व्हाईट लिली..
© अनुप्रिया
© अनुप्रिया
ती मंतरलेली रात्र, कानावर पडणारी ती फेसाळलेल्या समुद्राची गाज, तो मदहोश करणारा, सर्वांगावर शहारा उमटवणारा, अंगाशी झोंबणारा मुजोर वारा, चंद्राच्या साथीनं लपंडाव खेळणारी आकाशात नुकतीच उमलंलेली चांदण्याची फुलं. दूरवर गणेशमंदिराच्या गाभाऱ्यातून ऐकू येणारा घंटानाद.. समुद्र किनारी वाकुल्या दाखवत उभी असलेली ती उंचच उंच माडांची झाडी, डाव्या हाताला लाकडी बांबूच्या काठ्यांच्या भिंती असलेलं एक बांबूचं छोटंसं टूमदार रेस्टोरंट. आकाशातून खाली धरतीवर उतरण्यासाठी असलेला चंदनी लाकडी जिना.. त्या जिन्यावर चांदण्यांनी घातलेल्या मखमली पायघड्या आणि त्यावर पसरलेला प्राजक्ताच्या फुलांचा सडा.. सर्वत्र पसरलेला उंची अत्तरांचा घमघमाट आणि त्या जिन्यावरून धरतीच्या ओढीने अलगद खाली येणारी तिची नाजूक पावलं, पायात रुणझुणणारं पैंजण, हातातल्या बांगड्यांची नाजूकशी किणकीण, अंगात पायापर्यंत असलेला घोळदार पांढरा शुभ्र झगा, अंगावर फुलांचे आभूषणं, गळ्यात चाफ्यांच्या फुलांचा पुष्पहार, डोक्यावर विराजित झालेलं ताऱ्यांचं मुकुट, तिची ती घायाळ करणारी नजरफेक, नाजूक गुलाबी ओठांच्या गुलाबी पाकळ्या, कमनीय बांधा, कमरेपर्यंत रूळणाऱ्या काळ्याभोर केसांचा संभार, नाजूक देहाची आखीव रेखीव वळणं असलेली एक तेजस्वी श्वेतांबरा, एक आरस्पानी सौंदर्य, भिरभिरत्या नजरेची ती मृगनयनी अवकाशातून चंदनी जिना उतरत अलगद त्या पायघड्यावरून आपल्या नाजूक पावलांनी प्राजक्ताच्या पसरलेल्या सड्यावरून हळुवार चालत ती समुद्रकिनारी उतरली. जणू स्वर्गातल्या इंद्र दरबारातली अप्सराच धरतीवर अवतरली होती. तिच्या पावलांना किनाऱ्याचा ओला रेतीमय स्पर्श झाला तशी तिची काया थरथरली. तिचं ते मोहित करणारं सौन्दर्य तो अवाक होऊन पाहत होता. तिचं ओठांवरचं मादक हसू त्याला घायाळ करत होतं. तिने हसून त्याचा हात हातात घेतला. तिच्या नाजूक स्पर्शाने त्याच्या हृदयाची तार झंकारत होती. देहावर अलगद शिरशिरी उमटली. त्यानेही तिचा हात घट्ट पकडला आणि त्या अनोळखी वाटेवरून एकमेकांचा हात हातात गुंफुन ती दोघं समुद्र किनारी अनवाणी पावलांनी चालू लागली. त्या बेधुंद रेतीमय वाटांवरचा त्यांच्या पावलांना गुदगुल्या करणाऱ्या निळ्याशार लाटांचा तो हळुवार स्पर्श दोघांनाही सुखावत होता, हवाहवासा वाटत होता. अचानक पावसाची रिमझिम सुरू झाली. त्याने आपल्या मजबूत बाहुंचा पाळणा करत तिला अलगद उचलून घेतलं. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले. तो तिच्या निळ्याशार डोळ्यांच्या डोहात तो डुंबत चालला होता. तो बांबूच्या रेस्टोरंटच्या दिशेने चालू लागला. हळू आवाजात शांत संगीत वाजत होतं. आजूबाजूच्या गर्दीची तमा न बाळगता तिच्या डोळ्यात पाहत तो सरळ रेस्टॉरंटमधल्या खोलीच्या दिशेने चालू लागला. खोलीत शिरताच त्याने दार पुढे लोटलं आणि समोर गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेल्या पलंगावर तिला अलगद झोपवलं. जणू पांढऱ्या रंगांच्या वस्त्रात गुंडाळलेली तिची कमनीय काया पलंगावर पहुडली होती. तो तिच्या अगदी जवळ आला. आता त्याचे भारलेले श्वास तिच्या मानेवर, कानामागे तिला जाणवू लागले. त्याच्या अलगद स्पर्शाने तिचे डोळे आपोआप मिटू लागले. तिचा ऊर धपापू लागला. त्याच्याही श्वासांची गती वेगाने वाढू लागली. त्याची नजर तिच्या मादक देहावर स्थिरावली होती. तिचं ते आरस्पानी सौन्दर्य पिऊन टाकावं की काय! असं त्याला वाटून गेलं. आता त्याचा संयम सुटू पाहत होता. तो अधीर मनाने तिच्या चेहऱ्याजवळ आला. त्याने हळुवार तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तशी तिची काया थरथरली. तिने तिचे ओठ जराशी दातांनी दाबत मान दुसरीकडे फिरवली. किती मोहक दिसत होती ती! तिची हनुवटी वर उचलत तिच्या गुलाबी ओठांच्या पाकळ्यांवर ओठ टेकवून तो तिच्या ओठांचा सोमरस पिऊन टाकणार इतक्यात ती पलंगावरून दिसेनाशी झाली. त्याने मान वळवून आजूबाजूला पाहिलं तर ती दारापाशी उभी होती. ती त्याच्याकडे पाहून हसत होती. तो उठून उभा राहिला. इतक्यात खोलीचं दार आपोआप उघडलं गेलं आणि ती बाहेरच्या दिशेने पाऊल टाकत अंगावर परिधान केलेल्या झग्याचा घोळ सांभाळत चंदनी जिन्याच्या दिशेने भरभर चालू लागली. काही अंतरावर गेल्यावर क्षणभर थांबून तिने मागे वळून पाहिलं. तो तिच्या जाणाऱ्या वाटेकडेच पाहत होता. दोन्ही हात त्याच्या दिशेने पुढे धरत तिने त्याला जवळ येण्यासाठी खुणावलं. पुन्हा झपाझप पाऊल टाकत आकाशात वर जाणारा तो चंदनी जिना चढून ती आता उंच आकाशापाशी पोहचली. हळूहळू चंदनी जिन्याची एकेक पायरी अदृश्य होऊ लागली. आता काही क्षणात तीही लुप्त होण्याच्या मार्गांवर होती. तिने पुन्हा दोन्ही हात पसरले आणि त्याला तिच्याजवळ बोलवू लागली.
“थांब.. जाऊ नकोस प्लिज.. मला सोबत घेऊन जा.. थांब ना.. थांब मी आलो..”
असं म्हणत तो धावत तिच्या दिशेने निघालाच तशी एक सणसणीत चपराक आशुतोषच्या गालावर पडली. तो तिथेच खाली कोसळला.
“नालायका! सूर्य डोक्यावर आला तरी अजून बिछान्यात लोळत पडलाय. जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटू दे.. दळभद्री लक्षणं कुठली! घरदाराची काळजी तर नाहीच निदान स्वतःच्या भविष्याची तरी चिंता वाटू देत की.. किती दिवस आईबाबांच्या जीवावर असाच बसून राहणार? कोणत्या मुहूर्तावर असलं पात्र जन्मास आलं देव जाणे!”
ओरडण्याचा कर्कश आवाज कानावर पडताच आशुतोषची झोप खाडकन उडाली. तो भानावर आला आणि त्याने आवाजाच्या दिशेने समोर पाहिलं. समोर दोन्ही हात कमरेवर ठेवून रुद्रावतार धारण केलेली त्याची आई त्याला दिसली. तो खडबडून जागा झाला आणि आजुबाजूला नजर टाकली तर तो अंथरूणात होता. एका हाताने त्याने चादर धरली होती आणि दुसर्या हाताने तो डोळे चोळू लागला.
“पुन्हा तेच स्वप्न..”
आशुतोष तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
“उठा राजे.. उठा.. उपकार करा आमच्यावर..”
आज पुन्हा त्याला उठायला उशीर झाला होता. त्याने डोळे बंद करून एक दीर्घ सुस्कारा सोडला. ते पाहून आईचा पारा अजूनच चढला आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत बडबडत निघून गेली.
आशुतोष तसाच पलंगावर भिंतीला डोकं टेकवत डोळे मिटून बसून राहिला. पुन्हा एकदा त्याच्या मनात त्या स्वप्नाचा विचार आला.
“गेले कित्येक दिवस तेच स्वप्न राहून राहून मला पडतंय. बऱ्याच दिवसांपासून मला खूप अस्वस्थ वाटतंय. काहीच सुचत नाहिये. काय अर्थ असेल त्या स्वप्नाचा? कोण आहे ती? झोपेतून उठल्यावर तिचा चेहरा मला नीट का आठवत नाही? तिच्या चेहरा धुसर होत जातो; पण ती अचानक मला सोडून का आणि कुठे जात असेल? माझ्याच मनाचे खेळ असतील का हे? काही कळतच नाहिये.”
आशुतोष बराच वेळ तसाच बसून राहिला. समोरच्या खिडकीतून त्याने बाहेर डोकावलं. बाहेर लहान मुलं खेळत होती. इतक्यात त्याचं लक्ष पलंगावर उशाशी असलेल्या मोबाईलकडे गेलं. मोबाईल उचलून तो व्हाट्सअँपचे मेसेजेस पाहू लागला. फेसबुक, इन्स्टा, ट्विटर साऱ्या सोशल मीडियावर फेरफटकाही मारून झाला. ‘वेळ किती संथ गतीने पुढे सरकतेय.’ उगाच त्याला वाटून गेलं. व्हाटसअँपचे मेसेज वाचून झाल्यावर त्याने त्याच्या मैत्रिणीला भला मोठा मेसेज केला.
“गुडमॉर्निंग वृषा, आज पुन्हा तेच स्वप्न पडलं. गेली तीन चार महिन्यापासून रोज रात्री मला ते स्वप्न पडतंय. स्वप्नात दिसणारी ती जागा, ते ठिकाण मला काहीच माहित नाही. मी कधी तिथे गेलोही नाही. मग पुन्हा पुन्हा ती जागा मला का दिसते? त्या जागेशी काय ऋणानुबंध असतील खरंच समजत नाहीये स्वप्नाचा अर्थ लागत नाहीये. त्यामुळे माझी चिडचिड होतेय गं.. स्वप्नातली ती मुलगी कोण आहे हे जोपर्यंत मला कळत नाही; तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. वृषा, तुला तर माझ्याबदल सारंच ठाऊक आहे. रागिणीच्या जाण्यानंतर मी आयुष्यात कोणत्याच मुलीला त्या दृष्टीने पाहिलं नाही. खरं सांगायचं तर कोणत्या मुलीशी फ्लर्ट केलं नाही असं नाही; पण प्रेम केलं ते मात्र फक्त रागिणीवरच. तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीचा प्रियेसी म्हणून विचारही मनात आणला नाही. ठरवूनही त्या दृष्टीने मी कोणत्या मुलीकडे पाहू शकलो नाही. आयुष्यातल्या जगण्या-मरण्याच्या खूप साऱ्या प्रश्नांनी आधीच मला खूप हैराण केलंय त्यात हे स्वप्न मला छळत राहतं. याविषयी तू काही सांगू शकशील का? फ्री झालीस की मेसेज कर. मी तुला कॉल करतो. सविस्तर बोलूया.”
वृषालीला मेसेज करून तो तिच्या मेसेजची वाटू पाहू लागला.
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा