोलण्याला हसून दुजोरा दिला. आई सगळं त्याच्यासाठीच बोलतेय हे आशुतोषला चांगलंच कळत होतं; पण तो आईला काहीच बोलला नाही. शुभदा त्याच्याकडे पाहत होती.
“कसं होईल या मुलाचं? बरोबरीचे सगळे मित्र कामाला लागलेत. लग्न करून सुखाने संसार करताहेत. कोणाला तर मुलंही झालीत; पण माझा आशू? अजून त्याच्या कमवण्याचा काही पत्ता नाही. चांगली नोकरी लागली होती पण तीही याने सोडून दिली. नंतर नंतर तर तिथले कॉलही घेत नव्हता. काय करावं खरंच कळत नाही.”
शुभदा त्याच्या विचाराने चिंतीत झाली. जयवंतने तिच्या मनातला भाव अचूक ओळखला होता. म्हणूनच मग विषय बदलण्यासाठी जयवंत म्हणाला,
“आशू, मगाशी अवनीताईचा कॉल आला होता. तुझं भारी कौतुक करत होती.”
“का? काय झालं? काय म्हणत होती ताई?”
आशूतोषने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
“अरे, ताई तुझ्या कवितेचं कौतुक करत होती. तू कविता करतो हे माहित होतं आम्हाला; पण इतक्या छान करतोस की तुझ्या कवितेचे खूप फॅन झालेत म्हणे! तू आम्हाला कोणालाच दाखवल्या नाहीस. तिने तुझी कविता सोशल मीडियावर वाचली आणि तिने लगेच मला कॉल करून सांगितलं. भारी नां! सगळे तुझं कौतुक करताहेत. मला खूप छान वाटलं ऐकून..”
जयवंत आणि शुभदा दोघांच्याही चेहऱ्यावर मुलाच्या कौतुकाचा आनंद पसरला. जयवंतची छाती अभिमानाने फुलून गेली. पण शुभदा मात्र कौतुक केल्यावर त्याच्या कामाचा विषय काढत म्हणाली,
“कविता, कथा, लिखाण वगैरे सगळं ठीक आहे आशू.. पण आता कामाचं पाहिलं पाहिजे ना? इतर आयांसारखं मी तुला कधीच फोर्स नाही केला; पण आता तुला तुझी जबाबदारी कळायला हवी ना? बाबा रिटायर झाले. ताईचंही लग्न झालं बेटा, आता तुझ्यावर सगळी मदार आहे. आपली सेविंग इतकी नाही की आपण वर्षानुवर्षे त्यावर जगू शकू. इतका हुशार आहेस. चांगला सुशिक्षित आहेस; पण जोवर कमावता होणार नाहीस तोवर या हुशारीचा काही उपयोग नाही. आता आम्ही थकलो रे.. आता तू कामाला लागलास की तुझं लग्न लावून आम्हाला मोकळं होऊ दे. हे बाकीचे छंद तू जोपासत रहा कायम; पण आता तरी आमच्यासाठी नको पण किमान तुझ्या भविष्यासाठी एखादी छोटी मोठी नोकरी बघ. आणि मिळाल्यावर टिकून काम कर. आधीच्या दोन नोकर्यांसारखं नको करू. सगळंच आपल्या मनासारखं नाही होणार ना बाळा.. कुठेतरी आपल्याला झुकतं घ्यावं लागणारच. तू कितीही बरोबर असलास तरी जग आपल्यानुसार चालत नाही ना?"
तिच्या बोलण्याने आशुतोष नेहमीप्रमाणे आताही भावुक झाला; पण पुढे काहीच नाही. नेहमीप्रमाणे शांत बसला. हल्ली शुभदाही त्रागा करू लागली होती. आशुतोषच्या मित्रांच्या लग्नाच्या पत्रिका घरी आल्यावर तर ती त्याच्यावर अजूनच चिडायची पण आशुतोष मात्र जसाच्या तसा. ढिम्म.. आजही त्याने नेहमीप्रमाणे आईचा ओरडा खाल्ला; पण त्याही पेक्षा तो त्या स्वप्नाचा विचार जास्त करत होता. अलीकडे त्याला त्याचा भूतकाळ स्वप्नामध्ये दिसत. कधी तो शाळेत पुरस्कार घेताना तर कधी कॉलेजमध्ये परीक्षा देताना दिसत असे. त्याने त्याच्यापरीने अर्थ लावायचा प्रयत्न केला पण व्यर्थ! आजही तो तेच करत होता. स्वप्नात येणारी ती मुलगी कोण असेल? तो आठवण्याचा प्रयत्न करत होता; पण स्वप्नातून बाहेर आल्यावर तो चेहरा मात्र धूसर व्हायचा. हिशेब काही केल्या लागत नव्हता.
“च्यायला, काय वाढून ठेवलं आहे नशिबात काय माहीत?"
असं स्वतःशीच पुटपुटत तो पलंगावर जाऊन आडवा झाला. आणि मोबाईल पाहू लागला. फेसबुकवर पोस्ट चाळत असताना अचानक समोर एक जाहिरात दिसली.
‘ज़िंदगी से नाराज़ हो? उलझनें बढ़ती जा रही हैं? जानिए क्या कहते हैं आपके सितारे एक क्लिक पे।’
जाहिरात वाचून तो हसला पण का कुणास ठाऊक पुढच्या क्षणी त्याने त्यावर क्लिक केलं. ती राशिभविष्य सांगणारी साईट होती. त्याने जन्मतारखेनुसार आपल्या राशीचे भविष्य पाहिलं. आणि ते वाचून तो किंचित चक्रावलाच.
“आनेवाला एक साल आपकी ज़िंदगी में भारी उथलपुथल लानेवाला है।”
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा