व्हाईट लिली - भाग ९
©अनुप्रिया.
©अनुप्रिया.
तो मेसेज वाचून त्याचं त्यालाच स्वतःचं हसू आलं.
“अजून काय उलथापालथ व्हायची बाकी आहे? सगळं आयुष्यच कठीण होऊन बसलंय. रागिणी मला सोडून गेली. त्या आघाताने मी आधीची नोकरीही सोडून दिली. कशीबशी ताईच्या मदतीने मिळालेली दुसरी नोकरीही मी घालवून बसलो. आणि आता आईवडिलांच्या जीवाला घोर झालोय. नुसतं ‘खायला कार आणि धरणीला भार’ अशी माझी अवस्था झालीय. काय उरलंय आयुष्यात आता? काहीच नाही.”
आशुतोष खिन्नपणे पुटपुटला. स्वतःचं राशीभविष्य वाचून तो काहीसा विचारात पडला होता. मागच्या नोकरीत झालेलं राजकारण पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. इतका हुशार, मनमिळाऊ स्वभाव, कामात तत्पर, नवीन शिकण्याची आवड असूनही प्रत्येकाच्या नजरेत तो टार्गेट बनत गेला. चुकीच्या गोष्टी घडल्या की, त्याला मनस्ताप व्हायचा. त्याची चिडचिड व्हायची. तिथले छक्केपंजे डावपेच त्याला आवडायचे नाही. वरिष्ठ अधिकारी मुद्दाम त्रास द्यायचे. कामात खुरापत काढून विनाकारण त्याच्यावर रागवायचे. साहेबांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची चांदी होती. आशुतोषला ते जमत नसे. त्यामुळे त्याला रोजच ऑफिसमध्ये ओरडा खावा लागत होता. ऑफिसमधल्या या वातावरणाला आणि रोजच्या कटकटीला आशुतोष कंटाळला आणि एक दिवस मागचा पुढचा कसलाही विचार न करता तडक घरी निघून आला. दुपारी भर उन्हात त्याला घरी परत आलेलं पाहून शुभदाच्या मनात शंकेची पाल चुकचूकली.
“काय रे बाळा, आज लवकर घरी आलास? तब्येत ठीक आहे ना?”
“हो.. ठीक आहे. तब्येतीला काय धाड भरणार आहे? लोकांनीच वैताग आणलाय नुसता! मी नोकरी सोडलीय आई..”
“काय?”
शुभदा जवळजवळ किंचाळलीच. आशुतोषने ऑफिसमध्ये घडलेला सारा वृत्तांत सांगितला. शुभदा काळजीत पडली.
“काय बोलावं आता या मुलाला! सरळ नोकरी सोडून घरी निघून आला. हातात दुसरा जॉब नसताना हे असं पाऊल कसं काय उचलू शकतो हा? आता पुन्हा नवी नोकरीच्या शोधात वणवण करा. खस्ता खा.. हे रामेश्वरा! काय आहे माझ्या लेकाच्या नशिबात तुलाच ठाऊक!”
शुभदा रडवेल्या स्वरात म्हणाली. तिच्या बोलण्याने आशुतोषही हळवा झाला.
“काय चुकीचं बोलतेय आई? खरंच तर आहे. बाबांच्या निवृत्तीनंतर एक वर्षे अवनीताईने छान घर सांभाळलं. स्वतःचं शिक्षण स्वकष्टाने पूर्ण केलं होतं. बाबांना घर चालवायला तीच आर्थिक मदत करत होती. अदितीताई आणि माझ्याही शिक्षणाचा भार तिनेच उचलला. ती घरात होती तेंव्हा माझा खिसा कायम पैशाने भरलेला असायचा. ती कधीच मला काही कमी पडू देत नव्हती. स्वतःचं लग्नही तिने लांबणीवर टाकलं होतं. तेही फक्त मी स्थिरावलो नव्हतो म्हणूनच ना? विशालभावोजींना तसं तिने आधीच सांगितलं होतं. लग्नानंतरही तिने सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी, नियम मान्य केले. किती समजूतदार होती ताई! माझी ताई, माझी आई झाली. माझी मैत्रीण झाली. विशालभावोजींशी लग्न झाल्यापासून ती अजूनच जास्त आईसारखी वाटतेय मला.”
आशुतोष अवनीताईच्या विचारांनी व्याकुळ झाला. घरात तिने जेंव्हा विशालबद्दल सांगितलं; तेंव्हाचा तो दिवस त्याला आठवला. दोन वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. एकमेकांच्या प्रेमात होते. विशाल तर त्याक्षणीच लग्न करायला तयार होता; पण ताईने वेळ घेतला. घरची आर्थिक परिस्थिती तिला चांगलीच ठाऊक होती. तिच्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे. तिची बाबांना आर्थिक मदत होते हे तिला ठाऊक होतं. आशुतोषला चांगल्या पगाराची नोकरी लागेल आणि तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यास सक्षम होईल मग आपलं लग्न करता येईल अशा विचाराने ती विशालला थांबण्यास सांगत होती; पण आता विशालच्या घरूनही त्याच्या लग्नाबद्दल विचारणा होऊ लागली. उपवर मुलींची चांगली स्थळं सांगून येऊ लागली. आता मात्र त्याचा नाईलाज झाला आणि त्याने अवनीला त्याच संध्याकाळी समुद्रकिनारी भेटायला बोलावलं. विशाल आधीच येऊन अवनीची वाट पाहत समुद्रकिनारी बसला होता. समोर अथांग पसरलेला, उधाणलेला समुद्र.. सूर्य मावळतीला निघालेला.. समुद्राच्या पाण्यावर मावळतीची केशरी किरणं पसरलेली.. अंगावर उडणारे खारे तुषार.. अंगाला झोंबणारा थंडगार वारा जणू त्याच्याशी हितगुज करू पाहत होता. ठरलेल्या वेळेत अवनी नेहमीच्या जागी पोहचली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याचा चेहरा तिला काहीसा गंभीर वाटला. अवनीने काळजीने त्याला विचारलं,
“काय झालंय? असं अचानक भेटायला बोलावलंस? काही टेन्शन आहे का?”
विशालने दीर्घ श्वास घेतला आणि थेट मूळ मुद्द्याला हात घालत बोलायला सुरुवात केली.
“अवनी, आता आपल्याला आपल्या घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगायला हवं. किती दिवस असं त्यांच्यापासून लपवून ठेवणार?”
“का? काही झालंय का? विशाल, तुला माझ्या घरची परिस्थिती चांगली माहित आहे. जोपर्यंत आशूला नोकरी लागत नाही. तो घरची जबाबदारी घेण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत मी लग्न कसं करू? माझं लग्न झालं तर माझ्या बाबांचं कसं होईल? ते एकटे कसं घर सांभाळतील? त्यांना सारा खर्च पेलावेल का? समजून घे थोडं..”
अवनी विशालकडे पाहून म्हणाली.
“पण अवनी, आता माझा नाईलाज आहे. घरच्यांनी माझ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केलीय. आता त्यांना सगळी परिस्थिती, आपलं नातं मला सांगावंच लागेल. आणि आता आपणही किती दिवस थांबायचं? वयसुद्धा हळूहळू सरत जाईल मग कधी लग्न करणार? कधी आपल्या संसाराला सुरुवात होणार? तुच विचार कर. आता आपल्या घरच्यांना सांगण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मी अजून थांबू शकत नाही गं. आणि मी जरी थांबण्याचा विचार केला तरी माझ्या घरचे आता मुळीच थांबणार नाहीत.”
विशालने त्याची अडचण सांगितली. अवनी विचारात पडली.
“ठीक आहे. सांगूया मग घरी.. आपल्या नात्याबद्दल सांगितल्यावर कमीतकमी आपल्या घरच्यांचं आपल्यासाठी स्थळं पाहणं तरी थांबेल. पाहूया पुढे जे होईल ते होईल.”
“काय होणार आहे? आपण लग्न करणार आहोत हे फायनल आहे. काही झालं तरी.”
अवनीच्या बोलण्यावर विशाल निक्षुन म्हणाला. अवनी त्याचा हात हातात घेत म्हणाली,
“हो, आपलं लग्न नक्की होईल; पण आपल्या घरच्यांच्या संमतीनेच. माझे आईबाबा, अदिती आशू यांना तू पसंत पडलास तरच पुढे जाऊ नाहीतर…..”
“नाहीतर काय? लग्न करणार नाहीस? मला सोडून जाशील?”
विशालने घाबरून प्रश्न केला.
“नाही मुळीच नाही. मी कधीच तुला सोडून जाणार नाही. आणि मला खात्री आहे आपल्या घरचेही आपल्या लग्नाला तयार होतील. उलट आपण समजावून सांगितलं तर काही महिन्यांचा आपल्याला अवधीही देतील. त्यामुळे आशूला नोकरी शोधण्यासाठी वेळही मिळेल.”
अवनीच्या बोलण्यात तथ्य होतं. त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगायचं यावर दोघांचं एकमत झालं. आणि थोडा वेळ बसून गप्पा मारल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतले. घरी आल्यावर रात्री सर्वांची जेवणं उरकल्यावर सर्वजण बाहेर हॉलमध्ये बसले होते. अवनीताईने विशालविषयी सांगितलं. सर्वजण शांत झाले. आशुतोषच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या.
“अवनीताईला कोणीतरी आवडलंय. ती लग्न करू इच्छिते याचा आनंद मानावा की, प्रत्येकवेळी मला जपणारी, माझ्या चुका पाठीशी घालणारी, आईच्या मायेने काळजी घेणारी माझी ताई आपल्याला सोडून जातेय म्हणून दुःख करावं काहीच कळत नाहीये. ताई, मी तुझ्याशिवाय कसा राहू गं?”
आशुतोषचा गळा भरून आला. तो स्तब्धपणे तिच्याकडे, कधी आईबाबांकडे आळीपाळीने पाहू लागला. अवनी बोलायला सुरुवात केली.
“आई, बाबा.. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तो मला जरी आवडत असला तरी तो तुम्हां सर्वांना पसंत पडणं गरजेचं आहे. तुमच्या सर्वांचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.”
अवणीसाठी आईबाबांबरोबरच आशुतोष आणि अदितीचा विचारही तितकाच महत्वाचा होता. सर्वचजण विचारात पडले. अवनीने मोबाईलमधला विशालभावोजींचा फोटो दाखवला आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती दिली. एक दोन दिवसांत विशालला घरी बोलवण्यात आलं. तो सर्वांना आवडला होता. दुसऱ्या दिवशी शुभदा, जयवंत, आशुतोष, अवनी आणि अदिती त्यांच्या घरी भेटायला गेले. विशालच्या घरच्यांनी त्यांचं छान स्वागत केलं. विशालचे आईबाबा, त्यांचे दोन मोठे भाऊ त्यांच्या बायका, त्यांची मुलं आणि विशाल असं मोठं एकत्र कुटुंब होतं. चहापाणी, नाष्टा झाल्यावर विशालच्या बाबांनी बोलायला सुरुवात केली.
पुढे काय होतं? विशालच्या घरच्यांना अवनी आवडेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा