Login

व्हाईट लिली - भाग १०

व्हाईट लिली.. एक रहस्यमय प्रेमकथा..
व्हाईट लिली - भाग १०
©अनुप्रिया.


सर्वांचं लक्ष विशालच्या बाबांकडे होतं.

“मुलांनी एकमेकांना पसंत केलंय म्हटल्यावर आपण काय बोलणार! आपल्या पसंतीचा प्रश्नच येत नाही. तरीही आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आणि तुम्हाला आमचा विशाल आवडला असेलच ना? मग लवकरच लग्नाचा बार उडवून टाकू. कशाला वेळ दवडायचा?”

“लगेच लग्न? अरे पण अजून आशुच्या नोकरीचा थांगपत्ता नाही. माझं घर कसं चालेल? बाबांना एकट्याला सारं कसं झेपेल? विशाल, काहीतरी बोल ना प्लिज..”

अवनीने विशालकडे काकुळतीने पाहिलं. विशाललाही अवनीच्या मनात चाललेली खळबळ समजत होती. अवनीच्या मनात आशुतोषच्या नोकरीचाच विषय घोळत होता. विशालने तिला नजरेनेच शांत राहण्यास सांगितलं. इतक्यात जयवंत आनंदाने म्हणाला,

“अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आपण लवकरात लवकर दोघांचं लग्न लावून देऊ. ते म्हणतात ना! ’मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी.’ काय जावईबापू खरं आहे ना? अवनी बेटा..”

जयवंतने हसून दोघांकडे पाहिलं. दोघेही लाजून गोरेमोरे झाले. दोघांनीही एकमेकांकडे हसून पाहिलं आणि लाजून खाली मान घातली. इतक्यात विशालचे बाबा म्हणाले,

“बरं का जयवंतराव, रामेश्वराच्या कृपेनें आपल्या घरात कशाचीही कमतरता नाही. आमच्या घरात तुमच्या मुलीला इथे कसलीच चणचण भासणार नाही. पैसाअडका, अन्नपाणी, कपडेलत्ता, दागदागिने, हौसमौज कसलीच कमी जाणवणार नाही. लक्ष्मीमातेच्या कृपेनें आपल्याकडे भरपूर आहे. आपल्या सात पिढ्या बसून खातील इतकी आपली प्रॉपर्टी आहे. तुमच्या मुलीला नोकरीसाठी कधीच वणवण करावी लागणार नाही. घराबाहेर जावं लागणार नाही. तिने फक्त घर, पाहुणे माणसं, रितीरिवाज, परंपरा इतकंच सांभाळायचं. घरातल्यांची काळजी घ्यायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरच्या सुना ड्रेस घालत नाहीत फक्त साडीच नेसतात. तुमच्या मुलीलाही लग्नानंतर ड्रेस घालता येणार नाहीत तर तिला दररोज साडीच नेसावी लागेल. हवंतर अशी आमची अट आहे समजा.”

विशालच्या बाबांचं बोलणं ऐकून जयवंत, शुभदा, अदिती आणि आशुतोष आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. अवनी मात्र शांत बसून होती. थोडा वेळ असाच शांततेत गेला. थोडा धीर करून आशुतोष त्यांना म्हणाला,

“आणि ताईचीच नोकरी करण्याची इच्छा असेल तर? तिलाच साडी नेसायची नसेल तर? आजकालच्या मुली कुठे साडी नेसून घरात बसून राहतात? आपलं कुटुंब सांभाळून कितीतरी मुली आपलं करियर छान सांभाळतात. नोकरीचं शिवधनुष्य छान पेलतात. त्यात काय हरकत आहे?”

“इतर मुलींचं आम्हाला काही माहीत नाही; पण आमच्या घरच्या सुना नोकरी करत नाहीत. आणि त्यांना कायम साडीच नेसावी लागते. बघा म्हणजे तुम्ही नीट विचार करून सांगा. आता लगेच होकार कळवावा असं काही नाही. आम्हाला काही घाई नाही.”

असं म्हणत विशालच्या बाबांनी त्यांचं बोलणं आटोपतं घेतलं.

“हो, चालेल.. घरी गेल्यावर एकदा आम्ही सर्वजण एकत्रपणे चर्चा करतो आणि एकदोन दिवसांत कळवतो तुम्हाला. चालेल ना?”

जयवंतने त्यांच्याकडे पाहत प्रश्न केला. त्यांनीही होकारार्थी मान डोलावली. थोडावेळ गप्पा मारून जयवंत आणि शुभदा यांनी विशालच्या कुटुंबियांचा निरोप घेतला आणि आपल्या मुलांना घेऊन ते आपल्या घरी आले. घरी आल्यावर सर्वजण फ्रेश होऊन बसले. सर्वजण गप्पच होते. ती शांतता भंग करण्यासाठीच शुभदाने अवनीचा विषय काढला. अवनीकडे पाहत तिने विचारलं,

“अवनी, तुला विशालच्या बाबांचं म्हणणं पटलंय का? आणि इतक्या मोठ्या कुटुंबात तुझा निभाव कसा लागेल?”

शुभदाची काळजी सर्वांनाच पटत होती. इतक्यात आशुतोषनेही प्रश्न केला.

“ताई, आईची काळजी योग्यच आहे. हा कसला हट्ट? त्यांचा सुनांनी ड्रेस न घालण्याचा आणि कम्पलसरी साडी नेसण्याचा निर्णय तुला मान्य आहे? तू लग्नानंतर खरंच नोकरी सोडून देणार आहेस का? अरे, कोणत्या जगात वावरताहेत ते? मुलींनी ड्रेस घालणं, नोकरी करणं किती साधी गोष्ट आहे ही.. त्याचा इतका बाऊ का करताहेत? मुली नोकरी फक्त पैसे मिळवण्यासाठीच करतात का? त्यांचीही काही स्वप्नं, ध्येय असतीलच ना?”

आशुतोषला विशालच्या बाबांचं म्हणणं अजिबात पटलेलं नव्हतं. त्याचा स्वर काहीसा चढलेला होता.

“बरोबर आहे आशुचं.. किती जुन्या विचारांची माणसं आहेत ती! ताई आपली शहरात वाढलेली, शिकली सवरलेली.. नोकरी करणारी. तिथे गावात कशी राहणार? इतकं मोठं एकत्र कुटुंब.. ताई, कसा निभाव लागेल? नको ताई.. तू पुन्हा एकदा विचार कर..”

अदितीनेही आशुतोष बोलण्याला दुजोरा देत तिचं मत मांडलं. खरंतर ताईच्या काळजीने तिचं मन व्याकुळ झालं होतं. डोळ्यातून आपोआप गंगायमुना वाहू लागल्या होत्या. जयवंतने मात्र एक नजर अवनीकडे पाहिलं. ती सर्वांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होती. मनात मात्र विचारांचं वावटळ घुमत होतं. जयवंत तिच्या शेजारी येऊन बसला. मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत त्याने तिला विचारलं,

“अवनी बाळा, तू सांग. तुझं काय म्हणणं आहे? अशा परिस्थितीतही तुला विशालशी लग्न करायचं आहे का?”

त्याच्या प्रश्नावर डोळ्यात आलेलं पाणी डोळ्यातच अडवत तिने बोलायला सुरुवात केली.

“बाबा, विशालने मला याआधीच त्याच्या घरच्या लोकांची कल्पना दिली होती. नोकरी सोडावी लागेल. त्याच्या आईवडीलांसमोर साडीत राहावं लागेल हे त्याने मला आधीच सांगितलं होतं. आणि मी ते सारं मान्य केलंय. माझ्यासाठी तो महत्वाचा. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी काही गोष्टींना मुरड घालावी लागली तर काय हरकत आहे? तो जर आयुष्यात राहणार असेल तर मग बाकीच्या गोष्टींनी काय फरक पडतो? मला फक्त आशुची काळजी वाटते. बाबा, तुमची काळजी वाटते. मी गेल्यावर बाबा तुम्ही एकटे कसं सांभाळून न्याल? म्हणूनच मी विशालला अजून थोडं थांबूया असं म्हणत होते.”

अवनीची काळजी तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होती.

“बेटा, तू आमची काळजी करू नकोस. तुला विशाल आवडलाय ना? झालं तर मग.. आणि त्यांचे सगळे नियम अटी तुला मान्य असतील तर आम्ही का हरकत घ्यावी? असंही बाळा, आमच्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी तू लग्न करण्यास खूप वेळ घेतला आहेस. अजून किती दिवस तू त्याला असं ताटकळत ठेवणार आहेस? तुलाही तुझं आयुष्य आहेच की.. तू अजिबात टेंशन घेऊ नकोस. आशू आज ना उद्या नोकरीला लागेलच. मग सगळं ठीक होईल. तुम्हा दोघी मुलींची लग्नं झाली आणि तुम्ही तुमच्या घरी सुखाने संसार कराल यापेक्षा वेगळं काय हवंय आम्हाला?”

हे बोलताना जयवंतचा स्वर कापरा झाला होता. त्याने भरल्या डोळ्याने अवनीकडे पाहिलं. तीही पटकन त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते.

“किती गुणी आहे माझी ताई! अजूनही तशीच माया करते. तिच्या सासरी भेटायला गेलो तरी आजही शे पाचशे रुपये माझ्या खिश्यात कोंबतेच. किती प्रेम करते सर्वांवर! विशालभावोजींसाठी तर स्वतःच्या इच्छा, आकांक्षा सारं बाजूला ठेवलं. स्वतःच्या आवडीनिवडीना मुरड घातली. तिच्यासाठी तिचं प्रेम महत्वाचं होतं. त्या प्रेमासाठी ती सारं सोसायला तयार होती. विशालभावोजींनीही त्यांच्या परीनं तिला सगळी सुखं देण्याचा प्रयत्न केला. प्रेम असावं तर असं! नाहीतर..”

पुन्हा एकदा आशुतोषच्या जखमेवरची खपली उडाली. जखम वाहू लागली. बाबांच्या सांगण्यावरून अवनी लग्नाला तयार झाली. जयवंतने चारचौघात शोभेल असं अवनी आणि विशालचं लग्न लावून दिलं. जयवंतच्या निवृत्ती नंतर वर्षभरातच अवनीचं लग्न झालं. ती सासरी निघून गेली. तिच्या पाठोपाठ अदितीचंही लग्न झालं. प्रशांत आणि आदितीचा संसार सुरू झाला. सर्वजण आपापल्या आयुष्यात खूष होते. सगळं छान सुरळीत होतं; पण एक तेवढा आशुतोष काही अजून स्थिरावला नव्हता. अवनीच्या लग्नानंतर निव्वळ बाबांची पेंशन आणि बँकेतील काही ठेवी यावर घर चालू होतं आणि याची आशुतोषलासुद्धा कल्पना होती. कुठेच काही घडत नव्हतं. आणि आता तर लॉकडाऊन सुरू झाला होता. कामावर असणाऱ्याना कामावरून काढून टाकण्यात येत होतं तर मग त्याच्या सारख्या नवशिक्याना कोण चटकन नोकरी देईल? रोज रात्री उशिरापर्यंत जागरणं करणं सकाळी उशिरापर्यंत बिछान्यात लोळत पडणं नित्याचं झालं होतं.

“काय करावं काहीच समजत नाहीये. आईचे कडवे बोल ऐकून घेण्यापलीकडे हातात तरी काय आहे?

आशुतोष पुन्हा आपल्याच विचारात गुंग झाला. इतक्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज झळकला.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..